जगात कॅन्सरवरचं औषध शोधणारा पहिला सायंटिस्ट भारतीय होता..

आज कोरोनाच्या संकटात वैद्यकीय क्षेत्राचं महत्व सगळ्यांना कळतंय. या अतिभयंकर महामारीच्या फटक्यात जगभरातील लाखो डॉक्टर्स, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी राबत आहेत, हजारो संशोधक या रोगावरचा उपाय शोधण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून विक्रमी वेळेत लस आता समोर येत आहे. कोरोनाला मानवजातीने यशस्वीपणे झुंज दिली असच म्हणावं लागेल.

अगदी शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट पाहिली तर साध्या तापानं देखील लोक मरायचे. अगदी साधा वाटणारा जंतुसंसर्ग घातक ठरायचा. कॅन्सर हा रोग तर काल परवा पर्यंत दुर्धर समजला जात होता. आजही त्यावर ठोस उपाय सापडला आहे असं नाही पण अनेक आधुनिक औषधें कॅन्सर पीडित रुग्णांचे जगणे सुसह्य करत आहेत.

पण आपल्या पैकी अनेकांना ठाऊक नसते की जगात कॅन्सर वर पहिलं औषध शोधणारा संशोधक एक भारतीय होता,

त्याचं नाव डॉ. येल्लप्रगडा सुब्बाराव!

सुब्बाराव हे मूळचे आंध्रप्रदेशचे. त्यांचा जन्म एका अत्यंत कुटुंबात झाला. एकूण सात भावंडे. रोजच्या जेवणाचेही खात्री नसायची. या गरिबीला कंटाळून अगदी लहान वयातच सुब्बाराव घर सोडून पळाले आणि थेट वाराणसी गाठली. कारण काय तर त्यांना संन्याशी व्हायचं होतं. या तेरा चौदा वर्षांच्या छोट्या मुलाची एका साधूने समजूत काढली मोठा होऊन डॉक्टर हो असा आशीर्वाद दिला आणि पुन्हा घरी पाठवून दिलं.

येल्लाप्रगाडा सुब्बाराव यांनी साधू चा आशीर्वाद खरा करण्याचा चंग बांधला. अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी झटपट सुरु केली. मॅट्रिकची परीक्षा पास होण्यासाठी त्यांना तीन प्रयत्न करावे लागले पण त्यांनी जिद्द सोडली नव्हती.

पुढे मेडिकल कॉलेजला जायचं तर फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते पण त्यांच्या सासऱ्यांनी मदत केली आणि सुब्बाराव यांना मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेता आला.

मेडिकल कॉलेजमध्ये ते हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे. त्यांना शिकवणारे बहुतांश शिक्षक हे इंग्रज होते. स्वातंत्र्यलढ्याचा काळ. गांधीजींच्या चळवळीने अख्खा देश भारावून गेला होता. आसपासचं वातावरण पेटलेलं पाहून सुब्बाराव यांचं देखील रक्त सळसळायचं पण काही करता येत नव्हतं. पण ब्रिटीश सरकारचा आपल्या तात्विक पातळीवर निषेध म्हणून सुब्बाराव यांनी खादीचे कपडे वापरण्यास सुरवात केली.

त्याकाळी खादीला काँग्रेसचे कपडे मानले जायचे. कॉलेजला हे कपडे घालून येणाऱ्या सुब्बाराव यांना पाहून ब्रिटिश शिक्षकांना त्यांच्याबद्दल राग येऊ लागला. त्यातूनच त्यांच्या एका प्राध्यापकाने सुब्बाराव यांना मुद्दाम सर्जरीच्या परीक्षेत कमी मार्क दिले. ऐनवेळी त्यांनी हा सूड उगवला याचा परिणाम त्यांना MBBS पूर्ण पदवीऐवजी LMS  ही दुय्यम डिग्री मिळाली.

सुब्बाराव निराश झाले नाहीत. परिस्थितीशी लढा देऊन त्यांना एवढं कणखर बनवलं होतं की या गोष्टींचा फरक पडायचं त्यांना कमी झालं होतं. आपण डॉक्टर बनू  त्यांनी समाधान मानलं.

पुढे एका आयुर्वेदिक कॉलेजमध्ये त्यांनी प्रोफेसर म्हणून नोकरी पकडली. याच क्षेत्रात मोठे संशोधन करायचा त्यांचा विचार चालला होता मात्र अचानक एका घटनेमुळे त्यांचं अख्ख आयुष्य बदलून गेलं.

