कुपोषणावर उपाय म्हणून बनलेल्या नेस्लेने जगात आपलं मार्केट तयार केलं…

अमिताभ बच्चनची एक जाहिरात होती बघा टीव्हीवर सब्जी लाई, मॅगी बनाई, माँ बोली बस दो मिनट…हि मॅगीची जाहिरात आपल्याला चांगलीच लक्षात असेल. मॅगीचे चाहते घराघरात दिसून येतात, भले मॅगी दोन मिनिटात बनत नाही पण मॅगी बऱ्याच लोकांना आवडते. पण मॅगी जी कंपनी बनवते त्या कंपनीचा इतिहास तितकाच जबरदस्त आहे.

मागच्या काही वर्षांपासून जर आपण नीट लक्ष देऊन आपल्या दैनंदिन गोष्टींकडे बघितलं तर दिसून येईल कि पॅकेज फूड आणि प्रोडक्टचा प्रभाव वाढत चालला आहे. बिस्कीट, चॉकलेट, नूडल्स असे अनेक प्रोडक्ट आहेत जे कंपनीतर्फे पॅक करून विक्री केले जातात. फुड प्रोसेसिंग कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर आज आपण ज्या कंपनीबद्दल जाणून घेणार आहोत ती कंपनी मागच्या १०० वर्षांपासून अधिराज्य गाजवत आहे.

जगातली सगळ्यात मोठी फूड प्रोसेसिंग कंपनी म्हणजे नेस्ले.

नेस्टी, नेसकॅफे, मॅगी, किटकॅट अशा दोन हजारांहून अधिक प्रॉडक्टची निर्माती कंपनी म्हणजे नेस्ले. २०० पेक्षा जास्त देशांमध्ये आपला दबदबा नेस्ले कंपनीचा आहे. १० ऑगस्ट १८१४ साली हेनरी नेस्लेचा जन्म झाला. याच हेनरी नेस्लेने १८६७ मध्ये नेस्ले कंपनीची सुरवात केली. फॅरीन लेगटी नेस्ले हे कंपनीचं सुरवातीचं नाव. आपली मेडिकलची डिग्री पूर्ण करून हेनरी नेस्ले स्वित्झरलँडला शिफ्ट झाले.

या काळात जगभरात कुपोषणामुळे लहान बाळांचे हाल सुरु होते. वाढत चाललेले आजार आणि बाळांना आईच न पुरणारं दूध हि मोठी समस्या निर्माण झाली होती. यावर उपाय म्हणून हेनरी नेस्लेने गाईच्या दुधात धान्य आणि साखर घालून याचं एक कॉम्बिनेशन बाजारात उतरवलं. आईच्या दुधाला पर्याय म्हणून नेस्लेचं हे प्रोडक्ट हिट ठरलं आणि संपूर्ण स्वित्झरलँडमध्ये याचा प्रचार प्रसार झाला. १८७१ पर्यंत नेस्लेने संपूर्ण युरोपात आपलं नाणं वाजवलं. 

पण पुढे नेस्लेला स्पर्धा म्हणून अजून काही छोट्यामोठ्या कंपन्यांनी कंडेन्स्ड मिल्क विकायला सुरवात केली. हेनरी नेस्ले या गोष्टीमुळे नाराज झाले. या कंपन्यांना प्रत्युत्तर म्हणून नेस्लेने कंडेन्स्ड मिल्क विकायला सुरवात केली. एका बाजूला नेस्ले तर दुसऱ्या बाजूला अँग्लो स्विस या कंपन्यांमध्ये स्पर्धा जोरात सुरु झाली. दोन्ही कंपन्यांचा माल तर विकला जात होता पण ते स्पर्धेच्या नादात माल स्वस्त विकत होते आणि त्यामुळे नफा होत नसे.  पुढे या दोन्ही कंपन्या एक झाल्या.

नेस्ले अँड अँग्लो स्विस कंडेन्स्ड मिल्क कंपनी नावाने त्यांनी व्यापार सुरु केला. पण पुढे नेस्ले हेच नाव कायम राहिलं. सुरवातीला पहिल्या विश्व युद्धाच्या काळात कंपनीकडे २० फॅक्टरी होत्या. पण या कंपन्या हळूहळू रिकाम्या व्हायला लागल्या. हि परिस्थिती बघून कंपनीने फॅक्टरी त्या देशात फॅक्ट्री लावली जे सुरक्षित होते जसे कि अमेरिका, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे. अजून बऱ्याच ठिकाणी फॅक्टरी सुरु झाली जेणेकरून युद्धाच्या काळात फॅक्टरी प्रोडक्शन थांबणार नाही. 

या धोरणामुळे जगभरात मंदीचं सावट होतं तेव्हा कंपनीला तोटा झाला नाही. १९३९ साली नेस्लेला युएस आर्मीचं फूड कॉन्ट्रॅक्ट मिळालं ज्यात पॅकेज फूड आणि कंडेन्स्ड मिल्क होतं. यामुळे कंपनीला भरपूर फायदा झाला. नेस्लेची लोकप्रियता बघून कंपनीने नवीन प्रोडक्ट बाजारात उतरवले त्यात सगळ्यात आधी होता नेसकॅफे. नेसकॅफे बाजारात जबरदस्त हिट झाला. छोट्या छोट्या कंपन्यांना विलीन करत नेस्लेने बाजारात वर्चस्व प्रस्थापित तयार केलं.

नेस्लेने ज्या ज्या कंपन्या खरेदी केल्या त्या सगळ्या मोठ्या झाल्या. मॅगी, किटकॅट, पोलो या प्रोडक्टने नेस्ले सुपरहिट झाली. १९३० साली नेस्लेने भारतात प्रवेश केला आणि भारतातसुद्धा जबरदस्त यश मिळवलं. पंजाबच्या मोगामध्ये नेस्लेने फॅक्टरी सुरु केली ज्याला भारत सरकारनेसुद्धा पाठिंबा दिला.

मॅगीमध्ये लेडचं प्रमाण जास्त आढळलं तेव्हा कंपनीवर कारवाई झाली आणि ६४० कोटींचं नुकसान नेस्लेला झालं. मॅगी संपूर्ण देशभरात बॅन करण्यात आली. २७ हजार टन माल नष्ट करण्यात आला होता. पण कोर्ट कचेरी प्रकरण पूर्ण करून नेस्ले पुन्हा मार्केटमध्ये त्याच जोशात आली आणि हिट झाली.

सगळ्यात जास्त मॅगी हि भारतात खाल्ली जाते.

आज घडीला नेस्ले जगातली सगळ्यात मोठी फूड प्रोसेसिंग कंपनी आहे. कोटींमध्ये आज नेस्लेची आर्थिक उलाढाल चालते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.