गांधी घराण्याचा भरत ज्याने पेट्रोल पंप खिरापतीप्रमाणे वाटले आणि अमेठीला काँग्रेसचा गड बनवला..

पैसे, संपत्ती ऐवजी कामातून मिळणारा आनंद जास्त सुखावणारा असतो. यामुळे त्यांनी राजकारणात जाण्या ऐवजी पायलट होणे पसंद केले. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. मात्र, भावाच्या विमान अपघातानंतर मजबुरीने आईच्या मदतीसाठी राजकारणात याव लागलं असे पंतप्रधान म्हणजे राजीव गांधी.

राजीव गांधी जेव्हा राजकारणात आले तेव्हा त्यांनी मित्रांना सुद्धा सोबत आणले.  त्यात अभिनेते अमिताभ बच्चन, अरुण सिंह आणि पायलट सतीश शर्मा यांचा समावेश होता.

सतीश शर्मा आणि राजीव गांधी हे दोघेही ७० च्या दशकात इंडियन एयरलायन्स मध्ये सोबत होते. दोघांची चांगली मैत्री होती. या मैत्रीतून सतीश शर्मा यांची इंदिरा आणि संजय गांधी यांच्याशी देखील  चांगले संबध जमले होते. मात्र, यादरम्यान एक मोठी घटना घडलीआणि या सगळ्यांचंच आयुष्य बदलून गेलं .

२३ जून १९८०. दिल्लीत भर सकाळी आकाशात एक विमान घिरट्या घालत होते. काही कळायच्या आत ते विमान जमिनीवर कोसळले आणि त्यात राजीव गांधी यांच्या लहान भावाचा संजय गांधी यांचा मृत्यू झाला.  हा प्रचंड मोठा आघात होता. राजकारणात एकाकी पडलेल्या आईच्या आग्रहासाठी इच्छा नसूनही राजीव गांधी काँग्रेस मध्ये आले.

संजय गांधी यांच्या मृत्यूमुळे खाली झालेल्या अमेठी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली आणि निवडून आले.

त्यांना राजकारणात आल्या आल्या इंदिरा गांधींनी दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. एक म्हणजे युवक कॉंग्रेस आणि दुसरे दिल्लीत होणारे एशियन गेम्स. जागतिक दर्जाच्या या स्पर्धेच्या आयोजनाची  जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. राजीव गांधी हे काम सुद्धा पाहू लागले. खेळ कसे होतील, कुठे मैदाने बांधण्यात येत आहेत? खेळाडूंच्या राहण्याची सोय कशी आहे? याच सर्व नियोजन राजीव गांधी करत होते.

पायलट सतीश शर्मा राजकारणात असे आले 

यावेळी जुन्या कॉंग्रेस नेत्यासोबत कामावरून राजीव गांधी यांचा वाद होत असे. अशावेळी त्यांनी तरुण आणि विश्वासू नेत्यांची फळी तयार करायची ठरविले. ज्यात ऑस्कर फर्नांडीस, गुलाम नबी आझाद, तारिक अन्वर यांच्या बरोबर इतर क्षेत्रातील मित्राला त्यांनी राजकारणात आणले.

यातच प्रमुख नाव होतं कॅप्टन सतीश शर्मा.

पुढे लवकरच काही अनपेक्षित घडामोडी घडत गेल्या. अतिरेकी लपून बसलेल्या सुवर्ण मंदिरावर लष्करी कारवाई झाली , या वरून चिडलेल्या शीख तरुणांनी ऑक्टोबर १९८४ मध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या केली. एका दुःखद घटनेमुळे अनपेक्षितपणे राजकारणात आलेले राजीव गांधी तितक्याच दुःखद घटनेमुळे अनपेक्षितपणे पंतप्रधान देखील झाले.

सत्तेत आल्यावर त्यांचा जोर आपल्या प्रमाणेच तरुण व उच्चशिक्षित नेत्यांवर होता. त्यांनी राजकारणात आणलेल्या अनेक मित्रांना मोठी पदे मिळाली. 

पंतप्रधान झाल्याने त्यांना आपल्या परंपरागत अमेठी मतदारसंघावर लक्ष ठेवता येत नव्हते. त्यावेळी सतीश शर्मा पुढे आले आणि त्यांनी अमेठी मतदारसंघ सांभाळला. मतदारसंघातून समस्या घेवून येणाऱ्या सर्वाना सतीश शर्मा भेटत. संजय गांधींनी घोषणा केलेल्या अनेक योजना त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्या. तेलनगनमध्ये जन्मलेल्या सतीश शर्मानी अमेठी रायबरेलीला आपलं घर बनवलं होतं.

या कामाचं बक्षीस म्हणून  १९८६ मध्ये सतीश शर्मा यांना राज्यसभेवर घेण्यात आले.

अमेठीतून मिळाली उमेदवारी 

१९९१ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या होत्या. अमेठी मध्ये मतदान झाले होते. पुढच्या टप्प्याच्या प्रचारासाठी राजीव गांधी तामिळनाडूतील श्रीपेरेबुदूर येथे गेले असता बॉम्बस्फोट घडवून त्यांची हत्या करण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीमुळे कॉंग्रेसला चागंले यश मिळाले आणि पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले.

