ड्रग तस्करीसाठी कोलंबियाच्या टोळीने जवळजवळ एक सोव्हिएत पाणबुडी विकत घेतली होती
१९८० मध्ये, लुडविग फेनबर्ग नावाचा एक रशियन माणूस अमेरिकेच्या मायामीमध्ये आला. त्याला लगेचच अमेरिकेच्या एका गुन्हेगारी कुटुंबात काम मिळालं. त्यामागे कारण होतं त्याचे रशियन कनेक्शन्स. लवकरच त्याच्याकडे पुरेसे पैसे आले ज्याने स्वतःचा बिजनेस त्याने सुरु केला. स्वत:चं नाव देखील त्याने ‘टारझन’ असं केलं.
टारझनचे गुन्हे-कनेक्शन आणि तेजीने वाढत्या व्यवसायामुळे त्याला दोन्ही राष्ट्रांच्या अनेक शक्तिशाली किंवा प्रभावशाली व्यक्तींना भेटण्यास मदत झाली.
९० च्या दशकात त्यांची ओळख झाली ‘जुआन आल्मेडा’ या व्यक्तिसोबत. आल्मेडा म्हणजे प्रख्यात बदमाश आणि हाय स्टॅण्डर्डच्या बोटी आणि विदेशी गाड्यांचा व्यवहार करणारा व्यापारी होता. टारझन आणि आल्मेडा यांनी एकत्र व्यवसायास सुरुवात केली. ते रशियामध्ये जात आणि तिथून मोटारसायकलपासून ते हेलिकॉप्टरपर्यंत सर्व अमेरिकी चलनामध्ये खरेदी करत. नंतर ते सर्व ग्राहकांना भरपूर नफ्यासह विकत.
टारझन आणि आल्मेडा यांच्या कारनाम्यांमुळे त्यांची एका तिसऱ्या व्यक्तीशी ओळख झाली – नेल्सन “टोनी” येस्टर.
येस्टर हा मोस्ट वॉन्टेड गंभीर गुन्हेगार होता ज्याचे मेडेलिन ड्रग टोळीशी संबंध होते. ही टोळी म्हणजे स्वतः कोकेन किंग पाब्लो एस्कोबारची होती. टारझन आणि येस्टर लवकरच चांगले मित्र बनले. टारझन आणि आल्मेडा यांनी एस्कोबारच्या ड्रग टोळीशी येस्टर मार्फत पहिला करार केला, ज्याने त्यांना खूप नफा मिळवून दिला. कोलंबियामध्ये ड्रग्जची वाहतूक करण्यासाठी दोन हेवी-पेलोड रशियन कामोव्ह हेलिकॉप्टर खरेदी करण्याची ती डील होती.
मात्र कराराची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण न झाल्याशिवाय रशियन माफिया हेलिकॉप्टर सोडण्यास तयार नव्हते. अशात आल्मेडा एस्कोबार असल्याचं भासवत मॉस्कोला गेला आणि नव्याने तयार झालेल्या रशियामध्ये कोकेन वितरणासाठी आणखी एक करार त्याने केला.
त्यांच्या या डीलने टारझन आणि आल्मेडा यांची बरीच हवा झाली. रशियातील हार्डवेअर सोर्सिगसाठी ते दोघेच निवडक व्यक्ती म्हणून नावारूपाला आले.
दरम्यान एस्कोबारच्या टोळीचा एक भाग कॅली कार्टेल त्याच्यापासून वेगळा झाला आणि लवकरच ड्रग व्यवसायातील नवीन खेळाडू बनला. त्यांना ड्रग्स अमेरिकेमध्ये पोहोचवण्यासाठी एक चांगला मार्ग हवा होता. तेव्हा त्यांनी येस्टरशी संपर्क साधला आणि टारझन आणि आल्मेडा सोव्हिएत नौदलाची कार्यरत पाणबुडी त्यांना खरेदी करून देतील का, म्हणून विचारणा केली.
