केडर बेस, केडर बेस म्हणजे काय रे भिडू ? लोकं म्हणतात यामुळेच सेना कधी संपु शकत नाही…

एका बाजूला एकनाथ शिंदेंचं बंड शिगेला पोहोचलंय, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या बैठकीत जिल्हाप्रमुख आणि तालुका प्रमुखांना संबोधित केलं. त्यात ते म्हणाले, ‘मी जरी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिला, तरी शिवसेना पुढं न्यायला तुम्ही समर्थ आहात. ज्यांना तिकडं जायचं असेल त्यांनी खुशाल जावं, पण जे माझ्यासोबत आहेत त्यांनी असं समजा की शिवसेनेचा नारळ नुकताच फुटलाय आणि आपल्याला शुन्यापासून सुरुवात करायचीये.’

या आधी छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरेंनी आपल्या समर्थकांसह शिवसेना सोडली तेव्हा तेव्हा सेना संपल्याची चर्चा झाली, पण तसं झालं नाही. नोव्हेंबर २०१२ मध्ये शिवसैनिकांसाठी दैवत असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं, यावेळीही चर्चेचा विषय होता, ‘साहेब गेले, आता सेना संपली,’… पण तेव्हाही तसं झालं नाही.

एकनाथ शिंदेंनी बंड केलं, शिंदे थेट शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा सांगतील अशी शक्यता निर्माण झाली. साहजिकच शिवसेनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

पण इतक्या मोठ्या बंडानंतरही शिवसेना संपू शकत नाही, याचं कारण सांगितलं जातं, ते म्हणजे शिवसेनेचा केडर बेस, अर्थात त्यांचा तळागाळातला शिवसैनिक. याच केडर बेसच्या जोरावर शिवसेनेनं आजवरची झेप घेतलीये आणि या केडर बेसचं बलस्थान आहे, ते म्हणजे शिवसेनेच्या शाखा.

शिवसेना ५६ वर्षांची झाली, तरी आजही बंडानंतर, आंदोलनासाठी, सेना स्टाईल राडा करण्यात आणि पुन्हा पक्ष उभारण्यातही या ‘शाखा’च महत्त्वाच्या आहेत.

सगळ्यात आधी बघुयात की या शाखा उभ्या कशा राहिल्या..?

मार्मिक लोकप्रिय होतंच, त्यातून बाळासाहेब ठाकरे आपले विचार मांडायचे. पुढं शिवसेना स्थापन झाल्यानंतर मार्मिकचा हा वाचक शिवसेनेला जोडला गेला. शिवसेनेचं काम करायचं म्हणून आधी कित्येक तरुण कदम मॅन्शनमधल्या मार्मिकच्या ऑफिसजवळच जमायची. नंतर ही जागा कमी पडू लागली, त्याचवेळी शिवसेनेचं जाळं मुंबईभर विस्तारलं.

मग सेनेचं काम करणारे हे तरूण वेगवेगळ्या ठिकाणी जमू लागले आणि यातूनच शिवसेनेच्या शाखा उभ्या राहिल्या.

१९६८ च्या मुंबई महानगर पालिका निवडणुकांनंतर  सेनेनं प्रत्येक पालिका वॉर्डात आपली शाखा काढली. तिथल्या तरुणांना हक्कानं बसण्यासाठी एक अड्डा तयार झाला. तिथं जमणाऱ्या तरुणांच्या मनात धग कायम ठेवण्याचं काम बाळासाहेबांच्या भाषणातून होत होतं. त्याचवेळी शिवसेनेत जबाबदारीची एक उतरंड निर्माण झाली.

शिवसेनाप्रमुख-विभागीय नेते-विभाग प्रमुख-उपविभाग प्रमुख-शाखाप्रमुख

या उतरंडीत सगळ्यात खालच्या स्थानावर असला, तरी शाखाप्रमुखाला प्रचंड महत्त्व होतं, कारण तोच सामान्य लोकांचे प्रश्न सोडवायचा आणि हे प्रश्न वरपर्यंत पोहोचवायचा. शाखाप्रमुखाकडे अगदी पाणीटंचाई, शाळा प्रवेश, रोजगार अशा सध्या तक्रारीही यायच्या आणि मोठी प्रकरणं घेऊनही लोकं यायची.

हातात सत्ता आल्यानंतर लोकांचे प्रश्न सोडवणं शाखाप्रमुखांना आणखी सोपं झालं आणि त्यामुळंच लोकांच्या मनात शिवसेनेबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झालं.

आधी फक्त वेळ घालवायचा म्हणून अड्ड्यावर जमणारे तरुण पुढं जाऊन शिवसैनिक बनले आणि पक्षाचं बळ वाढत गेलं.

