ट्विटर एखाद्याच अकाउंट कायमच सस्पेंड करू शकतं का? जस कंगनाच केलंय.

बॉलिवूडची टिवटिवाट क्वीन कंगना रणावतच ट्विटर अकाउंट ट्विटरने कायमचं ‘बंद’ म्हणजेच ‘डिलीट’ म्हणजेच ‘निलंबित’ म्हणजेच ‘सस्पेंड’ केलं. बंगालमधील मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल तिने ट्विट केलं होत आणि सोबतीला हिंसाचाराच्या घटनांना खतपाणी मिळेल, किंवा आपण त्याला एखाद्या समजला चिथावणी देणार वक्तव्य असं सुद्धा म्हणू शकतो, तर असं ट्विट तिनं केलं होत. त्याबदल्यात ट्विटरने कारवाई करीत तीच अकाउंटच बंद केलं.

काय म्हणणं आहे ट्विटरच??

ट्विटरन प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, आपली बाजू मांडताना म्हटल आहे की,

“आम्ही यापूर्वीही स्पष्ट केले आहे की, एखाद्याच्या वक्तव्याने किंवा वर्तनामुळे समाजात हिंसाचार/ हानी होणार असेल तर त्यावर आम्ही कठोर कारवाई करू. आम्ही संदर्भित खाते (कंगनाचे) कायमचे निलंबित केले आहे कारण त्यावरून वारंवार घृणास्पद, अपमानास्पद वक्तव्य प्रसारित होत असून, ही वर्तणूक ट्विटरच्या धोरणाचे वारंवार उल्लंघन करते. आम्ही पुरवत असलेल्या सेवा आणि त्यांचे नियम प्रत्येकासाठी न्यायालयीन आणि निःपक्षपातीपणाच्या अधीन राहून लागू करण्यात येतात. ”

इथं ट्विटरच्या निपक्षपातीपणाची नोंद घ्यायची झाल्यास एक घटना सांगावी लागेल. अमेरिकेच्या राजधानीत दंगल सुरू असताना ट्विटरने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटबद्दल त्यांचे ट्विटर अकाउंट कायमचे सस्पेंड केले होते.

ट्विटर एखादे अकाउंट ‘कायमचे सस्पेंड ’ कधी करते?

‘कायमस्वरुपी निलंबन’

ट्विटरच्या धोरणानुसार, ही कंपनीची सर्वात कठोर पॉलिसी आहे. ट्विटर केवळ अकाउंट बंद करूनच थांबत नाही तर अकाउंट बंद करण्यात आलेल्या व्यक्तीला नवीन अकाउंट तयार करण्याची परवानगी नाकारण्यात येते. याचा अर्थ असा आहे की कंगना पुन्हा टिवटिवाट करायला नवीन अकाउंट काढू शकणार नाही.

ट्विटरने आपल्या नियमात असे म्हटले आहे की जेव्हा एखादे अकाउंट कायमचे निलंबित करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा त्या अकाउंटच्या युजरला त्याने केलेल्या गैरवर्तन तसेच नियमांच्या उल्लंघनाबद्दल आधी सूचित केले जाते. त्यांनतर युजरने कोणत्या धोरणांचे उल्लंघन केले आहे ते स्पष्ट करून मगच अकाउंट सस्पेंड केले जाते.

या निलंबनाच्या विरोधात कंगना अपील करू शकते का?

तर याच उत्तर आहे होय.. ट्विटरच्या पॉलिसीचे उल्लंघन करणार्‍यांना ट्विटर अपील करू देते कारण त्यांच्या मते ‘पर्मनंट सस्पेन्शन’ ही सर्वात कठोर शिक्षा आहे. यासाठी ट्विटरच्या सपोर्ट पेजवर जाऊन “प्लॅटफॉर्म इंटरफेसद्वारे किंवा रिपोर्ट दाखल करून” अपील करता येते. जर ट्विटरला हे सस्पेन्शन वैध आढळल्यास ट्विटर,अकाउंट का सस्पेंड केले? या माहिती आधारे केलेल्या अपीलाला प्रतिसाद देते.

ट्विटरने कंगनाच्या खात्यावर इतर कोणती कारवाई केली असावी का ?

बेसिकली एखादे भडकाऊ अपमानास्पद ट्विट एखाद्या विशिष्ट देशासाठी हाईड केले जाते. किंवा मग ट्विटर त्या विशिष्ट ट्विटची रिच देखील कमी करू शकते. पण कंगनाचे अकाउंट बंद कराव लागल कारण एव्हाना ‘पाणी डोक्यावरून गेलं होत’

काही प्रसंगात ट्विटर एखाद्याचे अकाउंट फक्त रिड ओन्ली मोडमध्ये पण ठेवते. परंतु हे नियम केवळ अशा अकाउंटला लागू पडतात जी ‘अदरवाईज हेल्दी अकाउंट’ असतात. व अशा परिस्थितीत ट्विटर एखाद्या अकाऊंटच्या ट्वीट, रीट्वीट करण्याच्या क्षमतेस मर्यादित करतो. या मोडमध्ये ज्यांचं अकाउंट असत ती व्यक्ती मॅसेज या ऑप्शनचा पण वापर करू शकते.

रिपोर्ट पेजवर दिलेल्या माहितीनुसार या कारवाईचा कालावधी उल्लंघनाच्या स्वरूपावर अवलंबून असतो जस कि 12 तास ते 7 दिवस.

कंगनाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ट्विटरने तिला तिच्या ट्विट वरून वारंवार इशारा दिला होता. तसेच तीच अकाउंट हे निनावी नव्हते तर तिला ३ मिलियन लोक फॉलो करत होते. त्यामुळे वारंवार इशारा देऊनही तिने समाजात तेढ निर्माण होईल असे ट्विट केल्याच्या कारणावरून ट्विटरने तिचे अकाउंट सस्पेंड केले. याआधी कंगनाची बहीण रंगोली चंदेल, पायल रोहतगी यांचे अकाउंट ‘हेट स्पीच’ याच कारणावरून सस्पेंड करण्यात आले होते.

तसेच सध्या सस्पेंड होण्यासाठी रांगेत आहेत कपिल मिश्रा, बबिता फोगट, नुपूर शर्मा, तेजिंदर पाल सिंग बग्गा. त्यामुळं यांचा नंबर लागल्यास आश्चर्य वाटायला नको. बाकी यांच्यात एक साम्य आहे ते म्हणजे हे सगळेच भाजपवासी आहेत बरं..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.