एकदा त्यांच्या कॉलेजमध्ये अमेरिकेतून एक डॉक्टर व्हिजिट साठी आला होता. त्याची सुब्बाराव यांच्याशी ओळख झाली. त्यांची असीम बुद्धिमत्ता व संशोधन क्षेत्रात गती ओळखून अमेरिकेत येणायच आमंत्रण दिलं. इंग्रजांच्या पारतंत्र्यात सुब्बाराव यांच्या प्रतिभेला वाव मिळणार नाही याची जाणीव त्यांना करून दिली. त्या डॉक्टरच्याच सल्ल्याने सुब्बाराव यांनी अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

एमबीबीएस डिग्री नसल्यामुळे त्यांना स्कॉलरशिप नाकारण्यात आली पण मित्रांनी काही एनजीओ व सासरे यांच्या मदतीने प्रवासापुरते पैसे गोळा झाले आणि सुब्बाराव अमेरिकेला निघाले.

अनोळखी प्रदेश, खिशात एक फुटका रुपया नाही, राहायला छप्पर देखील नाही. पण सुब्बाराव यांनी हार मानली नाही. विद्यापीठाच्या जवळच असलेल्या एका छोट्याशा हॉस्पिटलमध्ये त्यांनी नोकरी पकडली. तिथे त्यांना अक्षरशः कंपाउंडरची कामे करावी लागली. पेशंटची अंथरुणे बदलण्यापासून ते टॉयलेट स्वच्छ करण्यापर्यंत पडेल ते काम केलं. पोटापाण्यासाठी त्यांना हे करावं लागलं. जिद्दी सुब्बाराव यांनी हार मानली नाही. ज्या ध्येयासाठी ते अमेरिकेत आले होते ते त्यांनी यशस्वी रित्या पूर्ण देखील केलं.

हार्वर्डमध्येच बायो केमिकल डिपार्टमेन्टमध्ये त्यांना लेक्चरर म्हणून नोकरी मिळाली.या डिपार्टमेंटमध्येच रिसर्च करताना सुब्बारावांनी अनेक महत्वाचे शोध लावले. तिथले डीन असलेले सायरस फिस्के यांच्या सोबत त्यांनी लिहिलेला सजीवांच्या शरीरात फॉसफरस चे महत्व सांगणारा रिसर्च पेपर प्रचंड गाजला.

याला ‘फिस्के-सुब्बाराव मेथड’ म्हणून ओळखलं गेलं.

त्यांच्या या रिसर्चचा रेफरन्स आजही वापरला जातो. या अभ्यासाचा वापर करून अनेकांनी नोबेल देखील मिळवले पण सुब्बाराव यांचे सिनियर सायरस फिस्के याने त्यांना नोबेल मिळू दिला नाही. एवढंच काय त्यांना हार्वर्डमध्ये देखील प्रमोशन मिळू दिल नाही. सुब्बाराव यांचं मोठेपण असं की अखेर पर्यंत त्यांनी फिस्के यांचं आपल्याला घडवण्यात श्रेय आहे असं सांगत राहिले.

१९४० मध्ये सुब्बारावांनी हार्वर्डचा राजीनामा दिला आणि लेडरले लॅबोरेटरीज्मध्ये ते रिसर्च डायरेक्टर पदावर रुजू झाले.

आज जगातील सर्वात मोठी समजली जाणारी फायझर या औषध कंपनीशी संबंधित हि कंपनी. या कंपनीने सुब्बाराव यांच्या संशोधनासाठी लागेल तो निधी व स्वातंत्र्य दिले. सुब्बाराव यांच्या रिसर्चचा तो उत्कर्षाचा काळ. याच काळात त्यांनी जगाचे आरोग्यशास्त्र बदलणारे शोध लावले.

पेनिसिलिनचा शोध लावणाऱ्या अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या संशोधनात भर घालत डॉ. सुब्बारावांनी टेट्रासाइकलिन हे अँटी बायोटिक्स शोधून काढले. पेनिसिलीन पेक्षाही जास्त उपकारक अशी त्याची ओळख बनली. जगभरातील करोडो लोकांचे प्राण वाचवण्यास हे औषध उपयोगी ठरले.

