लोगो ब्लॅक अँड व्हाईट होता, खरं कार्टून नेटवर्कनं आपलं बालपण भारी केलेलं…

शाळा सुटली की शाळेबाहेर मिळणाऱ्या गोळ्या, दोन रुपयाचा वडापाव, पावावरुन एक डाव फिरवून दिलेली पाच रुपयाची पावभाजी, सरबतं आणि मैदानात खेळणारी पोरं या सगळ्याला कल्टी देत धावतपळत घर गाठण्याचे ते दिवस.

कारण ५ वाजता पोकेमॉन लागायचं. 

पोकेमॉनवाले आदल्या दिवशी एखाद्या खतरनाक फाईटवर एपिसोड संपवायचे, त्यामुळं दिवसभर आपल्या डोक्यात तेच राहायचं आणि फाईट पूर्ण झाल्यावर नेमकं काय होणार हे बघायला घरी जायची धावपळ असायची. पहिल्या ब्रेकला डबा काढायचा, दुसऱ्या ब्रेकला शाळेचे कपडे बदलायचे पण पोकेमॉनचा एक क्षणही मिस करायचा नाही असलं खतरनाक येड तेव्हा या शोचं होतं.

पण पोकेमॉन तर नंतरचा विषय त्याआधीही आपण कार्टून नेटवर्क बघण्याची कारणं बरीच होती. म्हणजे एखाद्या सकाळी शाळा बुडवून गप घरी बसायला मिळालंच, तर सकाळ सकाळ ऑस्वल्ड, नॉडी लावून बघायचं.

ऑस्वल्डचे तर फक्त २६ एपिसोड्स रिलीझ झाले होते, पण इतकी वर्ष उलटली तरी आपण ऑस्वल्डला विसरलो नाही, हीच त्याची आणि कार्टून नेटवर्कची ताकद.

सध्या हा विषय आठवला कारण कार्टून नेटवर्क आता टॉप लेव्हलची ॲनिमेशन कंपनी वॉर्नर ब्रदर्समध्ये मर्ज होत आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की, आता कार्टून नेटवर्क बंद होणार का ? मागच्या काही वर्षांपासूनच कार्टून नेटवर्कचं मार्केट हळूहळू पडत होतं, त्यात कार्टून नेटवर्कचं CN झाल्यावर विषय आणखीनच गंडला.

सगळा विषय समजून घेताना आधी कार्टून नेटवर्क कसं उभारलं याबद्दल थोडं सांगायला हवं…

१ ऑक्टोबर १९९२ ला हे चॅनेल अमेरिकेमध्ये लॉन्च करण्यात आलं. लहान मुलांसाठी बनवलेले ऍनिमेटेड कार्टून्स हा या चॅनेलचा यूएसपी ठरला. अमेरिकेत लॉन्च झाल्यानंतर ३ वर्षांनी मे १९९५ मध्ये कार्टून नेटवर्क भारतात आलं. तेव्हा भारतात फार कमी घरांमध्ये टीव्ही होता, नंतर हे प्रमाण वाढत गेलं. २००० साला आधी कार्टून नेटवर्क फुल फ्लेज कार्टून दाखवत नव्हते, तर सकाळच्या स्लॉटमध्ये कार्टून असायचे आणि संध्याकाळच्या स्लॉटमध्ये हॉलिवूडचे पिक्चर.

पण २००० सालानंतर ते २४ तास कार्टून्स दाखवू लागले आणि त्याच काळात मध्यमवर्गीय माणसांनाही टीव्ही परवडू लागला. त्यामुळं प्रत्येक घरी नसला तरी चाळीत किंवा बिल्डिंगमध्ये एखादा टीव्ही तर असायचाच. त्यामुळं मंडळात बसल्यासारखं त्या टीव्हीसमोर वेळ मिळेल तेव्हा बसायचं आणि जे लागलेलं असेल ते कार्टून बघायचं. टॉम अँड जेरी, रिची रिच अशा शो मधून आपल्याला कार्टून नेटवर्कची गोडी लागली आणि ती हळूहळू वाढतही गेली.

कार्टून नेटवर्कनं भारतात ग्रो होण्यासाठी आणखी एक स्ट्रॅटेजी वापरली, ती म्हणजे इकडच्या स्थानिक भाषांमध्ये कार्टून्सचं डबिंग केलं. त्यामुळं डायलॉग नसलेल्या टॉम अँड जेरी सोबतच, हिंदीतलं  ऑस्वल्डही पोरं आवडीनं पाहू लागली. पुढं जाऊन हिंदीसोबतच तमिळ आणि तेलगू भाषेतले कार्टून्सही आले. 

आणखीन एक स्कीम होती ती म्हणजे, काही कार्टून्स त्यांनी इंग्लिशमध्येच ठेवली. 

ज्यामुळं स्वतः पालक लोक म्हणायला लागली की इंग्लिश सुधरवण्यासाठी हे कार्टून्स बघितली पाहिजे. ही स्कीम पण हिट गेली.

जस जसा काळ पुढं सरकला तसं कार्टून नेटवर्कला कॉम्पिटिशन वाढलं, पोगो, निक, हंगामा अशी चॅनेल्स आली. स्पर्धा वाढली पण पोकेमॉन, बेब्लेड अशा कार्टून्सचे सिझन आणत कार्टून नेटवर्कनं आपली लोकप्रियता कायम ठेवली.

