आझाद हिंद सेनेत त्यांनी ५०० स्त्रियांचे झाशीची राणी पथक उभारले होते.

लहान असताना शालेय पाठ्यपुस्तकात आपण असे अनेक किस्से वाचलेले, फोटो पाहिलेले ज्यामागच्या कथा मोठेपणी कळलेल्या. असाच एक फोटो शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात पाहिलेला. तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा. त्या फोटोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत त्यांचे सैनिक होते, त्यातच एक तरुण मुलगी नेताजींच्या बाजूला उभी होती. आठवला फोटो ?

तर ती मुलगी होती, कॅप्टन डॉ. लक्ष्मी सहगल. जिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांना सहभागी करून मोठी फौज उभारली होती.

कॅप्टन डॉ. लक्ष्मी सहगल यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९१४ रोजी एका सामान्य तामिळ कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील डॉ. एस. स्वामिनाथन पेशाने वकील होते व ते मद्रास कोर्टमध्ये वकिली करायचे. तर आई अम्मुकुट्टी एक समाजसेविका व स्वतंत्रता सेनानी होत्या. त्यामुळे लक्ष्मीला लहानपणीच चांगली तालीम मिळाली आणि त्या घडत गेल्या.

पण वडिलांचे छत्र त्यांच्यावर अधिक काळ टिकलं नाही. त्या अवघ्या १६ वर्षच्या कोवळ्या वयात असतांनाच १९३० मध्ये त्यांच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला. पुढे सगळी जबाबदारी आईवर आली. वडिलांच्या अकाली जाण्याने लक्ष्मीलाही आपल्या जबाबदारीची जाणीव झाली होती. म्हणूनच काय एवढं आभाळ कोसळूनही त्यांनी १९३८ मध्ये मद्रास मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस पूर्ण केले. आपल्या डॉक्टरकी पेशावर त्यांचं नितांत प्रेम होतं आणि त्यांनी ते अखेर पर्यंत जपलं. त्या अगदी तनमन धनाने रुग्णांची सेवा करत असत. सेवेप्रतीची ही निष्ठा त्यांनी आपल्या आईकडून आत्मसात केली होती.

पुढे दोन वर्षांनी १९४० मध्ये त्या सिंगापूर ला गेल्या. तिथे त्यांनी भारतातून येणारे मजदुर (माइगरेन्ट्स लेबर) यांच्यासाठी कॅम्प लावला. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. इंग्रजांनी सिंगापूर जपानच्या ताब्यात दिले होते. नंतर १९४२ मध्ये त्यांनी ‛भारतीय स्वतंत्रता संघाचे’ सदस्यत्व घेतले आणि युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर त्या उपचार करू लागल्या. याचदरम्यान २ जुलै १९४३ नेताजी सुभाषचंद्र बोस सिंगापूर आलेले. लक्ष्मीच्या मानत स्वातंत्र्याची ज्वाला धगधगत होती. नेताजींच्या विचारांनी त्यांच्यावर चांगलाच प्रभाव पाडला होता.

२१ ऑक्टोबर १९४३ चा दिवस. सिंगापूर मधलं कॅथे चित्रपटगृह. तुडुंब गर्दीने भरलेल्या त्या चित्रपटगृहात व्यासपीठावर उभ्या राहिलेल्या नेताजींनी स्वतंत्र भारताच्या अस्थायी सरकारची घोषणा केली. जमलेल्या समूहात चैतन्याची लाट उसळली. यातच लक्ष्मी सहगल देखील होत्या. त्यांनी नेताजींची भेट घेऊन  त्यांना सांगितले की

” मला तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा असून एक फौज बनवायची आहे. “

दुसऱ्याच दिवशी झाशीराणी पथकाची स्थापना होऊन लक्ष्मीना पथकाची ‛कॅप्टन’ बनवण्यात आलं. नेताजींनी त्यांना आझाद हिंदच्या अस्थायी मंत्रीमंडळात सहभागी करून घेतलं. लक्ष्मी सहगल त्याच्या एकमेव स्त्री सदस्या होत्या.

ज्या काळात स्त्रियांनी घरातून बाहेर पडणे गुन्हा होता, त्याकाळात लक्ष्मी सहगल यांनी ५०० स्त्रियांची फौज उभी केली होती.

जेव्हा जेव्हा नेताजींना स्वतंत्र लढाईत लक्ष्मीची मदत लागली, तेव्हा लक्ष्मीने पूर्ण ताकद पणाला लावून त्यांना साथ दिली. या स्त्रियांचं पथक म्हणजे नेताजींच्या भव्य आणि रोमांचकारी स्वप्नाचा एक साकार अंश होता. १९४६ मध्ये लक्ष्मी यांना ब्रिटिश सरकारने अटक केली व त्यांना भारतात घेऊन आले.

पुढे १९४७ मध्ये कर्नल प्रेम कुमार सहगल यांच्याशी लक्ष्मीचे लग्न होऊन त्या कानपुर मध्ये स्थायिक झाल्या. तिथेही त्यांनी आपली रुग्णसेवा चालूच ठेवली. १९७१ मध्ये त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला आणि पक्षाकडून राज्यसभेत प्रतिनिधित्व केले. स्वतंत्रता आंदोलनातील त्यांचे अभूतपूर्व योगदान आणि संघर्ष बघता त्यांना १९९८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२००२ मध्ये डाव्या पक्षांच्या आघाडीकडून त्यांनी राष्ट्रपती पदासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. या सगळ्यात त्यांनी रुग्णांची सेवा करणे मात्र कधीच सोडले नव्हते. त्यांच्या कानपुर मधील क्लीनिक मध्ये रुग्णांची रीघ लागलेली असायची. वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत त्यांनी हे कार्य चालू ठेवलं. नंतर त्यांची तब्येत खालावत जाऊन २३ जुलै २०१२ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूनंतर त्यांचे कानपुर मेडिकल कॉलेजला मेडिकल रिसर्चसाठी देहदान करण्यात आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.