शिवेंद्रराजे खरंच राष्ट्रवादीमध्ये जावू शकतात का?

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीमधून बाहेर गेलेल्या बड्या नेत्यांची घरवापसी होणार असल्याचा दावा केला. या दाव्याला निम्मित ठरलं ते गेल्या रविवारी भाजपचे साताऱ्याचे आमदार आणि छत्रपती घराण्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची घेतलेली भेट.

त्यामुळे या भेटीनंतर आणि नवाब मलिक यांच्या दाव्यानंतर अवघ्या ६ महिन्यांपूर्वी भाजपमध्ये गेलेले छ. शिवेंद्रराजे खरचं राष्ट्रवादीमध्ये जावू शकतात का? असा प्रश्न उपस्थित झाला.

छ. शिवेंद्रराजे भोसले हे सध्या भाजपच्या तिकिटावर सातारा-जावळी या मतदारसंघातून आमदार आहेत. या ठिकाणाहून ते सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वी तीनवेळा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडून येत होते.

राष्ट्रवादीमध्ये असताना ते शरद पवार आणि अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे. २००४ साली पहिल्यांदा अजित दादांनीच शिवेंद्रसिंहराजेंना आपल्यासोबत घेतले. त्याच वेळच्या लोकसभा निवडणूकीत सातारा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार लक्ष्मणराव जाधव यांना १० हजारांचे लीड मिळाले होते.

त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अजितदादांनी शिवेंद्रसिंहराजे यांना तिकीट देत उदयनराजे यांचा पराभव करून ती निवडणूक जिंकली होती.

त्यानंतर ते सातत्याने २०१९ पर्यंत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येत होते.

पुढे छ. उदयनराजे देखील राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले. २००९ साली ते खासदार देखील झाले.

पण साताऱ्यातील राजकीय जाणकार सांगतात त्यानुसार,

अजितदादा आणि उदयनराजे यांच्या वादामुळे शिवेंद्रसिंहांना कायमच अजितदादा गटाकडून आणि एकूणच राष्ट्रवादी पक्षाकडून ताकद पुरवण्याचे काम झाले होते. त्याबदल्यात शिवेंद्रराजेंनी देखील जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष चांगला वाढवला होता.

पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपची हवा ओळखून शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाला शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्या वादाची देखील पार्श्वभूमी होती. दोघेही एकाच पक्षात असून देखील स्थानिक पातळीवर एकत्रिपणे काम करणं अशक्य होतं.  मात्र शिवेंद्रराजेंच्या भाजपप्रवेशानंतर काही दिवसातच उदयनराजे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. या नंतर शिवेंद्रराजेंची अवस्था सासूपायी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली अशी झाली.

सातारच्या दोन्ही वारसरदारांमुळे संपूर्ण छत्रपती घराणे भाजपमध्ये आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर समाधान व्यक्त केले होते.

तसेच सत्ता आल्यानंतर शिवेंद्रराजेंना मंत्रिपद देण्याची घोषणा देखील केली होती.

पण राज्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीची सत्ता आली आणि शिवेंद्रराजेंचं संभाव्यमंत्रीपद हुकलं.

सध्या काय चालू आहे?

पण मागील जवळपास १ महिन्यांपासून शिवेंद्रसिंह राजे हे पुन्हा एकदा जाहीरपणे राष्ट्रवादीच्या संपर्कात आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या रविवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार – शिवेंद्रराजे यांची भेट झाली.

या दोघांमध्ये गेल्या महिनाभरात झालेली ही तिसरी भेट होती.

भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले होते. केवळ मतदारसंघातील कामानिमित्त अजितदादांना भेटायला आलो होतो. बाकी काहीही विषय नाही, असे त्यांनी सांगितले होते.

मात्र, ही भेट बंद दाराआड झाल्याने शिवेंद्रराजे भोसले घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची चांगलीच चर्चा रंगली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी शिवेंद्रराजे किती महत्वाचे आहेत?

छत्रपती घराण्याच्या दोन गाद्या आहेत. एक सातारा आणि एक कोल्हापूर. सातारा गादीचे वारसदार म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले. तर कोल्हापूर गादीचे वारसदार म्हणजे छत्रपती संभाजीराजे.

