दर १२ मैलांवर बदलणारी बोलीभाषा, लोकल ब्रँडला ग्लोबल बनवू शकतेय

आमचं एक भिडू ए. गडी पैशानं लय मोठाय, पण वागणुकीतून अजिबात वाटत नाय, पोरगं आमच्यासोबत पुण्यात राहतं खरं, पण मन अजून तिकडं गावाकडं .एकदा म्हणला, ‘आबांचा फोन आल्ता, आपल्याला गाडी घ्यायला जायाचंय.’ जरा बरे कपडे घालून त्याच्यासोबत गेलो, तर यानं नेलं मर्सिडीजच्या शोरूमला. यानं गाडी कशीये, काये असले प्रश्न विचारले. सुटाबुटातल्या एका पोरानं BHP, HP, RPM, ग्राऊंड क्लिअरन्स असलं काय काय इंग्लिशमध्ये सांगितलं. पण आमच्या दोस्ताचं तोंड पडलेलं. गडी आम्हाला खुणवायला लागला, चला इथून. तेवढ्यात एक सेल्समन आला आणि डायरेक्ट बोलला, ‘सर या गाडीचं गणित मी सांगतो. गाडी शून्य मिनिटात मोसम पकडती. कितीबी खंग्री खड्ड्यातून घाला, गाडी हेबाळा देणार नाय, खालनं घासणार नाय… असं काय काय.’ आम्ही बाहेर पडताना चेक देऊन पडलो… कुणामुळं, तर त्या बोलीभाषेत बोलणाऱ्या सेल्समनमुळं.

आज मार्केटमध्ये बघितलं, तर रस्त्यावरची दुकानं पण ग्लोबल व्हायला बघतात. मराठी नाव असं एका कोपऱ्यात लिहिलेलं असतंय. साध्या मोबाईलच्या दुकानाला पण लोकं लिहीतात मोबाईल शॉपी. बरं शंभरातल्या नव्वद दुकानांची नावं न कळणाऱ्या इंग्लिशमध्ये असतात. आता लोकल ब्रँडला ग्लोबल व्हायचंय यात एक टक्का पण काय चूक नाय. पण ग्लोबल व्हायचं म्हणून इंग्लिश किंवा हिंदीतच जाहिरात करायला लागती असं पण काय नाय.

आता तुमचे भिडू लोक, म्हणजे आम्हीच. सुरुवातीपासून बोलीभाषेत लिहितो आणि बोलतो पण. याचं सगळ्यात सोपं कारण म्हणजे आम्हाला भाषा ही गोष्टच लय आवडती. हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे आम्हाला एक कॅलेंडर दिसलं, तेही बोलीभाषेतलं. एखादा ब्रँड बोलीभाषेत लय भारी काम करत असला, तर त्याचं कौतुक करायला पाहिजे की भिडू. अन हे कौतुक करायला, मराठी भाषा गौरव दिनापेक्षा भारी दिवस कुठला असणार?

‘सवाई मसाले’ वाल्या भिडूंनी एक कॅलेंडर बनवलं. नाव वाचूनच दिलखुश होणार, ‘बोली गावागावाची, संस्कृती स्वादाची.’ बाकीच्या कॅलेंडर्समधी असतात, तशी यातपण १२ महिने आहेत, पण प्रत्येक महिन्याला बोलीभाषेचा आणि तिथल्या स्पेशल जेवणाचा तडका दिलाय. पुणेरी भाषेत सांगायचं झालं, तर कॅलेंडर अगदी खमंग आहे. आणि कोल्हापुरीत सांगायचं तर नादखुळाय.

