मराठा बटालियनच्या निवृत्त अधिकाऱ्याने बनवलेला पोर्टेबल व्हेंटिलेटर वाचवतोय अनेकांचे प्राण!

आज जगभरात कोरोनाच्या साथीने थैमान घातलंय. अजूनही या रोगावर ठोस उपाय सापडलेला नाही. कोव्हीड 19 च्या व्हायरसने ग्रस्त झालेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर्स व त्यांची टीम प्राण पणाला लावून लढत आहे.

या युद्धात त्यांचे सर्वात महत्वाचे शस्त्र आहे ते म्हणजे व्हेंटिलेटर !

रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यासाठीचे हे मशीन. आज जगभरात लाखो व्हेंटिलेटरची गरज आहे. अतिशय महागडे आणि गुंतागुंतीचे असलेले हे उपकरण सहज उपलब्ध नाही.

लंडनमध्ये कोरोणग्रस्तांवर उपचार करणारे डॉ. प्रशांत झा यांना पुण्यात तयार होणाऱ्या पोर्टेबल व्हेंटिलेटरबद्दल माहिती मिळाली.

हे व्हेंटिलेटर बनवले आहे मराठा बटालियनच्या एका निवृत्त आर्मी अधिकाऱ्याने.

त्यांचं कॅप्टन रुस्तम भरूचा.

त्यांनी गुजरात विद्यापीठातून बीएस्सीची डिग्री घेतली आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांचा बराच वेळ अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबमध्ये जायचा. स्वर्गीय विक्रम साराभाई यांनी स्थापन केलेल्या या संस्थेत भौतिकशास्त्राशी संबंधित अनेक उपकरणे बनवण्यासाठीचे संशोधन चालते.

इथेच रुस्तम भरूचा यांना फिजिक्सची गोडी लागली. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी इंडिया रेडियो इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनमध्ये पोलिसांसाठी वायरलेस सेट असेंम्बल करण्याचं काम सुरू केलं.

याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी भारतीय लष्कर सेवा जॉईन केली.

मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या गोवामुक्तीच्या ऑपरेशन मध्ये बिनतारी संपर्क यंत्रणेचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते.

1965 साली ते लष्करातील कॅप्टनपदावरून निवृत्त झाले आणि त्यांनी वैद्यकीय उपकरणे तयार करण्याचे काम सुरू केले.

त्यांचे बंधू असणाऱ्या डॉ परवेझ यांनी रुस्तम यांच्या मागे लागून रुग्णाच्या हृदयाच्या ठोक्याची स्थिती जाणून घेण्यासाठी प्लस मॉनिटर बनवून घेतले.

हे पहिलेच मशीन कॅप्टन रुस्तम यांनी अत्यन्त कमी खर्चात बनवले आणि त्याची उपयुक्तता सिद्ध करून दाखवली.

यानंतर त्यांनी टेलिथर्मामीटर, मायक्रोन फेलोमीटर यांसारख्या उपकरणांबरोवरच अँनेस्थेटिक आणि पोर्टेबल व्हेंटिलेटरची निर्मिती केली.

त्यांच्या या कामाची प्रशंसा आयआयटी मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या शास्त्रीय उपकरण संशोधन विभागाकडूनही घेण्यात आली आहे. त्यांना DRDOकडून पुरस्कार देखील देण्यात आला.

१९७०साली पुण्याचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अशोक कानिटकर यांनी कॅप्टन भरूचा यांना औंधचे हॉस्पिटलमध्ये तातडीने जाण्याची विनंती केली.

तिथे एका रुग्णाच हृदयाचं ऑपरेशन सुरू होतं आणि अचानक त्याच व्हेंटिलेटर बंद पडल होत.

अगदी आणीबाणीच्या परिस्थितीत अवघ्या 10 मिनिटात भरूचा यांनी ते व्हेंटिलेटर दुरुस्त केलं.

मेडिकल शास्त्रात व्हेंटिलेटरच असलेलं महत्व कॅप्टन भरूचा यांच्या लक्षात आले. तिथून त्यांनी व्हेंटिलेटरवर अनेक प्रयोग केले व

यातूनच साकार झाला पहिला पोर्टेबल व्हेंटिलेटर.

कॅप्टन भरूचा यांच्या कडे कोणतीही इंजिनियरिंगची डिग्री नाही, नगर रोड वरच्या आपल्या वर्कशॉपवरून ते पुण्यातील बुधवार पेठेत असणाऱ्या इलेक्ट्रिकल मार्केटमध्ये सायकलवरून येतात आणि तिथे खरेदी केलेल्या रॉ मटेरियलमधून व्हेंटिलेटरची निर्मिती होते.

सुरवातीला अनेक डॉक्टरांचा त्यांच्या या अगदी कमी खर्चात तयार झालेल्या उपकरणावर विश्वास बसायचा नाही. 1990 पासून 150च्या वर डॉक्टर त्यांनी बनवलेले व्हेंटिलेटर वापरतात.

लातूरमध्ये आलेल्या महाभयंकर भूकंपावेळी त्यांनी तिथल्या एका रुग्णालयाला आपले व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले.

भूकंपात जखमी झालेल्या अनेकांचे या व्हेंटिलेटरने प्राण वाचवले.

सुरुवातीला आकाराने मोठा असलेला व्हेंटिलेंटर कालांतराने अधिक छोटा आणि सुटसुटीत केला. 2003 साली टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून एका जर्मन कंपनीतील अधिकाऱ्यांनी रुस्तम यांच्या कामाची पाहणी केली आणि या प्रयोगाला मान्यता मिळाली.

जगभरात या पोर्टेबल व्हेंटिलेटरला मोठी मागणी आहे.

आज 84 वर्षाची उमर गाठलेल्या कॅप्टन रुस्तम यांच्या कडे या पोर्टेबल व्हेंटिलेटरचे कोणतेही पेटंट नाही. आजही ते सायकल वरून फिरतात. आपल्या या उपकरणाचा वापर पैसे मिळवण्यासाठी करता येणे शक्य असूनही त्यांनी तूझे केले नाही.

त्यांनी राज्यातील ग्रामीण भागात अनेक व्हेंटिलेटर आजपर्यंत दिले आहेत.

कोणताही नफा न पाहता समाजसेवेच्या उद्देशाने जर भरूचा यांच्याकडे कोणी व्हेंटिलेटरचे डिझाईन मागण्यासाठी गेले तर ते मोफत संबंधितांकडे देतात.

कंपन्यांनी व्हेंटिलेटर विकसित केल्यानंतर ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर तो ग्राहकांना द्यावा, एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. तशाच पद्धतीचा करार ते कंपन्या आणि संस्थांशी करीत आहेत.

कोरोना काळात भारत फोर्जसारख्या उद्योग समूहाने अशा प्रकारचे व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला व सध्या त्याची निर्मिती सुरू केली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.