BCCI नं आणलेला ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा नियम सगळ्या क्रिकेटचं रुप बदलू शकतोय…

डिसेंबर २०२० ची भारताची ऑस्ट्रेलिया टूर आठवते का ? याच दौऱ्यातल्या टी२० सिरीजच्या पहिल्याच मॅचमध्ये एक खतरनाक किस्सा झाला होता.

भारताची पहिली बॅटिंग होती. बॉल चांगला वळत होता. भारताची मिडल ऑर्डर सप्पय गंडली होती, अशावेळी तारणहार ठरला तो रविंद्र जडेजा. त्यानं २३ बॉलमध्ये नॉटआऊट ४४ रन्स मारले आणि भारताचा स्कोअर झाला, १६१ रन्स.

भारताच्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजाच्या मानेला स्टार्कचा बाऊन्सर लागला आणि त्याला मैदान सोडावं लागलं. आता आयसीसीच्या नियमांनुसार मानेला किंवा डोक्याला दुखापत झाली असेल, तर कन्कशन सब्स्टीट्युट म्हणून एक प्लेअर खेळवता येऊ शकतो. भारतानं जडेजाच्या जागी युझवेंद्र चहलला खेळवलं आणि त्यानं टर्निंग ट्रॅकवर ३ विकेट्स काढत भारताला मॅच जिंकून दिली.

जडेजाच्या जागी चहलला खेळवणं, भारतासाठी फायद्याचं ठरलं होतं. पण यावरुन ऑस्ट्रेलियानं लय दंगा केला होता.

हा भला मोठा किस्सा सांगायचं कारण म्हणजे, आता क्रिकेटमध्ये हे वारंवार घडताना दिसू शकतं आणि तेही दुखापतीचा संबंध नसताना. कन्फ्युज झाला असाल… विस्कटून सांगतो.

भारताची देशांतर्गत टी२० स्पर्धा अर्थात सईद मुश्ताक अली स्पर्धेसाठी बीसीसीआय एक नवा रुल आणतंय, तो म्हणजे इम्पॅक्ट प्लेअर. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर, कदाचित आयपीएलपासून इंटरनॅशनल क्रिकेटपर्यंत सगळ्याचं भविष्य बदलू शकतंय.

काय आहे हा रुल..?

फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल या खेळांमध्ये जसे सब्स्टिट्यूट्स असतात, तसाच काहीसा हा प्रकार आहे. मॅचच्या कुठल्याही इनिंगमध्ये दोन्ही टीम्सला आपल्या टीममधला एक प्लेअर बसवून त्याच्या जागी दुसरा प्लेअर खेळवण्याची संधी असेल. मग हा बॅट्समन असेल किंवा बॉलर, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नसलेला एक प्लेअर दुसऱ्या प्लेअरच्या जागी मैदानात उतरु शकतोय.

आता हा प्लेअर साहजिकच जी बाजू कमी पडतीये, ती भरुन काढण्यासाठी मैदानात उतरणार त्यामुळं तो मॅचवर इम्पॅक्ट टाकू शकतो, म्हणूनच या रुलला इम्पॅक्ट प्लेअर असं नाव देण्यात आलंय.

आता याचे नियम समजून घेऊयात –

जेव्हा टॉसच्या वेळी टीम अनाऊन्स केली जाईल, तेव्हा प्लेइंग इलेव्हन सोबतच ४ राखीव खेळाडूंची नावंही द्यायची. कुठल्याही इनिंगच्या १४ व्या ओव्हरच्या आधी राखीव खेळाडूंमधला एक जण मुख्य टीममध्ये दुसऱ्या प्लेअरच्या जागी खेळू शकतो. कुठल्याही टीमला हा प्लेअर एकदाच चेंज करता येईल. इम्पॅक्ट प्लेअर ज्या प्लेअरच्या जागी मैदानात येईल तो मात्र उरलेल्या मॅचमध्ये खेळू शकणार नाही.

जर पाऊस किंवा इतर कारणांमुळे मॅच दहा किंवा त्यापेक्षा कमी ओव्हर्सची खेळवण्यात आली, तर मात्र हा इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू होणार नाही.

जरा लईच किचकट वाटत असलं, तर आपण उदाहरणांसकट पाहुयात…

समजा भारतीय टीमची मॅच सुरू आहे, आपली पहिली बॉलिंग आहे आणि बुमराह लई चुका करतोय. तर चौदा ओव्हर्सच्या भारतीय टीम प्लेईंग इलेव्हनमध्ये नसलेल्या मोहम्मद शमीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बुमराहच्या जागी  टीममध्ये घेऊ शकते. शमी पूर्ण चार ओव्हर्स टाकू शकतो, पण बुमराह उर्वरित मॅचमध्ये खेळू शकणार नाही.

