लोकं म्हणतात, बुशरा बीबी काळी जादू करण्यात एक्स्पर्ट आहे…तिच्याकडे जिन्न आहे…

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं घर, तिकडच्या भाषेत ‘वजीर ए आलम’ इम्रान खान फुल टेन्शनमध्ये, त्याच्या आजूबाजूचे नोकर त्याला सरबत देतायत, खायला खजूर देतायत, मात्र तो ग्लास ढकलून देतो, खजूर फेकून देतो. फुल टेन्शनमध्ये इकडे तिकडे येरझाऱ्या मारतो…

‘आपलं सरकार कसं वाचणार?’ असा प्रश्न उर्दूत जोरजोरात विचारतो. त्याच्या आजूबाजूची जनताही फुल टेन्शनमध्ये…

तेवढ्यात एक बाई दार उघडून येते, अंगभर बुरखा, फुल कॉन्फिडन्स असलेलं चालणं, पुढंमागं चालणारी माणसं. असला रुबाब बघून इम्रान पण ठसतोय. घाबरुन दोन पावलं मागे जातोय. पॅसेजमधल्या आरशांमध्ये सगळ्यांचे चेहरे दिसतात… फक्त त्या बाईचा नाही.

ठरलेल्या जागी बाई खाली बसते, आजूबाजूला जिवंत कोंबडे असतात, बुरख्यामागूनही तिच्या डोळ्यातली आग दिसून येत असते आणि ती उर्दूतुन काहीबाही बोलायला लागते, तिच्याकडे असलेले दोन जिन्न प्रकट होतात आणि ती त्या दोघांना कोंबड्यांचं अमिष दाखवून आपल्या इच्छा पूर्ण करायला सांगते.

आजूबाजूची सगळी जनता हँग, फक्त एक माणूस सोडून… तिचा नवरा… इम्रान खान.

तुम्ही म्हणाल भिडूला येड लागलंय का? पिक्चरची स्टोरी सांगतोय की हवेत गप्पा हाणतोय..? पण भिडू कधी तुमच्याशी खोटं बोललाय का? आज पाकिस्तानात कुणालाही विचारा, तुम्हाला सगळ्यांकडून हीच स्टोरी ऐकायला मिळेल. 

या स्टोरीत दोन कॅरॅक्टर्स मेन आहेत, सध्याचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची जादूटोण्यासाठी कुप्रसिद्ध असलेली बायको, बुशरा बीबी उर्फ पिंकी पीरनी.

सध्या पाकिस्तानमध्ये लय राडा चालूये. इम्रान खानचं पंतप्रधानपदही धोक्यात आलंय. अविश्वास ठराव जिंकणं इम्रान सरकारला भाग असलं, तरी ते सहज शक्य होईल असं वाटत तर नाही. आता सरकार बहुमतात बसत नसेल, तर आपल्याकडे आमदार-खासदार फोडतात, रिसॉर्ट पॉलिटिक्स करतात… हजार लडतरी.

पाकिस्तानमध्ये मात्र चर्चाय की, इकडं जादूटोणा पॅटर्न वापरला जातोय, तेही वजीर ए आलम यांच्या बायकोकडून.

आता लय रिक्षा फिरवत नाय, बुशरा बीबी आणि इम्रान खान यांच्या लव्हस्टोरीवर येऊ…

चिकनाचोपडा इम्रान खान म्हणजे कधीकाळी प्लेबॉय होता. त्यानं याआधी दोन लग्न केली आणि दोन्ही गाजली. पण बुशरा बीबी सोबत झालेलं तिसरं लग्न सगळ्यात वाढीव आणि चर्चेचा विषय ठरलं. बुशरा बीबीचं खावर मनेका या मंत्रीपुत्राशी लग्न झालेलं होतं. इम्रान पाकपट्टनच्या संत बाबा फरीद यांच्या दर्ग्यात जायचा, तेव्हा त्याचं मनेका कुटुंबियांकडे राहणं व्हायचं. बुशरा बीबी अध्यात्मिक गुरु असल्यानं इम्रानही तिचं मार्गदर्शन घ्यायचा. २०१५ पासून त्यांची भेट होत असली, तरी इम्रान यांनी बुशरा बीबीचा चेहरा पाहिला नव्हता. त्यात बुशरानं केलेलं राजकीय भाकीत खरं ठरल्यानं, इम्रानच्या मनात तिच्यासाठीची जागा आणखी पक्क्की झाली.  