शिवसेना नेत्यांमध्ये असलेल्या शाखांच्या महत्त्वाचं उदाहरण पाहुयात…

दादरच्या कबुतरखान्याजवळ मनोहर जोशींनी शाखा सुरू केली होती. ट्रॅव्हल्सचा बिझनेस करणारे जोशीसर राजकारणात लोकप्रिय झाले, ते याच शाखेच्या माध्यमातून. १९९० मध्ये मनोहर जोशी आमदार होते, शिरावर मोठी जबाबदारी होती, पण त्याचवेळी त्यांनी दादरमधल्या प्रत्येक शाखेवर उपस्थिती लावायला सुरुवात केली. पुढं मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतरही मनोहर जोशींनी कबुतरखान्याजवळच्या शाखेत येण्याचा शिरस्ता चुकवला नाही. 

महापौर-आमदार-खासदार-मुख्यमंत्री अशी महत्त्वाची पदं भूषवणारे जोशी, आठवड्यातले ३ दिवस सकाळी दहाच्या ठोक्याला शाखेत भेटायचेच!

यामागचं कारण सोपं होतं, जोशींना माहित होतं की आपल्याला मिळणारी मोठी पदं शाखेच्या पाठबळामुळंच शक्य आहेत.

या शाखांमुळं नेमकं काय होतं..?

आजही कित्येक जण शिवसेना शाखेत आपले प्रश्न घेऊन जातात, बऱ्याचदा तिथं हे प्रश्न सुटतातही. मोर्चा, आंदोलन आणि इतर कुठल्याही उपक्रमाची बांधणी इथंच होते. आपण आपल्या पक्षप्रमुखाला प्रत्यक्ष भेटू की नाही, हे माहीत नसतानाही कित्येक शिवसैनिकांनी शाखेच्या कामात स्वतःला झोकून दिलं आणि पक्षासाठी काहीही करायला तयार असलेला ‘बिनचेहऱ्याचा शिवसैनिक’ उभा राहिला. 

२०१२ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आव्हान कडवं असताना, फक्त पक्षाला जिंकवण्यासाठी वय झालेले साठी-सत्तरीतले शिवसैनिकही शाखांवर जमलेले होते आणि त्यांनी विजय खेचून आणला. यावरुन शाखांची ताकद लक्षात येते…

सामान्य शिवसैनिक शाखांकडे आकर्षित होण्याचं आणखी एक कारण म्हणजे शाखाप्रमुखांची प्रगती…

शिवसेनेत महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या नेत्यांची यादी पाहिली, तर अनेक जणांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेना शाखाप्रमुख म्हणून केली होती. सेनेनं कायम सध्या कार्यकर्त्याला नेता बनवण्यावर भर दिला, याची अनेक उदाहरणं आहेत.

आत्ताच्या संदर्भात एक उदाहरण पाहणं गरजेचं आहे. १९८४ मध्ये किसननगर इथं शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी नगरसेवक, सभागृह नेता, आमदार, जिल्हाप्रमुख आणि कॅबिनेट मंत्री अशी मजल मारली.

मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ या मोठ्या नेत्यांनीही शाखाप्रमुख म्हणूनच सुरुवात केली होती. ज्यांना मातोश्रीवरचा सीसीटीव्ही म्हणून ओळखलं जातं, ते मिलिंद नार्वेकरही आधी शिवसेनेचे शाखाप्रमुखच होते.

याच शाखांच्या जोरावर उद्धव ठाकरे, ‘शिवसेनेचा नुकताच नारळ फुटलाय असं समजून शून्यातून सुरुवात करू म्हणतायत.’

कारण, पाहायला गेलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात भाजप हे नेते केंद्रित पक्ष आहेत. उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या नेत्यानं पक्ष बदलला, तर त्याचं वर्चस्व असणाऱ्या भागातून त्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात येतं. मात्र शिवसेनेचं असं होत नाही, कारण शिवसेना कार्यकर्ता केंद्रित आहे असं सांगितलं जातं.

ठिकठिकाणी उभारलेल्या शाखांमुळं, कार्यकर्त्यांच्या जाळ्यामुळं शिवसेना स्थानिक माणसांमध्ये रुजत गेली आणि आजवर भुजबळ, राणे, राज ठाकरे असे नेते सोडून गेले तरी शिवसेनेनं वर्चस्व टिकवण्यात यश मिळवलं.

शाखेत उपस्थित राहून लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ठाकरे घराणं दैवतासमान आहे. त्यामुळं मोठे नेते आपल्या समर्थकांसह शिवसेना सोडून गेले, तरी सेनेच्या कार्यकर्त्यांचा हा केडर बेस पक्का राहिला आहे. 

तरुण कार्यकर्ते असतील, शाखा सांभाळणाऱ्या आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणाऱ्या महिला कार्यकर्त्या असतील किंवा फक्त पक्षादेश प्रमाण मानून शाखेवर येणारे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, याच केडर बेसच्या जोरावर उद्धव ठाकरेंना पुन्हा शुन्यातून सुरुवात करत शिवसेनेला उभारी देता येईल असा विश्वास आहे, असं राजकीय जाणकार सांगतात.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.