राष्ट्रगीताच्या वादातून पुण्याच्या सिनेमा थिएटरमध्ये बॉम्बस्फोट झाला होता.

चलेजाव आंदोलनानंतरचे भारावलेले दिवस होते. कॉंग्रेसचे सर्व मोठे नेते जेलमध्ये गेले होते. सर्वसामान्य जनतेने आंदोलन आपल्या हातात घेतले होते. अनेक छोटे मोठे कार्यकर्ते भूमिगत होऊन आपल्याला जमेल त्या पद्धतीने ब्रिटीशांच्या दडपशाही विरुद्ध लढा देत होते. क्रांतीकारी चळवळीने वेग पकडला होता.

२४ जानेवारी १९४३. रात्रीची नऊ वेळ. पुण्यातील कॅम्पपरिसरातील कॅपीटॉल (सध्याचे व्हिक्टरी)आणि वेस्टएंड थिएटरमध्ये गॅरी कुपर या हिरोचा नवीन सिनेमा लागला असल्यामुळे इंग्रज अधिकारी सैनिक यांनी गर्दी केली होती.  नेहमी प्रमाणे पिक्चरच्या सुरवातीला इंग्लंडचे राष्ट्रगीत “गॉड सेव्ह द किंग ” वाजू लागले. सगळे देशी विदेशी इंग्रज थिएटरमध्ये उभे होते आणि छातीवर हात ठेवून अभिमानाने हे गीत म्हणत होते.

गाण संपणार तेवढ्यात कॅपीटॉल थिएटरमध्ये जोरदार धमाका झाला. संध्याकाळीचं सामसूम होणारं पुणं परत जाग झालं. काय नेमक झालंय ते पाहायला कॅम्पच्या दिशेने लोक धोतर संभाळत धावू लागले. बॉम्बस्फोट झाला होता. जवळपास ४ गोरे सैनिक ठार झाले होते तर १७ जण जखमी झाले होते. 

वेस्टएंड थिएटरमध्ये देखील या धमाक्याचे पडसाद उमटले. कोणालाच काही कळत नव्हते. भरून किंचाळण्याचे आवाज होत होते. एवढ्यात कोणी तरी ओरडल बॉम्ब बॉम्ब !! एका कोपऱ्यातून धूर निघत होता ते पाहिल्यावर विल्यम रोबसन नावाच्या अधिकाऱ्याने कचऱ्याच्या डब्ब्यात लपवून ठेवलेला बॉम्ब शोधून काढला आणि त्यावर पाणी टाकून निकामी केला.

ब्रिटीश सरकार हादरले. पुण्यामध्ये आत्ता पर्यन्तचा सर्वात मोठा क्रांतिकारी हल्ला होता. याचे पडसाद लंडन पर्यंत उमटले होते. स्फोटाची चौकशी करायला मिस्टर रोच नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली. सर्वत्र धरपकडी सुरु झाल्या. पण योग्य धागे दोरे मिळत नव्हते. शेवटी सरकारने माहिती देणाऱ्याला पाच हजाराचे बक्षीस जाहीर केले.

काही दिवसांनी बातमी आली पुण्यातील शक्तिशाली बॉम्बस्फोट प्रकरणी एकजण माफीचा साक्षीदार मिळाला आहे नाव शंकर कुलकर्णी. बऱ्याच जणांची नावे बाहेर आली. अखेर संपूर्ण प्रकरणाचा छडा लागला होता.

या बॉम्बस्फोटाचे मुख्य सूत्रधार होते बाबूराव चव्हाण आणि बापू साळवी. 