पूर्वी हे तिन्ही राजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते.

पण सध्या तिघे देखील भारतीय जनता पक्षात आहेत. पैकी कोल्हापूरचे संभाजीराजे हे राष्ट्रपतीनियुक्त खासदार असल्याने आपण अधिकृतरित्या भाजपमध्ये नसल्याचे सांगत असतात.

मात्र छत्रपती घराण्यातील एक तरी राजे आपल्यासोबत असावेत असे राष्ट्रवादीचे गणित असण्याची शक्यता आहे.

सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला

दुसरीकडे सातारा हा पूर्वीपासून काँग्रेस आणि १९९९ नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहापैकी तब्बल नऊ जागा राष्ट्रवादीने पटकावल्या होत्या. तसेच दोन्ही खासदार देखील राष्ट्रवादीचेच निवडून आले होते. १९९९ नंतर सातारचे खासदार देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येत आहेत.

२०१४ साली देखील जिल्ह्यातील विधानसभांच्या ८ पैकी तब्बल ५ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. तर २०१९ मध्ये छ. उदयनराजेंनी पक्षांतर केल्याने झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता.

पण दोन्ही राजेंच्या पक्षांतराचा परिणाम जिल्ह्यात राष्ट्रवादीवर झालेला पाहायला मिळाला होता.

जरी उदयनराजेंचा पराभव झाला असला तरी राष्ट्रवादीचे ५ पैकी २ आमदार कमी झाले होते. त्यानंतर या वर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निकालावर देखील याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात भाजपने देखील दखल घेण्यासारख्या ग्रामपंचायती जिंकल्या होत्या.

त्यामुळे जिल्ह्यात कमी झालेली ताकद परत मिळवण्याचा देखील राष्ट्रवादीचा प्रयत्न असण्याचे शक्यता नाकारता येत नाही.

आता या सगळ्या शक्यता गृहीत धरून या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आम्ही सातारा पुढारीचे संपादक हरीश पाटणे यांच्याशी संपर्क साधला.

ते बोल भिडूशी बोलताना म्हणाले, 

शिवेंद्रराजे ही चूक करणार नाहीत. जरी माध्यमांमध्ये अशा चर्चा असल्या तरी ते अजित पवारांना केवळ विकास कामासाठीच भेटत असावेत, कारण साताऱ्यात बऱ्याच वर्षांपासून मेडिकल कॉलेजचा प्रश्न प्रलंबित आहे, सोबतच कास तलावाची उंची वाढवणं अशा गोष्टी आहेत, आणि त्या शिवेंद्रराजेंच्या मतदार संघात देखील येतात.

या बरोबरच अजित दादा आणि शिवेंद्रराजे यांचे फार पूर्वीपासून घनिष्ट संबंध आहेत, यामुळे आता जरी ते भेटले असले तरी त्यात विशेष गोष्ट मानण्याचे कारण नाही.

आता राहिला प्रश्न शिवेंद्रराजे राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा, तर सातारा लोकसभा मतदार संघाचा उदयनराजे भोसलेंचा पूर्वानुभव लक्षात घेता आणि इथल्या अंतर्गत राजकारणाचा विचार करता शिवेंद्रराजे अशी रिस्क आता घेणार नाहीत. कारण पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना परत निवडून यावे लागेल.

अशावेळी त्यांचा मतदारसंघ दोन तालुक्यात येतो. एक सातारा आणि दुसरा जावळी. इथे दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे वेगवेगळे गट आणि त्यांचं अंतर्गत राजकारण यातून शिवेंद्रराजेंना विरोध होवू शकतो. सोबतच जिल्हा बँकेमधील सत्ता हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.

आता सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला आणि ते पक्षात गेले तर राष्ट्रवादी त्यांचं स्वागतच करेल पण, सध्या तरी शिवेंद्रराजे भाजप सोडून जाण्याची रिस्क घेणार नाहीत असं दिसत, असंही पुढारीचे संपादक हरिष पाटणे यांनी सांगितलं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.