दुसरं उदाहरण द्यायचं झालं, तर समजा आपली पहिली बॅटिंग आहे आणि टॉप ऑर्डरच्या विकेट लईच किरकोळीत गेल्या आणि आणखी एका बॅट्समनची गरज पडतीये म्हणून आपण सब्स्टिट्यूट्समध्ये असलेल्या एका बॅट्समनला टीममध्ये घेऊ शकतो आणि तेही आऊट झालेल्या बॅट्समनच्या जागी.

म्हणजे प्लेईंग इलेव्हनमध्ये असलेल्या आणि आऊट झालेल्या केएल राहुलच्या जागी सब्स्टीट्युट असलेला हार्दिक पंड्या खेळू शकतो. थोडक्यात टीममध्ये एक जास्तीचा बॅट्समन खेळेल, पण मग अकराव्या बॅट्समनला क्रीझवर उतरता येणार नाही, कारण अकराच प्लेअर बॅटिंग करु शकतील हा नियम कायम आहे.

आता याचा फायदा काय होईल ?

तर कुठल्याही टीमचे जिंकण्याचे चान्सेस वाढतील. अपयशी ठरलेल्या प्लेअरच्या जागी चालू मॅचमध्येच दुसऱ्या प्लेअरला संधी मिळेल आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कोण येणार याची उत्सुकता १४ व्या ओव्हरपर्यंत तरी शंभर टक्के कायम असेल.

आता हा इम्पॅक्ट प्लेअर वापरायचा की नाही ? हे पूर्णपणे खेळणाऱ्या टीमच्या हातात असलं, तरी एखादा जास्तीचा बॅट्समन किंवा बॉलर खेळवणं कुठल्याही टीमला फायद्याचंच ठरणार आहे.

साहजिकच कुठली टीम असली भारी संधी सोडणार नाही, अशीच शक्यता सध्या क्रिकेट पंडितांकडून व्यक्त करण्यात येतीये.

याआधी असा नियम आला होता का ?

तर उत्तर आहे हो. आयसीसीनं २००५ मध्ये ‘सुपर सब’ हा नियम आणला होता. या नियमांतर्गत टॉसच्या आधी टीमनं एका सब्स्टीट्युटचं नाव द्यायचं. हा एक प्लेअर मॅचमध्ये कधीही खेळवण्यात येऊ शकत होता. मात्र फक्त एकाच प्लेअरचा पर्याय उपलब्ध असल्यानं टीम्सला या नियमाचा म्हणावा तसा वापर करता आला नाही आणि फक्त ९ महिन्यात आयसीसीनं हा नियम रद्द केला.

त्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बिग बॅश लीगनंही सुपर सब आणि त्यानंतर एक्स फॅक्टर हे नियम आणून बघितले होते. यात १० व्या ओव्हरनंतर एक सब्स्टीट्युट प्लेअर मुख्य संघातल्या खेळाडूच्या जागी खेळू शकतो, असा नियम होता. मात्र सुपर सबला फार यश मिळालं नाही, कारण इथं दोन प्लेअर्सचा पर्याय देण्यात आला होता.

त्यामुळं बीसीसीआयनं आपल्या ‘इम्पॅक्ट प्लेअर’च्या नियमात चार प्लेअर्सपैकी एक प्लेअर निवडण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. 

त्यामुळं फक्त एक स्पेशालिस्ट बॉलर किंवा स्पेशालिस्ट बॅट्समनवर अवलंबून न राहता मॅचमधल्या परिस्थितीचा, पिचचा आणि टीमच्या नेमक्या गरजेचा अंदाज लाऊन एक प्लेअर मैदानात उतरू शकतोय.

सध्या तरी बीसीसीआयनं आयपीएल किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हा नियम आणायचा विचार नसल्याचं सांगितलं असलं, तरी सईद मुश्ताक अली स्पर्धेत ‘इम्पॅक्ट प्लेअर’ला यश मिळालं तर हा नियम फिक्स पुढं येऊ शकतोय. सईद मुश्ताक अली स्पर्धेत चमकलेले अनेक सितारे पुढं जाऊन आयपीएलमध्ये दिसतात, त्यामुळं हा नियम त्यांच्या करिअरवरही किती इम्पॅक्ट टाकणार ? हे बघावं लागणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.