नव्वदच्या दशकात महाराष्ट्र व गुजरातमध्ये धुमाकूळ घातलेल्या प्लेगला नियंत्रणात आणून संपवून टाकण्यासाठी वापरण्यात आलेलं डॉक्सीसायक्लिन हे औषधदेखील डॉ. सुब्बारावांचीच देण आहे.

गर्भवती महिलांसाठी व बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी अत्यंत आवश्यक समजले जाणारे फॉलिक अ‍ॅसिड या अत्यंत महत्त्वपूर्ण अन्नद्रव्याचा शोधदेखील सुब्बाराव यांनीच लावला.

ते लहान असताना एकदा त्यांचे दोन भाऊ स्प्रू नावाच्या रोगाचे बळी ठरले होते, सुब्बाराव यांना देखील हा रोग झाला होता पण ते कसेबसे वाचले.  हि गोष्ट त्यांच्या मनात राहिली होती. आपल्या भावांचा बळी घेणाऱ्या या दुर्धर रोगावरील औषध त्यांनीच शोधून काढलं. आज सप्रू हा रोग जगातून नष्ट झालाय याच श्रेय देखील सुब्बाराव यांनाच जाते.

असे अनेक शोध लावले असले तरी सुब्बाराव यांची खरी ओळख म्हणजे कॅन्सरवरील त्यांनी शोधलेलं औषध.

कॅन्सर हा असा रोग आहे ज्याचे पेशी प्रचंड वेगाने वाढत असतात. त्यांच्या पेशी विभाजनावर अनियंत्रित ताबा मिळवता आला तर कॅन्सरशी लढा सोपा होतो. डॉ.सुब्बाराव यांनी याचा प्रचंड अभ्यास केला व काही औषधे शोधून काढली.  डॉ. सिडने फारबर या एका सहकाऱ्याच्या मदतीने लुकेमियाग्रस्त बालकांवर औषधांचे यशस्वी प्रयोग केले.

याच प्रयोगातून कॅन्सर वरील जगातलं पहिलं समजलं जाणारं मेथोट्रकझेट हे औषध विकसित केलं. ते आजही कॅन्सरवरच्या उपचारासाठी वापरलं जातं.

मेथोट्रकझेट फक्त कॅन्सरच नाही तर रुम्हाटाईड आथ्र्रारायटिस, लूपस, सोरायसिस व अस्थमासारख्या आजारांवरही वापरलं जातं. आजही अनेक औषध कंपन्यां मेथोट्रकझेटची दरवर्षी जवळपास ८०० कोटी रुपयांची विक्री करतात. पण दुर्दैव असं की डॉ.सुब्बाराव यांनी कधी याचे पेटंन्ट घेतले नाही.

९ ऑगस्ट १९४८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचा जन्मदेश असलेल्या भारतात या संशोधकाचे महत्व तेव्हा कळले देखील नाही.  प्रसिद्धीपासून दूर व पुरस्कारांपासून वंचित राहिलेल्या सुब्बाराव यांना अमेरिकेतल्या सायन्स, हेराल्ड ट्रिब्युन, न्यूयॉर्क टाइम्स यांसारख्या अग्रगण्य नियतकालिकांनी मात्र श्रद्धांजली वाहिली.

‘वैद्यकीय क्षेत्रातला या शतकातील सर्वोत्तम प्रतिभावंत’ या शब्दांत डॉ. सुब्बारावांचा गौरव केला.

सुब्बाराव यांना कधी नोबेल मिळाले नाही मात्र स्टॉकहोममधील नोबेलच्या मुख्यालयात आजही त्यांचं भलं मोठं पोटर्रेट मोठय़ा दिमाखात लावलेलं दिसतं.

अनेक दुर्धर आजारांवर औषधं शोधणारा हा महान संशोधक त्याला त्याच्या जन्मदेशातही अनके वर्ष उपेक्षाच वाट्याला आली. जवळपास पन्नास वर्षानंतर त्यांच्या कार्याची आठवण होऊन भारत सरकारने डॉ. सुब्बाराव यांच्या सन्मानार्थ १९९५ मध्ये एक टपाल तिकीट काढलं.

फक्त भारताच्याच नाही तर जगभरातल्या सर्वश्रेष्ठ संशोधकांच्या यादीत वरच स्थान असणाऱ्या, कोट्यवधी लोकांचे आयुष्य वाचवणारे औषध शोधणाऱ्या पण तरीही अज्ञात राहिलेल्या या महान वैज्ञानिकाला कोटी कोटी नमन.

संदर्भ- सुयोग सलगरकर लोकसत्ता 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.