मिळुनी सात जणी! मोदींच्या कॅबिनेट मध्ये सात महिलांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय
मोदींच्या मंत्रिमंडळातल्या विस्ताराची २ दिवस जाम चर्चा झालीय. मंत्र्यांच्या नियुक्तीनंतर मोदींच पण खूप कौतूक केलंय जातंय. कारण या मंत्रिमंडळात ७ महिलांना मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळं आता पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण महिला मंत्र्यांची संख्या ११ झाली आहे.
यात भाजपच्या मीनाक्षी लेखी, प्रतिमा भौमिक, दर्शना जरदोश, अन्नपूर्णा देवी, भारती पवार, शोभा करंदलजे आणि अपना दल (एस) च्या अनुप्रिया पटेल यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अनुप्रिया पटेल वगळता या ६ नेत्या पहिल्यांदाच मंत्री झाल्या आहेत.
या सात महिला मंत्र्यांव्यतिरिक्त अर्थमंत्री निर्मला सीतारमण, महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती आणि रेणुका सिंह सरुता या मंत्रिमंडळात आधीपासूनच आहेत.
मग या ७ जणी आहेत त्यांच्याविषयी थोडं माहित असलेलं बरं असतं म्हणून.
यात पहिल्या क्रमांकावर आहेत मीनाक्षी लेखी
दिल्लीच्या लोकसभेच्या खासदार मीनाक्षी लेखी यांना परराष्ट्र राज्यमंत्री करण्यात आलंय. यासह, त्यांना सांस्कृतिक मंत्रालयात राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे. मीनाक्षी लेखी पहिल्यांदाच केंद्रात मंत्री झाल्या आहेत.
२०१४ मध्ये मीनाक्षी लेखी यांनी पहिल्याच झटक्यात नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार आशिष खेतान यांनी पराभूत केलं होतं. २०१९ मध्ये दुसर्या वेळी नवी दिल्ली संसदीय मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेस नेते अजय माकन यांना पराभूत करून त्या लोकसभेत पोहोचल्या. मीनाक्षी लेखी वकील आहेत.
यानंतर आहेत त्रिपुराच्या प्रतिमा भौमिक
प्रतिमा भौमिक यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. केंद्रीय मंत्री झालेल्या त्रिपुराच्या त्या पहिल्या नेत्या आहेत. ५२ वर्षीय प्रतिमा भौमिक यांचे त्रिपुरातलं लोकप्रिय नाव ‘प्रतिमा दी’ आहे. प्रतिमा भौमिक सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राज्यमंत्री बनल्या आहेत.
२०१९ मध्ये पश्चिम त्रिपुरा लोकसभा मतदारसंघातून भौमिक प्रथमच खासदार झाल्या आहेत. यापूर्वी त्या भाजपच्या त्रिपुरा युनिटच्या सरचिटणीस होत्या.
गुजरातच्या दर्शना जरदोश
केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झालेल्या दर्शना जरदोश गुजरातच्या तीन वेळा खासदार राहिल्या आहेत. ६० वर्षीय जरदोश या ओबीसी समाजातल्या आहेत. त्यांना रेल्वे राज्यमंत्री करण्यात आलय. सोबतच त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून जबाबदारी ही सोपविण्यात आली आहे.
दर्शना जरदोश यांनी २००९, २०१४ आणि २०१९ या वर्षात तीन वेळा सूरत लोकसभेच्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. १९८० च्या दशकात जरदोश भाजपाच्या सूरत प्रभाग क्रमांक आठ समितीच्या उपाध्यक्ष होत्या. आणि नंतर २००० मध्ये या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांना सुरत भाजपाच्या महिला मोर्च्याच्या अध्यक्षपदी आणि २००८ मध्ये पुन्हा प्रदेश भाजपाच्या महिला शाखेच्या सरचिटणीसपदी नेमण्यात आले.
अन्नपूर्णा देवी
झारखंडच्या कोडरमा येथील खासदार अन्नपूर्णा देवी यांना नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री करण्यात आलय. त्यांना केंद्रात शिक्षण राज्यमंत्री केलयं. अन्नपूर्णा देवी या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. यापूर्वी त्या आरजेडीमध्ये होत्या. परंतु सन २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
खासदार अन्नपूर्णादेवी रमेश प्रसाद यादव यांच्या पत्नी आहेत. रमेश यादव १९९८ मध्ये एकीकृत बिहारचे मंत्री होते. नंतर रमेश प्रसाद यादव यांच्या निधनानंतर, अन्नपूर्णा देवी यांनी १९९९ मध्ये विधानसभा पोटनिवडणूक लढविली आणि त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. त्यानंतर एका वर्षानं झालेल्या विधानसभा निवडणुकीत अन्नपूर्णादेवी पुन्हा विजयी झाल्या. त्यानंतर बिहार सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यात आलं.
