अनेक मिडल क्लास भिडूंच्या डोळ्यातलं स्वप्न कार्यकर्त्यांनी टिपलं आणि जन्म झाला कार्स २४ चा

काल ऑफिसची वेळ संपल्यानंतर मित्रांसोबत घराच्या दिशेला जात होतो. रस्त्याने जाताना आमच्या बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या. पण बोलताना मी नोटीस केलं की मित्राचं लक्ष रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांकडे जास्त जात होतं. तितक्यात त्याच्या आवडतीची महिंद्रा कंपनीची एक कार बाजूने गेली आणि त्याच्या डोळ्यात अचानक मला वेगळीच चमक जाणवली. आता न राहावल्याने मी त्याला विचारलंच.

“काय रे, काय बघतोय इतकं गाड्यांकडे” त्यावर तो रस्त्याने दूरवर जात असलेल्या कारकडे बघतच म्हणाला, “आपल्यालाही अशी कार घ्यायची आहे भावा.”

या भावाने अशातच ऑफिस जॉईन केलं होतं, फ्रेशर होता. माझंही निरीक्षण होतं की, नुकतंच कमवायला लागलेल्या तरुणांच्या सुरुवातीच्या काही स्वप्नांमध्ये एक स्वप्न हमखास सामील असतं. स्वतःची कार खरेदी करण्याचं. बरेच जण हे स्वप्न जगू शकतात तर अनेकांना ते जगताच येत नाही. कारण कार म्हणजे महाग वस्तू. सर्वसामान्यांना आणि कमी पगार वाल्यांना ते शक्य होत नाही. 

जसं माझं हे निरीक्षण होतं तसंच अजून काही कार्यकर्त्यांचं होतं. फरक फक्त असा की या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अशा सर्वांची स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला होता. त्यांनी एक स्टार्टअप सुरु केलं आणि त्यानुसार आज ते कित्येकांची स्वप्न यशस्वीपणे साकार करत आहे. भारतभर धूर करणाऱ्या त्यांच्या या स्टार्टअपचं नाव आहे ‘कार्स २४’.

विक्रम चोप्रा, मेहूल अग्रवाल, गजेंद्र जांगीड आणि रुचित अग्रवाल असं या कार्यकर्त्यांचं नाव.

कार्यकर्त्यांनी जेव्हा अनेकांचं हे अधुरं किंवा भविष्यातील स्वप्न टिपलं तेव्हा त्यांनी विचार सुरु केला की काय जुगाड करता येईल. शोध सुरु झाला की कसं आपण कमी, अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये त्यांना कार देऊ शकू. शोधात त्यांना सापडलं की ज्यांना नवीन कार घेणं परवडत नाही असे लोक सेकंड हॅन्ड कारला प्राधान्य देतात. मात्र अशा गाड्या सापडणं आणि मग त्या विकत घेण्याची प्रक्रिया फार किचकट जाते. शिवाय काही लोक ज्यांना जुन्या कार विकायच्या आहे अशांना देखील ग्राहक लवकर भेटत नाही.

म्हणजे ना ग्राहकाला विकणारा भेटतो ना विकणाऱ्याला ग्राहक भेटतो. तेव्हा त्यांनी हीच अडचण दूर करण्यासाठी स्टार्टअपची योजना आखली आणि त्यानुसार अभ्यास सुरु केला.

वापरलेल्या कार्सचा उद्योग बऱ्याच काळापासून गोंधळलेला आहे, या उद्योगाची मागणी आणि पुरवठा यात प्रचंड तफावत असल्याचं या अभ्यासात त्यांच्या लक्षात आलं.  शिवाय विक्री किंवा खरेदी करताना कारसाठी योग्य किंमत ठरवण्याचं तंत्रज्ञान उद्योगाकडे नव्हतं, हे ही त्यांना जाणवलं. आणखी एक अडथळा म्हणजे ज्या लोकांना या व्यवसायात यायचं आहे त्यांना देखील योग्य प्लॅटफॉर्म उपस्थित नाहीये, त्यांनी स्वतः यात उतरण्याचा प्रयत्न केला तरी सोयीच्या अभावी प्रक्रिया किचकट होते. त्यातही फसवणुकीच्या घटना देखील घडतात. 

