लोकमान्य कॉलेजच्या मुलाला म्हणाले तू स्वतंत्र भारताचा अर्थमंत्री होशील, अन् ते खरं झालं..
चिंतामणराव देशमुख अर्थात CD देशमुख म्हणजे भारताचे अर्थमंत्री. रिझर्व्ह बॅंकेचे पहिले गव्हर्नर इतिहास पहायला गेलं तर राजकारणात जावं, तिथं करियर कराव यात त्यांना काडीचाही इंटरेस्ट नव्हता. पण विधीलिखित असल्याप्रमाणे ते राजकारणात आले, भारताचे अर्थमंत्री झाले. राज्यसभेवर खासदार झाले. कुलाब्यातून लोकसभेवर निवडून गेले. कॉंग्रेसचे सदस्य नसताना देखील कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून गेले..
सीडी देशमुख हे रोह्याचे.
त्या काळात मुंबई विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात कर्नाटक ते गुजरातपर्यन्तचा भाग यायचा. इतक्या मोठ्या भागातून ते मॅट्रिकच्या परिक्षेत पहिला आले होते. इंटर परिक्षेतही ते पहिले आले होते. पुढे ते रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर झाले. फाळणीनंतर काही काळ भारताची रिझर्व्ह बॅंक आणि पाकिस्तानची रिझर्व्ह बॅंक एकच होती.
थोडक्यात ते पाकीस्तानच्या रिझर्व्ह बॅंकेचे देखील गव्हर्नर होते. सुरवातीच्या काळात त्यांनी सह्या केलेल्या नोटा पाकीस्तानच्या चलनात होत्या.
स्वातंत्रपूर्व काळातच इंग्रजांनी त्यांना भारताचा अर्थमंत्री होण्याची विनंती केली होती. पण त्यांनी ती मान्य केली नाही. मात्र स्वतंत्र भारतात पंडित जवाहरलाल नेहरूंनी आग्रह धरल्याने ते भारताचे अर्थमंत्री झाले.
पण अर्थमंत्री झाले तेव्हा ते खासदार नव्हते. सहा महिन्यात त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून यायचं होतं. अशा वेळी ते पंजाबमधून खासदार म्हणून राज्यसभेवर गेले. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या काळात कॉंग्रेसने त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती केली. पण त्यांना निवडणूक लढवायची नव्हती. कारण तेव्हा कॉंग्रेसचे सदस्यत्व घेण्यासाठी दारू प्यायची नाही व खादी वापरायची असे नियम होते. ते सीडी देशमुखांना मान्य नव्हते. अशा वेळी कॉंग्रेसने त्यांना सहयोगी सदस्य करुन घेतलं आणि खासदार केलं.
लोकमान्य टिळक व सीडी देशमुख यांच्यात घडलेला प्रसंग
साथसंगत या उषा सिंधू वसंत कानेटकर यांच्या सीडी देशमुख एक अनोखं दर्शन या पुस्तकात या प्रसंगाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. वसंत कानेटकर व त्यांच्या पत्नी सिंधुताई एका कार्यक्रमासाठी हैद्राबादला गेले होते.
वसंत कानेटकर हैद्राबादमध्ये आले आहेत याची माहिती सीडी देशमुख यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या निवासस्थानी दोघांनाही बोलावून घेतलं. गप्पा रंगल्या. या गप्पांमध्येच वसंतराव कानेटकरांनी सीडी देशमुखांना विचारलं की तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच लोकमान्य टिळकांनी तुम्ही स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होणार अशी भविष्यवाणी केली होती ती खरी आहे का?
यावर सीडी देशमुखांनी दुजोरा देत तो किस्सा सांगितला..
ते म्हणाले तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. मला अर्थशास्त्राच्या एका पुस्तकातील संदर्भ वाचायचे होते. हे पुस्तक कॉलेजच्या लायब्रेरीत नव्हते. माहिती घेतल्यानंतर समजले की ते पुस्तक पुण्यात फक्त लोकमान्य टिळक यांच्याकडेच भेटू शकते. तेव्हा आमच्या प्राध्यापकांनी माझ्या नावे एक चिठ्ठी लिहली. लोकमान्यांनी संदर्भासाठी वाचण्यासाठी ते पुस्तक मला काही काळ द्यावे अस चिठ्ठीत लिहण्यात आलं.
ती चिठ्ठी घेवून मी टिळकांकडे गेलो. लोकमान्यांनी ती चिठ्ठी पाहून मी कोणकोणती पुस्तके वाचली आहेत ते विचारले. मला हव्या असणाऱ्या पुस्तकातून मला नेमकं काय हवं आहे याचीही चौकशी केली आणि दूसऱ्या दिवशी पुस्तक परत करण्याच्या अटीवर त्यांनी मला ते पुस्तक दिले.
दूसऱ्या दिवशी फर्ग्युसन कॉलेज विरुद्ध एसपी कॉलेज असा क्रिकेटचा सामना होता. तो सामना रद्द करून मी पुस्तक वाचत बसलो. संध्याकाळच्या पाच वाजेपर्यन्त पुस्तक वाचून झाले. त्यानंतर मी लोकमान्यांकडे गेलो.
लोकमान्य टिळकांच्या पुढे जाताच लोकमान्य टिळकांनी सीडी देशमुखांची परिक्षा घेण्यास सुरवात केली. पुस्तकातले काय वाचले, काय समजले असे एकामागून एक प्रश्न येत गेले आणि सिडी देशमुख त्यांचे उत्तरे देत गेले…
एकामागून एक प्रश्न आणि त्यांना मिळणारी उत्तरे ऐकून लोकमान्य टिळक समाधानी झाले. सीडी देशमुखांनी प्रश्नांची सरबत्ती संपल्यानंतर लोकमान्य टिळकांना वाकून नमस्कार केला तेव्हा आशिर्वाद देताना टिळक म्हणाले,
तू स्वतंत्र भारताचा अर्थमंत्री होशील…!!
लोकमान्य टिळकांची हीच भविष्यवाणी खरी झाली..
हे ही वाच भिडू
- नोटेवर सही करणारा पहिला मराठी माणूस. पाकिस्तानातही यांच्याच नोटा चालायच्या
- टिळकांनी लिहलेल्या मसुद्याच्या आधार घेऊनच वुड्रो विल्सन यांनी शांततेचे नोबेल मिळविलं
- टिळकांचे नातू हिंदू महासभेतून आले आणि काँग्रेसचे दिग्गज नेते बनले…