येस्टरने मोठी रक्कम सांगत कॅली कार्टेलला ५० दशलक्ष डॉलर खर्च येईल असं सांगितलं. मात्र जेव्हा त्यांनी सांगितलं की प्रत्येक फेरीला किमान ४० दशलक्ष डॉलर किमतीचा कोकेन ते पाठवू शकतील, तेव्हा कॅलीने डील पक्की केली. त्यानंतर येस्टरने टारझनशी संपर्क साधत माहिती दिली आणि त्याचे रशियातील कॉन्टॅक्ट वापरून अशी सबमरीन शोधण्यास सांगितलं.
टारझनने शोधाशोध केली आणि दोन दिवसांनी त्याला कॉल आला.
“तुम्हाला क्षेपणास्त्रांसह पाणबुडी हवी आहे की त्याशिवाय?”
असं वाक्य ऐकू आलं. टारझन आणि आल्मेडा रशियामध्ये गेले. आणि त्यांना आश्चर्य वाटलं जेव्हा रशियाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना सबमरीन दाखवण्यासाठी खूप गुप्त पद्धतीचा अवलंब केला गेला. कारण ते जे कार्य करत होते ते इतर देशांच्या कायद्यानुसार अतिशय बेकायदेशीर होतं.
इतकं गुपित असताना ही डील केल्यावर त्याचा काही तरी पुरावा असावा म्हणून टारझन आणि आल्मेडा यांनी सबमरीनसोबत एक फोटो काढण्याचा आग्रह केला. मात्र रशियन अधिकाऱ्यांनी साफ नकार दिला. तेव्हा टारझनने त्यांना २०० अमेरिकन डॉलरची ऑफर दिली. तेव्हा त्या अधिकाऱ्याने स्वतः फोटोमध्ये टारझनसोबत पोज दिली.
टारझन आणि आल्मेडा यांनी त्यांचं काम केलं होतं. आता त्यांना पुढच्या प्रक्रियेसाठी गरज होती येस्टर आणि कॅली कार्टेलची.
दरम्यान अमेरिकेचं गुप्तहेर खातं टारझनवर खूप काळापासून लक्ष ठेवून होतं. त्याचा एक भाग म्हणजे एका व्यक्तीची टारझनसोबत ओळख करून देण्यातही यश मिळवलं होतं. हा व्यक्ती म्हणजे अमेरिकेचा गुप्त अधिकारी होता. त्याने टारझनला एक फोन देखील दिला होता ज्याने त्यांच्या सगळ्या कॉल्सवर लक्ष ठेवलं जात होतं.
हा टारझनला पहिला धोका होता.
तर दुसरीकडे येस्टरने देखील टारझनला धोका दिला होता. त्याने नेमकं किती रुपयांमध्ये व्यवहार झाला, पैसे कसे येणार हे तर सांगितलं नव्हतंच मात्र आलेले पैसे देखील त्याने गडप केले होते.
लवकरच कॅली कार्टेल मायामीमध्ये आला. येस्टर आणि त्याचे पैसे शोधायला. आता इकडे टारझन आणि आल्मेडा यांना देखील काहीच माहित नव्हते. त्यांनी फक्त त्यांच्या साईडने डील केली होती.
नंतर टारझन, आल्मेडा आणि येस्टर तिघांनाही कसतरी ड्रग सबमरीन प्रकरणातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला. तिघांनाही जेल झाली. टारझन आणि येस्टर दोघांना त्यांच्या इतर गुन्ह्यांसाठी मोठा कारावास झाला. तर आल्मेडाला ड्रग कार्टेल आणि रशियातील व्यवहारांच्या संबंधांतून अटक झाली, ज्याची साक्ष टारझनने दिली होती. मात्र नंतर टारझनने आपली साक्ष मागे घेतली तेव्हा आल्मेडाला मुक्त करण्यात आलं.
अशाप्रकारे या रशियन पठ्ठ्याने जवळजवळ रशियाची सबमरीन कोलंबियाच्या ड्रग टोळीला विकली होती.
हे ही वाच भिडू :
- महालक्ष्मी पापामणी: कोटींचं साम्राज्य झोपडपट्टीतून चालवणारी मुंबईची श्रीमंत ड्रगलॉर्ड
- अशोक सोलोमनने केलेले ड्रग्स कांड भारतातच नाही तर अमेरिकेतही चर्चेचा विषय आहेत….
- ड्रग्सची तस्करी सोडा, आता भारताच्या सीमेवरून कफ सिरपचीही तस्करी सुरूय!