ऑस्वल्ड, नॉडी, बॉब द बिल्डर हे बोधकथांचं काम करायचे कारण प्रत्येक एपिसोड एखादा संदेश असायचा, तर पोकेमॉन, ड्रॅगन बॉल झी यातून पुढं काय होणार ? ही उत्सुकता कायम ताणलेली असायची. नंतर फेमस झालेलं ऑगी अँड द क्रॉक्ररोचेसही सुरुवातीला कार्टून नेटवर्कवरच लागायचं.

नंतर कार्टून नेटवर्कनं एक मोठा बदल केला…

त्यांनी काळ्या पांढऱ्या बॉक्सेसमध्ये असलेलं आपलं ‘Cartoon Network’ हे नाव बदलून ‘CN’ हे नवं नाव घेतलं. इथं एक गोष्ट झाली ती म्हणजे, जुना लूक चेंज झाला. सोबतच टीव्ही बघणारी पिढीही बदलली होती, त्यामुळं सीएननं आपल्या कार्टूनचा लूकही बदलला. त्यांनी अनेक जुने कार्टून्स नव्यानं बनवले. म्हणजे प्रचंड हिट असलेलं बेन 10 नव्या लूकमध्ये ‘टीन टायटन्स’ झालं खरं, पण लई खतरनाक आपटलं. 

जुनी कार्टून्सही स्टोरीलाईन आणि साध्या ऍनिमेशनमुळं भारी वाटायची, पण नंतर ऍनिमेशन भारी करायच्या प्रयत्नात स्टोरीलाईनवर असणारा भर कमी झाला. त्यामुळेच कार्टून नेटवर्कची लेटेस्ट कार्टून्स आपल्या लक्षात राहिली नाहीत, लक्षात राहिली ती 90’s च्या पोरांनी बघितलेली कार्टून्सच.

आणखीन एका गोष्टीचा फटका बसला ती म्हणजे ‘निगेटिव्ह पब्लिसिटी’

कार्टून नेटवर्कचा ऑडियन्स जसा वाढला तसा त्यांच्याकडचा जाहिरातदारांचा आकडाही वाढला, हे जाहिरातदार लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळं यांचे प्रॉडक्ट्स खेळणी, नूडल्स, चॉकलेट अशा लहान मुलांना आवडणाऱ्या गोष्टी होत्या. पण लहान मुलांची हट्ट करण्याची सवय आणि या सततच्या जाहिराती यांचा मेळ बसला नाही आणि पालकांमध्ये चॅनेल विषयी निगेटिव्ह पब्लिसिटी वाढू लागली.

जेव्हा कार्टून नेटवर्कनं आपला स्टोरीलाईनवरचा फोकस काहीसा चेंज केला तेव्हाच इतर चॅनेल्सनं तो आत्मसात केला आणि सोबतच कार्टून नेटवर्कचे काही जुने शोजही विकत घेतले. 

सुरुवातीला कार्टून नेटवर्कवर दिसणारं ऑस्वल्ड नंतर पोगो वर दिसू लागलं. लहान पोरांमध्ये एकेकाळी जे मार्केट पोकेमॉनचं होतं, त्याच्या तोडीस तोड लोकप्रियता छोटा भीमनं मिळवली.

साहजिकच वाढत्या चॅनेल्सच्या स्पर्धेत कार्टून नेटवर्क काहीसं मागेच पडलं. युट्युब आल्यापासून तर टीव्हीवर कार्टून बघणाऱ्यांची संख्या रोडावलीच. याचा दाखला द्यायचा झाला तर, BARC (Broadcast Audience Research Council of India) च्या रेटिंग्समध्ये कार्टून नेटवर्कचं रेटिंग्स सातत्यानं ढासळत गेलं.

आता लहान मुलांना कार्टून लावून द्यायचं म्हणलं, तरी आपण बऱ्याचदा युट्युबवर लाऊन देतोय. आता ना कार्टून नेटवर्कमधले कॅरेक्टर्स मार्केटिंग फंडा म्हणून का होईना पण रस्त्यावर एखादा इव्हेंट घेताना दिसतात आणि ना पाचचं पोकेमॉन मिस झालं तर परत कधी बघायला मिळणार हा प्रश्न पडतो.

कार्टून नेटवर्क वॉर्नर ब्रदर्समध्ये मर्ज होतंय म्हणजे नेमकं काय होतंय ?

तर हे चॅनल बंद होणार नाही. उलट आता ऍनिमेशन आणि बाकीचं काम या दोन कंपन्यांच्या टीम एकत्र मिळून पाहतील. कंपन्या एकत्र आल्या असल्या, तरी सीएनचं काम त्यांच्या बॅनरखालीच पब्लिश होत राहील. त्यामुळं आता क्वालिटी वाढेल अशी अपेक्षा तर आपण करुच शकतो.

राहिला प्रश्न नॉस्टॅलजियाचा, 

तर कार्टून नेटवर्क हा गोष्टीच्या पुस्तकांइतकाच भारी विषय होता, यांच्या कित्येक शोचं टायटल सॉंग आपल्याला आजही पाठ आहे, आजही सोशल मीडियावर एखादा टॉम अँड जेरीचा व्हिडीओ दिसला तर आपण थोडावेळ का होईना पण बघतोच.

कारण कार्टून नेटवर्क हे आपलं बालपण होतं, म्हणून तर ‘पोकेमॉन गो’ आल्यावर आपण रस्त्यावर पोकेमॉन शोधत हिंडलो आणि मर्जरची बातमी आल्यावर, कार्टून नेटवर्क बंद तर नाही झालं ना या विचारानं आपल्याही मनात शंकेची पाल चुकचुकली.

त्या ब्लॅक अँड व्हाईट लोगोवाल्या चॅनेलनं आपलं बालपण भारी केलं, एवढं खरं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.