गाण्याचे कार्यक्रम केले, सरकार दरबारी खेटे मारले अन अखेर दीनानाथ रुग्णालय उभं राहिलं

कुणीही औषधोपचारांविना वंचित राहू नये, या श्रीमती माई मंगेशकर यांच्या प्रेरणेतून आणि मंगेशकर भावंडांच्या प्रयत्नातून आणि ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या सहकार्यातून पुण्यात मा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय २००१ मध्ये उभे राहिले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे. खासगी रुग्णालय आणि उत्तम फॅसिलिटी असलेल्या या रुग्णालयाची निर्मिती कशी झाली याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

भारतरत्न लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे खासगी रुग्णालय उभारलं आणि त्याला वडिलांचं नाव दिलं. हे रुग्णालय उभं राहण्यामागे एक किस्सा आहे जो धनंजय केळकर यांनी त्यांच्या एका लेखात सांगितला होता,

मुळात हे हॉस्पिटल उभारण्यामागे लता मंगेशकरांच्या एका हळव्या भावनेची प्रेरणा आहे. त्यांच्या वडिलांना [ दीनानाथ मंगेशकर ] जर योग्य वेळी उपचार मिळाले असते तर त्यांना अजून आयुष्य लाभलं असत असं त्याकाळच्या किशोरवयीन लता दीदी आणि मीनाताईंना वाटलं असणार. पुढे लता मंगेशकरांनी वडिलांची आठवण म्हणून हे हॉस्पिटल उभारलं. 

काही वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांच्यावर एक शस्रक्रिया होणार होती. त्यावेळी परदेशात ती शस्रक्रिया व्हावी अशी इतरांची इच्छा होती पण त्यावेळी लता मंगेशकर म्हणाल्या कि,

भारतातले मोठे धनिक इथं मोठी हॉस्पिटल्स बांधतात आणि स्वतः अमेरिकेत उपचारासाठी जातात, त्यामुळे माझ्यावरची शस्रक्रिया इथंच व्हावी असं त्यांनी सांगितलं. 

हे हॉस्पिटल उभारण्यासाठी बऱ्याच लोकांनी कष्ट घेतले होते. १९८९ साली मंगेशकर कुटुंबीयांनी लता मंगेशकर फाउंडेशनची स्थापना केली. शासनाने या फाऊंडेशनला सहा एकर जागा हॉस्पिटल उभारणीसाठी दिली होती. ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्टनेसुद्धा या हॉस्पिटलच्या निर्मितीमध्ये महत्वाचा वाटा उचलला होता.

६ जून १९९८ साली या हॉस्पिटलची कल्पना मांडण्यात आली होती तेव्हा ४५० खाटांच रुग्णालय उभं करायचं असा सगळ्यांचा निर्णय होता. पण पुढे देणगीदार मिळत गेले तसं तस या रुग्णालयाला भव्य दिव्य रूप येत गेले. १८ महिन्यांमध्ये या हॉस्पिटलचं काम पूर्ण झालं होतं. या हॉस्पिटलच्या देणगीसाठी लता मंगेशकर या गाण्याचे कार्यक्रम करत असत. सरकार दरबारी तर त्यांचे खेटे सुरूच असायचे. 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या उद्धघाटनासाठी अटल बिहारी वाजपेयी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ होतं. तेव्हा भारत पाकिस्तान संबंधांमध्ये तणावाचे वातावरण असल्याने ते गंभीर होते. अशा परिस्थितीतही त्यांनी रुग्णालयाला देणगी देणाऱ्या लोकांचे, त्यांचे कुटुंबाचे आभार मानले होते. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर हि सगळी मोठी मंडळी उपस्थित होती.

या हॉस्पिटलच्या काही महत्वाच्या गोष्टींवर आपण नजर टाकू-

पुण्यात पहिल्यांदा मानवी दूध बँक हि दीनानाथ रुग्णालयात सुरु करण्यात आली. सहा एकरात असलेल्या या हॉस्पिटलच्या बेड्सची संख्या ९०० आहे. अत्यंत आधुनिक प्रकारचं तंत्रज्ञान या हॉस्पिटलमध्ये आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्यमवर्गीय लोकांच्या अगदी विश्वासाचं हे हॉस्पिटल आहे. सोयी सुविधांनी युक्त असं हे हॉस्पिटल आहे.

या हॉस्पिटलची खासियत म्हणजे रक्तपेढी, कर्करोग संशोधन केंद्र इत्यादी सर्व आधुनिक सुविधा इथे आहेत. रुग्णालयात सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टिमसह ६५ आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. रुग्णालयात सुसज्ज वातानुकूलित सभागृह आहे ज्यामध्ये ३००० लोकांची क्षमता आहे, प्रगत ध्वनी प्रणाली आणि अत्याधुनिक व्हिडिओ प्रोजेक्शन सिस्टम देखील आहे.

अगदी दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार किंवा शस्रक्रिया या केवळ चेन्नईसारख्या शहरात होत असायच्या त्या सध्याच्या काळात पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात करण्यात येतात. या हॉस्पिटलचा उद्देशच हा आहे कि सर्वसामान्य लोकांनां जास्त धावपळ करावी लागू नये आणि विश्वासाने त्यांच्या रुग्णावर उपचार होतील. सर्वसामान्य लोकांचा विश्वास जिंकून घेण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आजवर यशस्वी ठरलं आहे.  

सगळ्यात जास्त डॉक्टरांची संख्या या रुग्णालयात आहे. जवळपास सगळ्या रोगांवरील निदान करण्यासाठी हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. अगदी करोना काळात सुद्धा या महामारीला लढा देताना दीनानाथ रुग्णालय आणि तेथील डॉक्टर्स हे आघाडीवर होते. दिव्यांग आणि घरकाम करणाऱ्या महिलांना करोना काळात मोफत लसीकरण करून या रुग्णालयाने मदतीचा हात दिला.

कोरोना काळात अगदी पुण्यातील राजकीय मंडळी आणि अगदी अभिनेतेसुद्धा दीनानाथ रुग्णालयात उपचार घेत होते. महत्वाच्या व्यक्ती आणि वृद्ध नागरिकांना प्रथम प्राधान्य दीनानाथ रुग्णालयाने दिलं होतं. महाराष्ट्रभरातील सामान्य लोकांचा विश्वास असलेलं रुग्णालय म्हणून दीनानाथ हॉस्पिटल ओळखलं जातं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.