झारखंड राज्याच्या स्थापनेनंतर अन्नपूर्णा देवी यांनी २००५ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या. सन २०१३ मध्ये हेमंत सोरेन सरकारमधील आरजेडीच्या कोट्यातून त्या जलसंपदामंत्री झाल्या. मात्र, त्यानंतर मात्र २०१४ मध्ये कोडरमामधूनच त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
अपना दलाच्या अनुप्रिया पटेल
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल मोदी मंत्रिमंडळात परतल्या आहेत. अपना दलाच्या अनुप्रिया २०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधून लोकसभेवर निवडून आल्या. अनुप्रिया २०१६ ते २०१९ या काळात केंद्रीय आरोग्य मंत्रालयात राज्यमंत्री होत्या. यावेळी त्यांच्याकडे केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यापूर्वी त्या वाराणसीच्या रोहनिया मतदारसंघासाठी यूपी विधानसभेच्या सदस्या म्हणून निवडल्या गेल्या. २०१२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी पीस पार्टी ऑफ इंडिया आणि बुंदेलखंड कॉंग्रेसबरोबर युती केली होती.
अनुप्रिया अपना दलाचे संस्थापक सोन लाल पटेल यांच्या कन्या आहेत.
मानसशास्त्रात पदवी आणि व्यावसायिक पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या अनुप्रिया २००९ मध्ये वडिलांच्या निधनानंतर अपना दलच्या अध्यक्ष झाल्या. उत्तर प्रदेशातला अपना दल हा भाजपचा महत्वाचा मित्र पक्ष आहे. राज्यातल्या कुर्मी गटाचा पण अपना दलाला मोठा पाठिंबा आहे.
बी. एस. येडियुरप्पा यांच्या जवळच्या कार्यकर्त्या शोभा करंदलजे
५४ वर्षीय शोभा करंदलजे कर्नाटकातील उडुपी-चिकमंगरूळच्या खासदार आहेत. करंदलजे यांना कृषी राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याआधी कर्नाटक सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंत्रीदेखील राहिल्या आहेत. करंदलजे सुरुवातीच्या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या जवळच्या कार्यकर्त्या होत्या.
२००४ च्या विधानसभा निवडणुकीत बंगळुरुच्या यशवंतपूर येथून जिंकून त्या प्रथमच आमदार झाल्या. येडियुरप्पा सरकारमध्ये त्यांना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री करण्यात आले. येडियुरप्पा यांचे भाजपबरोबर मतभेद झाल्यानंतर करंदलजे यांनीही आपला राजीनामा दिला होता. पण, नंतर येडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये सामील झाले आणि करंदलाजेही भाजपमध्ये परतल्या.
२०१४ मध्ये करंदलजे यांनी उडुपी-चिकमंगरूळ येथून लोकसभा निवडणूक लढविली आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिक्रियामुळे त्या बऱ्याचदा वादात सापडल्या आहेत. त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक सौहार्द बिघडवल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.
महाराष्ट्राच्या भारती पवार
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील दिंडोरी येथून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांच्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट महिला खासदार म्हणून सन्मानित करण्यात आले होते. डॉक्टर-राजकारणी असलेल्या भारती यांनी २००२ साली पुणे विद्यापीठाच्या NDMVP च्या मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची डिग्री पूर्ण केली.
आता मंत्रिमंडळात एकूण ७ महिला मंत्र्यांचा समावेश केल्याबद्ल मोदींच सोशल मीडियावर जास्तच कौतुक केले जातंय. परंतु खरं बघायला गेलं तर एकूण मंत्र्यांपैकी आजही केवळ १४ टक्केच महिला मंत्रिमंडळाचा भाग आहेत. त्यात आणि यूपीला मंत्रिमंडळात जास्तीच प्रतिनिधित्व मिळालं आहे. विशेष म्हणजे स्मृती इराणी यांच्याकडून वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कार्यभार काढून घेण्यात आलाय ही आठवण ठेवायला हवी.
हे हि वाच भिडू
- एका मंत्रिमंडळाच्या विस्तारातून १० राज्यातील नेत्यांना खुश करण्याचा भाजपचा प्लॅन असणाराय
- मुंडेंनी वशिला लावला आणि हर्षवर्धन पाटील विलासरावांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले.
- प्राथमिक शाळेत शिकवणारा निसिथ प्रामाणिक मोदींच्या कॅबिनेटमधला सर्वात तरुण मंत्री बनलाय.