हे कॅलेंडर हातात घेतल्यावर, तुम्ही झटक्यात बाराच्या १२ पानं वाचून मोकळे होणार. या पानांवर १२ कवी आहेत, त्यांच्या बोलीभाषेतल्या कविता आहेत आणि जिथली भाषा, तिथलं खाणं आहे. विमान डोक्यावरुन गेलं असेल, तर संदर्भासहित स्पष्टीकरण देतो…

जुलै महिन्याचं पान ए. आता हा पावसाचा महिना आणि पावसाची खरी मजा कुठं, तर कोकणात. या पानावर कोकणचे कवी, महेश केळुसकर यांच्या ओळी आहेत…

गरम गरम वडे झनझनीत सागुती
तिरफळा घालून पेडव्याचा तिकला
हुनहुनीत भाकऱ्ये गोलम्याची चटणी
सुक्या बांगड्याचो कुस्कर, उकड्या तांदळाचो भात
मारा आता पावण्यानु, आडवो हात!
सुको बांगडो भात तांबडो, वर कुळताची पिठी
तसो तुमचा सोबाव गोड जशी मायेची मुलुखमिठी…

calender two
महेश केळुसकर यांच्या ओळी

जरा नाय का फील घेऊन वाचा. असं वाटतं आपण कोकणात गेलोय आणि डायरेक्ट ताटावर जेवायला बसलोय. आता ताटाचा फोटो बघितला असता, तर तोंडाला पाणी सुटलं असतं, पण हे काळजात घुसतं ते फक्त भाषेमुळं.

फक्त कोकणच नाही, तर ही बारा पानं तुम्हाला खान्देश, विदर्भ, मुंबई, मराठवाडा, पुणे, कोल्हापुर असा महाराष्ट्र फिरवून आणतात. सुरेश भट, ग. दि. माडगूळकर, बहिणाबाई चौधरी, पु. ल. देशपांडे, ना. धों. महानोर, विठ्ठल वाघ, महेश केळूसकर, इंद्रजीत भालेराव, जगदीश खेबूडकर, दा. र. दळवी, शाहीर विठ्ठल उमप, दासू वैद्य अशा बारा साहित्यिकांच्या बोलीभाषेतल्या ओळी या कॅलेंडरमध्ये आहे. सोबतच वांड जेवणाचं वांड वर्णन.. मसाल्याचा ठसका असणारं.

Calender one
सुरेश भट यांच्या ओळी

कुणाला हे कॅलेंडर लय भारी वाटेल, तर कुणाला लय साधं. पण कॅलेंडर ‘आपलं’ वाटेल हे फिक्स. त्यादिवशी एक वयानं आणि हुद्द्यानं मोठ्ठा असलेला माणूस भाषेविषयी बोलताना सहज म्हणला, ‘भाषा टिकवण्यासाठी ती व्यवहारात आणणं लय गरजेचं असतंय.’ म्हणायला गेलं तर खरंय, पण भाषा जाहिरातीची झाली, तर अजून टिकणार हेही तितकंच खरं.

जिथं रस्त्यावरची दुकानं मराठी नाव लावायला लाजतात, तिथं प्रसिद्ध असलेला, लोकांना आवडणारा ब्रँड आपली जाहिरात करायला मराठी भाषा वापरतो, त्यातही दर १२ मैलांवर बदलणाऱ्या बोलीभाषा वापरतो हीच कसली भारी गोष्टय बघा. उद्या सवाई मसाले देशाच्या किंवा जगाच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचतील आणि त्यांचं कॅलेंडर बघताना लोकांची मनं आणि जिभा थेट महाराष्ट्रात येतील, कोकणापासून विदर्भापर्यंतच्या ताटात बसतील, तेही बोलीभाषेमुळं आणि ती लिहिणाऱ्या भारी लोकांमुळं…

जाहिरात फक्त लिहित्या मराठीतच नाय, तर रोजच्या बोलण्यातला, जात्यावरच्या ओव्यांमधल्या, कट्ट्यावरच्या गप्पांमधल्या अन आईच्या अंगाईतल्या बोली भाषेतही करता येत्या… खोटं नाय, आमच्या दोस्ताची मर्सिडीज अन कॅलेंडरची १२ पानं साक्ष एत.

वाचून मन भरलं नसेल, तर हा व्हिडीओ पण बघून घ्या…

हेही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.