या गुजराती भिडूंनी कोरोनावरचं औषध मार्केट मध्ये आणलं देखील..
गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना महामारीशी लढतो आहे. रोजचे रुग्ण दगावण्याची संख्या वाढते आहे. या महिन्यातला करोना महामारीचा वाढता उद्रेक पाहता आरोग्य यंत्रणा नेटाने काम करत आहेत. आजवर आपण घरचे उपचार ते रामदेव बाबाच्या कोरोनील औषधावरचे जोक बरेच वाचले असतील. पण एका गुजराती माणसाने कोरोनावरचं औषध बाजारात आणलंय आणि त्याला केंद्राने मान्यता सुद्धा दिली आहे.
इंद्रवदन मोदी आणि रमण पटेल या जोडीने कॅडीला फार्मास्युटिकल हि कंपनी स्थापन केली. अहमदाबादच्या एल. एम कॉलेजमध्ये रमण पटेल हे प्रोफेसर होते आणि तिथेच त्यांचे व्यावसायिक मित्र इंद्रवदन मोदीही होते. कॅडीला हि कंपनी त्यांनी १९५२ साली काढली. पुढे १९९५ साली कामाचा वाढता विस्तार बघून त्यांनी हि कंपनी दोन भागात विभागायचं ठरवलं.
रमण पटेल यांनी कॅडीला हेल्थकेअर स्थापन केली तर इंद्रवदन मोदी यांनी त्यांच्या कंपनीचं नाव कॅडीला फार्मास्युटिकल ठेवलं.
अहमदाबाद मध्ये सध्या हि कंपनी आहे. कॅडीला हेल्थकेअर लिमिटेड हि भारतीय बहुराष्ट्रीय औषधी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. या कंपनीने तयार केलेल्या औषधाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
या जोडगोळीला मेडिसिन मॅन म्हणूनही ओळखलं जातं.
या कंपनीची सुरवात नक्की कशी झाली –
१९५२ साली इंद्रवदन मोदी यांनी आपली चांगली नोकरी सोडली आणि आणि रमण पटेल याना सोबत घेऊन कॅडीला स्थापन केल्यानंतर या काळात भारतात अशक्तपणा असलेल्या आजारांवर उपचार करण्यासाठी त्यांनी जीवनसत्वे तयार करण्याकडे लक्ष घातले. सुरवातीला केवळ आजी आणि पत्नी या लोकांच्या मदतीने हि कंपनी चालत होती.
१९६७ मध्ये कॅडिलाने आपला पहिला कारखाना सुरु केला. कॅडिलाने नवनवीन उत्पादने बाजारात आणण्यावर भर दिला. कॅडिलाने सर्वप्रथम कॅडीला लिव्हरूबा आणि कॅडीला ग्राईप हि उत्पादने बाजारात लॉन्च केली. स्वदेशी ग्राईप वॉटर बनवणारी हि पहिली कंपनी होती.
चार दशकात या कंपनीने भारतभर आपले जाळे विखुरले आहे. २०२० मध्ये फॉर्च्युन इंडियाच्या टॉप ५०० च्या यादीमध्ये हि कंपनी १००व्या स्थानावर आहे.
२०१० साली कॅडीला हेल्थकेअरला आर अँड डी फॉर अफोर्डेबल हेल्थकेअर इन इंडिया उपक्रमांतर्गत भारतातील सगळ्यात विश्वासू कंपनी म्हणून वेलकम ट्रस्टचा पुरस्कार मिळाला.
या कंपनीने भारतातल्या छोट्यामोठ्या औषध कंपनींसोबत काम करण्याचा निर्णय घेतला पण जस जस कॅडीला फार्मास्युटिकलचा वेग वाढत गेला त्यात या छोट्यामोठ्या कंपन्या विलीन होत गेल्या.
२००१ साली रमण पटेल यांच्या निधनानंतर या कंपनीचे सध्याचे मालक आहेत पंकज पटेल. २६ नोव्हेंबर २०१२ साली इंद्रवदन मोदी यांचं निधन झालं. कॅडीला या नावाखाली या दोन्ही कंपन्या काम करतात.गुजरात सरकारच्या ग्रामीण विकास कार्यक्रमानाही हि कंपनी मदत करते.
झायड्स कॅडीला कंपनीचं विराफीन हे औषध करोनावरील उपचारांसाठी म्हणून देशात वितरीत करण्यासाठी DCGI अर्थात Drugs Controller General of India नं मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे. या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल सकारात्मक असून औषध दिल्यानंतर ७व्या दिवशी करोनाबाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
झायड्स कॅडीलाच्या औषधाने रुग्ण बरा होण्याचा वेग जास्त आहे, हे औषध इंजेक्शन स्वरूपात देण्यात येत आहे. रुग्ण लवकर बरा होत असल्यामुळे कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत नसल्याचही या कंपनीने सिद्ध केलंय. कॅडीला हि अशा अनेक भारतीय फार्मा कंपन्यांपैकी एक आहे जिला गिलियड सायनेन्स कडून रेमडेसिव्हर तयार करण्यासाठीचा परवाना मिळाला आहे.
आता या कंपनीने कोरोनावर इलाज म्हणून आणलेलं औषध उपयोगात येऊन लवकरात लवकर रुग्ण बरे होवो एवढीच अपेक्षा आहे.
हे हि वाच भिडू :
- कोरोनाची दुसरी लाट वाढलीय आणि आरोग्य सेतूचं रेटिंग दिवसेंदिवस ढासळत चाललंय..
- कोरोनाच्या डबल म्युटंटनंतर आता काय आहे हा ट्रिपल म्युटंट ?
- कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी तिनं स्कुटीनं मध्यप्रदेशवरून गाठलं महाराष्ट्र …