पाकिस्तानला बॉल आऊटवर हरवण्यामागचं कारण धोनीचा विश्वास होता
सध्या भारतातल्या क्रिकेट वर्तुळात सगळ्यात जास्त चर्चा कसली असेल, तर टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभावाची. याआधी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला १२ वेळा हरवणाऱ्या भारताला २०२१ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं.
आता पाकिस्तान कसं जिंकलं, भारताचं काय चुकलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला लय जणांनी सांगितल्या असतील. पुढचा भारत विरुद्ध पाकिस्तान कधी होईल माहीत नाही. पण तो सामना होईपर्यंत भारतीय चाहत्यांच्या मनाला झालेली जखम कायम राहील हे फिक्स.
जे झालंय ते बदलता येत नाही, पण चांगले क्षण आठवणं हेच आपल्या हातात असतं, असं आमचा एक दिलतूटा आशिक मित्र सांगत होता. आता तेच आम्ही क्रिकेटशी जोडलं आणि ठरवलं तुम्हाला २००७ च्या टी२० वर्ल्डकपमधला किस्सा सांगावा.
त्यावर्षी भारतानं वनडे वर्ल्डकप गमावला होताच. त्यामुळं टी२० वर्ल्डकप जिंकावा अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा होती. कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कॅप्टन म्हणून पहिलीच स्पर्धा आणि पहिलीच मॅच पाकिस्तान विरुद्ध.
दोन्ही टीम्सनं १४१ रन्स केल्यानं, मॅच टाय झाली. नव्या नियमांनुसार निकाल बॉलआऊटद्वारे लागणार होता.
आता बॉलआऊट काय असतंय?
तर भिडू सेम बॉलिंग टाकणंच. फक्त क्रीझवर बॅट्समन नसतोय. बॉलरनं यायचं आणि स्टम्प उडवायचा, जी टीम जास्त वेळा स्टम्प उडवणार ती जिंकली.
आता पाकिस्तानचे बॉलआऊटसाठीचे पहिले तीन कार्यकर्ते होते शाहीद आफ्रिदी, उमर गुल आणि यासिर अराफत. भारताकडून उतरले हरभजन सिंग, विरेंद्र सेहवाग आणि रॉबिन उथप्पा. भारताच्या तिन्ही कार्यकर्त्यांनी स्टम्प्स उडवले आणि पाकिस्तानच्या तिघांचे प्रयत्न हुकले.
क्रिकेट असो किंवा आयुष्य एक नियम सगळीकडे, हुकला तो संपला.
पाकिस्ताननं मॅच गमावली आणि भारतानं वर्ल्डकप कॅम्पेनची दमदार सुरुवात केली. आता गोष्ट इथंच संपत नाही. त्या विजयाला जवळपास १४ वर्ष लोटून गेली आणि आता कुठं त्या विजयमागचे किस्से पुढे यायला सुरुवात झालीये.
भारताचा माजी ओपनिंग बॅट्समन आणि विकेटकिपर रॉबिन उथप्पानं नुकताच एक किस्सा सांगितला.
बॉलआऊट होणार हे नक्की झाल्यावर उथप्पा ड्रेसिंगरूममध्ये गेला. तिथं त्यानी आपल्या कॅप्टनला सांगितलं की, ‘एमएस भावा मला बॉलिंग टाकायचीये.’ आता कॅप्टन म्हणून धोनीची पहिलीच मॅच. उथप्पा काय बॉलर पण नाय. तरी धोनी त्याला म्हणाला, ‘चालतंय की भावा, टाक.’ उथप्पानं बॉल टाकला, स्टम्प उडवले आणि टोपी काढून थाटात अभिवादन पण केलं.
उथप्पा सांगतो, ‘जेव्हा मी मागं वळून पाहतो तेव्हा मला समजतं की, एमएस कशा प्रकारचा कॅप्टन आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या कौशल्याची आणि क्षमतेची खात्री पूर्ण खात्री असते, तेव्हा एमएस पाठींबा देतो. कॅप्टन म्हणून आपल्या पहिल्या सामन्यापासून त्यानं आपल्या टीममेट्सच्या क्षमतेवर आणि कौशल्यावर पूर्ण विश्वास ठेवला.’
आजही धोनीकडे यशस्वी कॅप्टन म्हणून पाहिलं जातं. भारतीय टीमचे खंदे शिलेदार घडवण्यात धोनीचा मोलाचा वाटा आहे. जेव्हा जेव्हा या बॉलआऊटची आठवण होईल, तेव्हा हेच आठवेल की प्लेअर्सच्या क्षमतेसोबतच धोनीनं ऐन मोक्याच्या क्षणी ठेवलेला विश्वासही मोलाचा ठरला.
हे ही वाच भिडू:
- धोनीअण्णाची चेन्नई सारखीच कशी बरं जिंकत्या?
- २००७ च्या वर्ल्डकपला रवी शास्त्रींची भविष्यवाणी धोनीने चुकीची ठरवली होती..
- फक्त दोन ओव्हर्सनं जोगिंदर शर्माला बादशहा बनवलं