भारत छोडो आंदोलनाचा भाग म्हणून या तरुणांनी पुण्यातील इंग्रजी सिनेमे प्रदर्शित करणाऱ्या थिएटरनां गॉड सेव्ह द किंग या गाण्याऐवजी वंदे मातरम हे राष्ट्रगीत म्हणून वाजवण्यात यावे असे पत्रक पाठवले होते.  पण त्यांनी याला किंमत दिली नसल्यामुळे हे बॉम्बस्फोट घडवून आणले. कपीटोल आणि वेस्ट एंड सोडल तर एम्पायर थिएटरमध्ये देखील बॉम्बस्फोटाचा प्लन होता.

विशेष म्हणजे या बॉम्बस्फोटासाठी लागणारे साहित्य खडकी व देहू रोडच्या ब्रिटीश दारूगोळा फक्टरी मधून गोळा करण्यात आले होते.

नारायण विष्णू आठवले आणि भास्कर कर्णिक हे दोघे या फक्टरी मध्ये कामाला होते. त्यांनी तिथे फुटलेल्या पेट्यांमधून हंडग्रेनेड , डिटोनेटर पळवून आणण्यास सुरवात केली. भास्कर कर्णिक हे जंगली महाराज रोडवर न्यायाधीश जे.एम पाटील यांच्या बंगल्यात राहायला होते. तिथेचं हा दारुगोळा साठवण्यास सुरवात केली. न्यायाधीशांचे घर असल्यामुळे कधी पोलिसांना संशय आला नाही. पण कॅपिटॉल थिएटरमधील बॉम्बस्फोटांत नाव आल्यानंतर झडती घेतली आणि हे सर्व साहित्य सापडले.

पूर्ण राज्यात जागोजागी बॉम्बस्फोट करून ब्रिटीश सत्तेला हादरे देण्याचा प्रयत्न होता यालाच महाराष्ट्र कट असे म्हणतात. शिरूभाऊ लिमये यांना प्रमुख सूत्रधार म्हणून अटक झाली. अनेक दिवस चौकशी झाली,या सर्व क्रांतीकारकाना फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये रिमांड मध्ये ठेवण्यात आल. 

जेव्हा न्यायलयात खटला उभा राहिला तेव्हा पोलीस रिमांडमध्ये माफीचा साक्षीदार बनलेल्या हरिभाऊ लिमये, शंकर कुलकर्णी आणि दत्ता जोशी यांनी आपली साक्ष पलटवली. पुराव्याअभावी सगळे आरोपी निर्दोष सुटले. फक्त भास्कर कर्णिक यांनी पोलीस रिमांडवेळी फरासखाना स्टेशनमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली आणि शहीद झाले.

पुढे कालांतराने कॅपीटॉलचे रुपांतर व्हिक्टरी झाले असून आजही हा थिएटर आपला ऐतिहासिक आब राखून आहे. अरोरा टॉवर झाल्यापासून वेस्टएंडची जुनी शान आता राहिली नाही.

स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षांनी लोक अजूनही सिनेमा पाहायला या थिएटरमध्ये जातात. आज तिथे गॉड सेव्ह द किंग च्या ऐवजी भारताचे राष्ट्रगीत वाजवले जाते. आपण सगळे अभिमाने उभे राहतो  मात्र हा दिवस प्रत्यक्षात यावा यासाठी प्राण अर्पण केलेले क्रांतिकारक आपल्याला ठाऊक नसतात. ब्रिटीशांशी झालेल्या स्वातंत्र्यलढ्यातील एक युद्ध या थिएटरमध्येही झालेले कोणाला ठाऊक नसते.

भास्कर कर्णिक यांच्या हौतात्म्याला सलाम म्हणून पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती परिसरात बुधवार चौकाचे नामकरण “हुतात्मा चौक” असे करण्यात आले आहे. बाकी कोणत्याही पाठ्यपुस्तकात, पराक्रमाच्या गोष्टीमध्ये या घटनेचा उल्लेख होत नाही. कॅपीटॉल थिएटरमधील तो बॉम्बस्फोट आणि त्यातले क्रांतिकारक इतिहासाच्या कागदाच्या ढिगार्यात विसरून गेले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.