या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाल्यानंतर त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी विक्रेते आणि खरेदीदार यांच्यातील दुवा असलेला व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. येणारा काळ हा डिजिटल असल्याचं त्यांना माहित होतं, त्यानुसार त्यांनी एक ॲप विकसित करण्याचं ठरवलं आणि अशाप्रकारे जन्म झाला ‘कार्स २४’चा.

वापरलेल्या कार्ससाठी हक्काचं आणि सुलभ विक्री केंद्र आणि या कार खरेदी करणाऱ्यांसाठी विश्वासू व्यासपीठ या तत्वावर कार्स २४ ची सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली.

त्यांनी व्यवसायाचं मॉडेल तयार करताना हे ध्येय समोर ठेवलं होतं की ही पद्धत खूप सोपी असावी. त्यासाठी त्यांनी फक्त दोन टप्प्यांचा यात समावेश केला. एक म्हणजे ‘ग्राहक ते व्यवसाय मॉडेल’ आणि दुसरं ‘ग्राहक ते ग्राहक’ व्यवसाय मॉडेल.

सुरुवातीला फक्त एकच मॉडेल होतं. ग्राहक ते व्यवसाय मॉडेल. यामध्ये कार्स २४ वापरकर्त्यांकडून कार खरेदी करतं आणि त्या बदल्यात डीलर्सना विकतं. यात कार्स २४ प्रत्येक डीलसाठी कमिशन आकारून, एंड-टू-एंड व्यवहार सुलभ करतं. 

अलीकडेच कंपनीने ग्राहक ते ग्राहक हे बिझनेस मॉडेल आणलं आहे. या मॉडेलमध्ये, कार खरेदी करण्यासाठी, वापरकर्त्याला प्लॅटफॉर्मच्या वेबसाइटवरून त्यांच्या आवडीची कार निवडावी लागेल किंवा कारचं मूल्यांकन आणि चाचणी घेण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या जवळच्या शाखेला भेट द्यावी लागेल. त्यानंतर एका तासापेक्षा कमी वेळेत पेमेंट केल्यानंतर कार खरेदीदाराला दिली जाते.

अशा या दोन मॉडेल्सवर आधारित हा बिजनेस आता खूप लोकप्रिय झाला आहे. अनेक तरुण यामध्ये उतरत आहेत. काहीच वर्षांमध्ये कंपनी इतकी पुढे आली आहे की सध्या कंपनी दरवर्षी १,५०,००० पेक्षा जास्त कार विकते. आजघडीला भारतातील १३४ हून अधिक मोठ्या शहरांमध्ये वापरलेल्या कारच्या खरेदी आणि विक्रीसाठी  या कंपनीच्या माध्यमातून होते.

२०१५ च्या स्थापनेपासून, एक लांब पल्ला कंपनीने गाठला आहे. एका कार्यालयापासून ते भारतातील १३४ पेक्षा जास्त प्रमुख शहरांमध्ये १६१ हून अधिक शाखांपर्यंत आम्ही पोहचलो आहोत, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

कंपनीचं सध्याच्या घडीला व्हॅल्यूएशन ३.३ अब्ज डॉलर इतकं आहे तर आर्थिक वर्ष २१ नुसार रेव्हेन्यू ३७१ दशलक्ष डॉलर आहे.

अनेकांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यास या कार्यकर्त्यांनी जी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे ती बुलेट ट्रेनच्या स्पीडने भारतात यशस्वी होताना दिसते आहे. दिवसेंदिवस नवीन शिखरं ही कंपनी गाठत असल्याने लवकरच जगभरात पोहोचायला वेळ लागणार नाही असं दिसतंय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.