सरकारवर टीका केल्यामुळं चीनमधले सेलिब्रेटी गायब होत असल्याची चर्चाय…

जगाच्या राजकारणात सगळ्यात जास्त काड्या करणारा देश कुठला तर चीन. कोरोना असेल किंवा युद्धाची तयारी असेल काही मोठं कांड झालं की संशयाच्या सुया सगळ्यात आधी चीनकडे वळतात. आता जगाच्या राजकारणात काड्या करणारं चिनी सरकार, स्वतःच्या देशातही गप बसत नाही. तिथंही त्यांच्या कुरापती सुरू असतातच.

सध्या चीनमध्ये लोकं गायब होतायत. तीही साधीसुधी लोकं नाहीत, तर जगात थोडं वजन असलेली लोकं. म्हणजे आधी बिझनेसमॅन जॅक मा गायब झाले, मग अभिनेत्री फॅन बिगबिंग सापडेना झाली आणि काही दिवसांपूर्वी महिला टेनिसपटू पेंग शुआई गायब झाल्यानं सगळ्या जगात खळबळ उडाली.

या फेमस व्यक्ती गायब होण्यामागं एक समान धागा आहे, तो म्हणजे यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, सरकारमधले नेते किंवा सरकारवर टीका केली होती. या टीकेनंतरच हि लोकं गायब झाली आणि काही कालावधीनंतर जगासमोर आल्यावरही त्यांनी आपल्या गायब असण्याबद्दल वक्तव्य करणं टाळलं.

सध्या गाजत असलेलं टेनिसपटू पेंग शुआईचं प्रकरण नक्की काय आहे-

जागतिक क्रमवारीत अग्रस्थान भूषवणाऱ्या आणि दोन ग्रँड स्लॅम्स टायटल्स जिंकणाऱ्या पेंग शुआईनं दोन नोव्हेंबरला, चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीचे उपाध्यक्ष आणि कमिटी मेंबर झांग गाओली यांच्यावर गंभीर आरोप केले. गाओली यांनी तीन वर्षांआधी आपलं लैंगिक शोषण केलं असा आरोप तिनं केला. चीनमध्ये ट्विटर प्रमाणंच असलेल्या वेईबो या सोशल मीडिया साईटवर टाकलेल्या पोस्टमध्ये तिनं हे आरोप केले होते.

या साईटवर चीनच्या सरकारचं नियंत्रण असल्यानं काही तासांतच त्यांनी पेंग शुआईनं केलेली पोस्ट डिलीट केली. मात्र इतर नेटकऱ्यांनी त्या पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल करत झांग गाओलीचा बाजार उठवला. त्यानंतर, काही दिवसांतच पेंग शुआई गायब असल्याच्या चर्चा होऊ लागल्या.

टेनिस विश्वातून उठवला गेला आवाज

शुआई गायब झाल्यानंतर जागतिक टेनिस विश्वातून या विरोधात आवाज उठवण्यात आला. अनुभवी टेनिसपटू सेरेना विल्यम्स, नाओमी ओसाका यांच्यासोबतच रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच यांच्याकडूनही प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. पुढच्या वर्षी चीनमध्ये होणाऱ्या विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकावा अशी मागणीही ऑलिम्पिक कमिटीकडे करण्यात आली. ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्षांनी ‘शुआईसोबत व्हिडीओ कॉलवर बोलणं झालं, असून ती सुरक्षित आहे,’ अशी माहिती दिली. मात्र त्यांच्या या वक्तव्याला पब्लिसिटी स्टंट म्हणण्यात आलं.

चीनमधल्या अधिकाऱ्यांनीही शुआई ज्युनिअर टेनिस स्पर्धेच्या उद्घाटनाला आल्याचा व्हिडीओ प्रसारित केला. नेटकऱ्यांनी मात्र, ‘ती उद्घाटनाला येत असेल, तर स्वतःहून सुरक्षित असल्याचं का सांगत नाही?’ असा सवाल केला.

चीनमध्ये सामान्य लोकं गायब होण्यामागं अवयव विक्रीचं रॅकेट असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी केलेल्या तपासात चीनमधले काही लोक, अवयवांची तस्करी करत असून त्याचं रेटकार्डही बनवलं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं सेलिब्रेटी लोकांसोबतच सामान्य लोकं गायब होण्याकडंही गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन या देशांसह संयुक्त राष्ट्रेही करत आहेत.

चीन सरकारकडून मात्र हे आरोप धुडकावले जात आहेत. मात्र सरकारवर केलेल्या आरोपांनंतर सार्वजनिक कार्यक्रमात न दिसलेले जॅक मा, व्हिडीओ कॉलवर बोलणारी पण सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित न राहणारी फेंग शुआई यांच्यामुळं चीन सरकारवर दाटलेलं संशयाचं धुकं आणखीनच गडद होत चाललं आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.