असं म्हणलं जातं की, अशातच बुशरा बीबीला स्वप्न पडलं. इम्रानचं लग्न तिच्या कुटुंबामध्ये झालं, तर तो पाकिस्तानचा पंतप्रधान बनू शकतो. त्यामुळं तिनं इम्रानला दोन स्थळं सुचवली. आपल्या पोरीचं आणि आपल्या बहिणीचं.. पण इम्रानला या दोघींशी लग्न करण्यात रस नव्हता. 

त्यानं जिचा चेहराही बघितला नाही, अशा बुशरा बीबीला लग्नासाठी विचारलं. तिनं आपल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन २०१८ मध्ये इम्रानशी लग्न केलं.

ॲलेक्सा गाणं लाव, तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय…

तर आता निवांत रुपाच्या चांदण्यात न्हायचं सोडून, इम्रान आणि बुशराच्या नात्यातले राडेच समोर आले. दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या, ते दोघं वेगळे होणार असल्याच्या बातम्या किरकोळ ठरल्या. कारण त्यापेक्षा वाढीव कांड बुशरानं केल्याच्या चर्चा आहेत.

खरं खोटं कुणालाच माहीत नाय, पण लोकं म्हणतात

बुशरा बीबी काळी जादू करण्यात एक्स्पर्ट आहे.

पाकिस्तानात एक अफवा पसरलेली की, बुशरा बीबीचा चेहरा आरशात दिसत नाही. नंतर समजलं ही उगाच कुणीतरी सोडलेली पुडी आहे.

तिकडच्या विरोधी पक्षांच्या आरोपानुसार, इम्रान आपला सगळा कारभार बुशराला विचारुनच करतो. अधिकाऱ्यांची नियुक्तीही बुशराच्या इशाऱ्यानुसारच ठरते. त्यासाठी तिनं गडगंज लाच घेतल्याचेही आरोप झाले आहेत. ती लोकांमध्ये फारशी मिसळत नाही, सोशल मीडिया वापरत नाही. तिच्यामुळं पहिल्यांदाच पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पत्नी बुरख्यात राहणारी आहे. इम्रानच्या पक्षावर त्याच्यापेक्षा जास्त होल्ड बुशरा बीबीचा आहे आणि म्हणूनच इम्रानचं राजकीय भवितव्य ठरवताना… त्याची बायको आणि अध्यात्मिक गुरू बुशरा बीबी काय जादू करते, याची पाकिस्तानात चर्चा आहे.

आणि याच जादूच्या प्रयोगांमुळं ती लोकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे…

बुशरा बीबी जादूटोणा करत असल्याच्या बातम्या तिकडं चवीनं चघळल्या जातात. तिनं लष्करप्रमुखांविरोधात चेटूक केल्याच्या, जंगलात पोलिसांना सापडलेली चेटूक करणारी माणसं तिची असल्याच्या चर्चा रंगलेल्या. 

सध्या इम्रानची खुर्ची धोक्यात आलेली असताना, बुशरा बीबी आपल्याकडं असलेल्या कथित दोन जिनीला घेऊन काय करामत करते? ती खरंच कोंबड्यांना जिवंत जाळून त्यांचं मांस जिन्नला अर्पण करते का? आणि एवढ्या सगळ्या लडतरी करुन, इम्रानचं सरकार वाचतं का? हे जरा जपून का होईना पण पाहावं लागणार आहे.

सरकार पडलं तर जाऊद्या, पण टिकलं तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्त्री असते… ही गोष्ट चेहरा न बघता लग्न करणाऱ्या इम्रानच्या बाबतीत फिक्स खरी ठरणार.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.