राजीव गांधी नंतर अमेठीत कोण असा प्रश्न उभा राहिला होता. अनेकांना वाटत होतं कि तिथून सोनिया गांधी निवडणुकीला उभ्या राहतील मात्र तस घडलं नाही. सोनियांनी राजकारणात येण्यास नकार दिला.

तेव्हा पक्षाचं नेतृत्व हातात आलेल्या नरसिंहराव यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून सतीश शर्मा याचे नाव फिक्स केले. शर्मा अमेठीतून जिंकून आले आणि त्यांना १९९३ मध्ये पेट्रोलियम मंत्री करण्यात आले.

औघड बाबा म्हणून लोक ओळखू लागले 

सतीश शर्मा पेट्रोलियम मंत्री झाल्यानंतर त्यांनी पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, रॉकेल केंद्र हितचिंतकांना देण्याचा सपाटा लावला होता. त्यावरून नागरिक ‘औघड बाबा’ असे म्हणत होते. औघड बाबाचा अर्थ मागितले ते देऊन टाकणे असा होते.

रेशन कार्ड काढण्यापेक्षा पेट्रोलपंप आणि गॅस एजन्सी मिळविणे सोपे असल्याचे त्यावेळी बोलण्यात येत होते.

  • राजीव गांधी यांचे सचिव व्ही. जॉर्ज यांच्या शिफारशीने गांधी परिवाराचे पुरोहित आचार्य गणपत यांना पेट्रोल पंप दिला गेला.
  • कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा यांच्या सिफाराशीने टी. कुमार नावाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदाराला पेट्रोल पंप मंजूर करण्यात आला.
  • वादग्रस्त के. साईबाबा यांच्या पुतण्याला गॅस एजन्सी देण्याचा पराक्रम
  • तत्कालीन युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मनिंदरजीत सिंह बिट्टा यांच्या सासूला पेट्रोलियम मंत्रालायचा विरोध असतांना सुद्धा पेट्रोल पंप दिला.
  • काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मुफ्ती महेबुबा  यांना काश्मिरी स्थलांतरित म्हणून गॅस एजन्सी दिली होती.
  • लातूर मधील शैलेश पाटील यांना गॅस एजन्सी दिली होती. नंतर कळले कि, शैलेश पाटील हे तत्कालीन लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांचा मुलगा आहे.

या सर्व प्रकरणातनंतर त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात टीका झाली. विरोधी पक्षांनी मोठा गजहब केला. न्यायालयाने कारवाई करत त्यांचे फार्म हाउस जप्त केले होते. त्याकाळात म्हटलं जात होतं कि सतीश शर्मा यांनी गांधीं घराण्याचा गट सोडून नरसिंह राव यांचे पदर पकडले आहे.

१९९८ साली त्यांचा अमेठी मधून पराभव झाला आणि नेमके याच काळात सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांच्या साठी सतीश शर्मा यांनी आपली जागा सोडली. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी अमेठीतून उभ्या रहायला आणि भरघोस मतांनी निवडून आल्या. तेव्हा कॅप्टन सतीश शर्मा यांना इंदिरा गांधींच्या रायबरेलीच तिकीट देण्यात आलं. तेही निवडून आले.

राजकारणाची बदलती दिशा ओळखून सतीश शर्मा यांनी पुन्हा गांधी घराण्याची साथ पकडली.

ज्या प्रमाणे रामाचा अनुपस्थितीत भरताने राजगादीवर रामच्या पादुका ठेवून अयोध्येचा कारभार पाहिला त्याप्रमाणे सतीश शर्मा हे अमेठी रायबरेली मतदारसंघात राजीव गांधींचे भरत म्हणून ओळखले गेले. 

२००४ मध्ये अमेठी मधून राहुल गांधी हे निवडणूक लढवत होते. त्यामुळे सतीश शर्मा यांचा पत्ता कट झाला. मात्र, सतीश शर्मा राजीव गांधी यांचे जवळचे समजण्यात येत असल्याने त्यांना पुन्हा एकदा २००४ आणि २०१० मध्ये राज्यसभेवर घेण्यात आले.

मात्र ते गांधी घराण्याचे इतके विश्वासू असूनही मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात त्यांना कुठलेही मंत्री पद देण्यात आले नाही.

मंत्रिमंडळात सदस्यावर कुठलाही मोठा गुन्हा असू नये अशी धारणा अध्यक्षा सोनिया गांधी यांची होती. त्यामुळे गांधी परिवाराचे विश्वासू अशी ओळख असणाऱ्या सतीश शर्मा यांना मंत्री पदा पासून लांब राहावे लागले होते.

पण काहीही असले तरी सतीश शर्मा यांनी गांधी घराण्याचा बालेकिल्ला विश्वासपूर्वक सांभाळला. त्यांच्यामुळेच २०१४ साली मोदी लाट येऊनही राहुल गांधीची खासदारकी अगदी थोडक्यात वाचली होती. पण २०१९ च्या वेळी ते घडू शकले नाही. सतीश शर्मानी प्रयत्न करूनही स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.