मुख्यमंत्र्यांवर टीका करणं भोवलं, राज्याने केंद्रीय मंत्री राणेंच्या अटकेचे आदेश दिलेत.

राज्यात आज अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यासाठी राज्य सरकारने आदेश काढले असतील. ही अभूतपूर्व परिस्थिती ओढवली आहे दस्तुरखुद्द भाजपच्या नवनियुक्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर.

त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचं एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहेत. 

पण प्रकरण नेमकं काय आहे ?

तर जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नारायण राणे सध्या मुंबई आणि कोकण पट्ट्याच्या दौऱयावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

पार्श्वभूमी 

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली.

आणि ठाकरे म्हंटले

“आज ७४ वर्षे पूर्ण करुन ७५ व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”,

यावर

रायगड जिल्ह्यातील महाड इथं जनआशीर्वाद यात्रेचा तळ ठोकला असताना, पत्रकारांशी बोलताना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत राणे म्हणाले,

“त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” 

आता हे झालंच पण नारायण राणे पुढं ही बरंच काही म्हंटले,

महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे.

पुढं राणेंचं हे वक्तव्य त्यांनाच भोवल..

  • मुख्यमंत्र्यांवर पातळी सोडून टीका केल्याप्रकरणी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. आणि नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने तात्काळ नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
  • महाडमध्ये ही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केली. युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर यांनी फिर्याद दिली असून महाड शहर पोलीस ठाण्यात नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • तर पुण्यातही शिवसेनेचे पुणे युवा सरचिटणीस रोहित रमेश कदम यांनी तक्रार दिली होती. चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांचे एक पथक त्यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले आहे. या पथका मध्ये दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे.

नारायण राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक येथूनच नारायण राणे यांना ताब्यात घेतील. दरम्यान चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

कोणत्या कलमांखाली नारायण राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे ?

ABP माझा या मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम १८९, ५०४, ५०५(२), ५०६, १५३-ब (१) (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कलमांतर्गत मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होईल असे वक्तव्य करणे यांसारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले आहेत.

आता हे प्रकरण इतक्यावरच थांबण्याची चिन्ह नाहीत. याला केंद्र विरुद्ध राज्य असा तीव्र रंग चढण्याची शक्यता राजकीय विशेषज्ञांकडून वर्तविली जात आहे.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.