उमेदवारी, मैदान ते चिन्ह : “शिंदे-फडणवीस” ठाकरेंना जाणुनबुजून कायद्यात अडकवतात?

शिवसेनेचा पहिला आमदार पोटनिवडणुकीच्या निवडणुकीतच निवडून आला होता. परेल मतदारसंघातून कृष्णा देसाई यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सेनेचे वामनराव महाडिक  निवडून आले होते. वामनराव महाडिक यांचा विजय सेनेला एक सिरीयस राजकीय पर्याय म्हणून उभा राहण्याच्या दृष्टीने महत्वाचा होता.

आता अशीच पोटनिवडणूक सेनेचं भवितव्य ठरवण्याच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे ती म्हणजे अंधेरी पूर्वची विधानसभेची पोटनिवडणूक.

एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाने नवीन चिन्ह आणि नाव घेतल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. मात्र या निवडणुकीच्या आधीच एक ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

याआधी भाजप आणि उद्धव ठाकरे गट अशी निवडणूक होण्याची शक्यता असताना. शिंदे गटाने पुन्हा एक नवीन डाव खेळल्याचा आरोप होत आहे. अंधेरी पूर्वची जागा सेना आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर रिकामी झाली होती. त्यामुळें उद्धव ठाकरे गटाने त्याजागी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली होती.

निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना त्यांच्या मुंबई महानगरपालिकेतील पदाचा राजीनामा देणं भाग होतं.

त्यानुसार त्यांनी तो दिला पण होता. मात्र महानगरपालिकेकडून तो स्वीकारण्यात आलेला नाहीये. त्यातच ऋतुजा लटके यांना शिंदे गट त्यांच्या बाजूने उभा करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे.

आज उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेउन महानगरपालिकेचे आयुक्त सरकारच्या दबावामुळे मुद्दामून हा निर्णय घेत असल्याचा रोप केला आहे. त्यातच मंत्रिपदाची ऑफर देऊन ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना खेचण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे.

त्यानंतर ऋतुजा लटके यांनी त्या ठाकरे गटासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण जर त्यांचा राजीनामा वेळेत मंजूर झाला नाही तर त्यानं निवडणुकीत अर्ज भरता येणार नाहीये. पोटनिवडणुकीच्या अर्ज भरण्यासाठी केवळ दोनच दिवसांचा कार्यकाळ राहिला असल्याने ऋतुजा लटके यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करण्यात यावा यासाठी ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेत बसलेल्या शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला थांबवण्यासाठी कायद्याची आडकाठी केल्याचा आरोप होत आहे. पुन्हा यासाठी की याधीही शिंदे गटाने कायद्याचं कारण पुढं करत ठाकरे गटाला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न केला होता.

निवडणूक आयोगाकडे आप-आपल्या गटासाठी नवीन नाव आणि चिन्ह देण्याच्या वेळेसही शिंदे गटाकडून अशीच ठाकरे गटाची आडकाठी करण्यात आली होती. 

ठाकरे गटाने त्यांच्या गटाच्या नावासाठी जो पसंतीक्रम दिला होता त्यामध्ये शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) या नावाला पहिली पसंती दिली होती. मात्र एकनाथ शिंदे गटाने देखील याच नावाला पहिली पसंती दिली आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने ते नाव फेटाळलं. चिन्हांमध्येसुद्धा ठाकरे गटाने त्यांच्या उगवता त्रिशूळ, उगवता सूर्य आणि  मशाल ही चिन्हं दिली होती.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या पक्षाच्या नावांच्या पसंतीक्रमात त्यामुळे ती फेटाळली गेली. निवडणूक चिन्हांच्या पसंतीक्रमातही दोन्ही गटांनी पहिली पसंती ‘त्रिशूळ’ आणि दुसरी पसंती ‘उगवता सूर्य’ या चिन्हांना दिली होती. अखेर ही नावं देखील फेटाळण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांना मशाल तर एकनाथ शिंदे यांना पुन्हा चिन्हांचा पर्याय देण्यास सांगून ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं.

याच्या आधीचा प्रसंग म्हणजे दसरा मेळावा.

उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होऊ नये यासाठी देखील एकनाथ शिंदे गटाने प्रयत्न केले होते असा आरोप झाला. मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांकडून प्रयत्न केले जात होते. मात्र पालिकेने दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी नाकारली होती. उद्धव ठाकरे गटाने शिवाजी पार्कसाठी आधी दावा केला होता तर शिंदे गटाने नंतर. मात्र पालिकेने दोन्ही गटाने केलेल्या दाव्यात पोलिसांकडून आलेला कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हा अहवाल पुढं करत परवानगी दिली होती. अखेर शेवटच्या काही तासात ठाकरे गटाने उच्च न्यायालयातून परवानगी आणत त्यांचा मेळावा शिवाजी पार्कवरच घेतला.

मैदानाचा विषय निघालाच आहे तर त्यामध्ये दहीहंडीच्या जांभोरी मैदानाचा देखील प्रश्न घेता येइल.

आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात म्हणजेच वरळीमध्ये जांबोरी मैदानात सेनेचे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांची मोठी दहीहंडी वर्षानुवर्षे साजरी होत होती. मात्र यावेळी सचिन अहिर यांना  ही परवानगी देण्यात आली नाही आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी महत्वाचा असणारा हा इव्हेंट यावेळी भाजपने साजरा केला.

सत्तेच्या किंवा कायद्याचा अजून एका ठिकाणी शिंदे गटाने गैरवापर केल्याचा आरोप होत आहे ते म्हणजे जे ठाकरे गटाबरोबर राहत आहेत त्यांच्यावर शिंदे गट पोलिसांकरवी दबाव आणत आहे. आजच कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें गटाच्या शिवसैनिकांची कथित बनावट प्रतिज्ञापत्रावरून चौकशी सुरु करण्यात आली आहे अशी बातमी आली आहे.

याआधी उद्धव ठाकरे गटाबरोबर राहणाऱ्या कल्याणचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांनी तडीपाराची नोटीस बजावली आहे.

तसेच उद्धव ठाकरे गटाचे समर्थक माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना नवी मुंबई पोलिसांनी तडीपार केले आहे.  शिंदे गटात सामील व्हा अन्यथा तुम्हाला तडीपार करून एन्काऊंटर करू, अशी धमकी पोलीस उपायुक्तानी दिल्याचा आरोप एम. के. मढवी यांनी केला होता.

चंद्रकांत खैरे यांनी देखील आपल्यावर  आकसातूनच गुन्हा दाखल झाल्याचा आरोप केला होता. दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या गटाच्या कारकर्त्यांवर होत असलेल्या पोलीस कारवायांचा उल्लेख केला होता.

त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे वादात शिंदे गट त्यांच्या हाती असलेल्या सत्तेचा पुरेपुर वापर करत असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.