पाकिस्तानातला गुरुद्वारा, ज्याचं भारत दुर्बिणीतून दर्शन घेतो !

केंद्र सरकारने गुरु नानक जयंतीच्या पूर्वसंध्येला देशातील सिख धर्मीय बांधवांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार पंजाबच्या गुरदासपुर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक पासून ते पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंतच्या कर्तारपूर साहिब कॉरीडॉरच्या निर्मितीस मंजूरी दिली. सिख बांधवांसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाकडे एक ऐतिहासिक निर्णय म्हणून बघण्यात येतंय.

केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात की हा निर्णय इतका का महत्वाचा आहे, कर्तारपूर साहिब गुरुद्वारा सिख बांधवांसाठी इतका खास का आहे..? आणि त्याचं पाकिस्तानशी नेमकं नातं काय..?

कर्तारपूर साहिब गुरुद्वारा

शिखांचे पहिले गुरु, गुरु नानक देव यांची आज जयंती.  त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील गुरूद्वार्यांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघण्यात येते. पण त्यातही कर्तारपूर साहिब गुरूद्वारा अतिशय पवित्र समजला जातो. सिख बांधवांसाठी जगातील सर्वाधिक पवित्र जागा असं म्हंटल तरी अतिशयोक्ती होणार नाही.

गुरु नानक देव यांचे निवासस्थान असल्याने सिख धर्मात कर्तारपूर साहिबला अतिशय महत्व आहे. गुरु नानक देव यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची अनेक वर्षे दिवस इथेच घालवली होती. शिवाय शेवटचा श्वास देखील इथेच घेतला होता. त्यामुळे त्यानंतर त्याठिकाणी एक गुरुद्वारा उभारण्यात आला. हा गुरुद्वाराच कर्तारपूर साहिब गुरुद्वारा म्हणून ओळखला जातो.

सिख-मुस्लीम एकतेचं प्रतिक

असंही मानलं जातं की गुरु नानक देव यांच्या मृत्युनंतर त्याचं पार्थिव शरीर गायब झालं होतं आणि त्याठिकाणी काही फुलं मिळाली होती. यातली काही फुलं सिख बांधव घेऊन गेले, तर काही फुलं मुस्लीम बांधव घेऊन गेले.

सिख बांधवांनी या फुलांचं दहन करून अंतिमसंस्कार केला, तर मुस्लीम बांधवांनी दफन करून अंतिमविधी पार पाडला. शिवाय त्यानंतर सिखांनी अंतिम संस्काराच्या ठिकाणी समाधी तर मुस्लिमांनी कबर बांधली. आज घडीला या गुरुद्वाऱ्यामध्ये समाधी आणि कबर दोन्हीही आहेत.

सिख-मुस्लीम एकतेचं प्रतिक म्हणून देखील या गुरुद्वाऱ्याकडे बघितलं जातं. कर्तारपूरच्या आसपासच्या गावातील मुस्लीम बांधव दान देऊन येथील लंगर चालवतात. सिखांसाठी गुरु नानकदेव त्यांचे गुरु आहेत, तर मुस्लिमांसाठी ते पीर आहेत.

भारतीय सिख बांधव घेतात दुर्बिणीतून दर्शन

सगळ्यात मोठी अडचण अशी की फाळणी झाली आणि कर्तारपूर पाकिस्तानात गेलं. सध्या हे ठिकाण पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यात आहे. लाहोरपासून १२० किलोमीटर अंतरावर असणारं हे ठिकाण भारत-पाक सीमेपासून फक्त ३ किलोमीटर अंतरावर आहे. परंतु आंतरराष्ट्रीय सिमेमुळे ते भारतीय सिख बांधवांसाठी खुल नाही.

सिख बांधवांसाठी हा गुरुद्वारा किती पवित्र आहे, याचा अंदाज आपल्याला यावरून येऊ शकतो की त्यांना गुरुद्वाऱ्याचं दर्शन करता यावं यासाठी भारत सरकारकडून एका दर्शन स्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या दर्शन स्थळावर एका दुर्बिणीची व्यवस्था केलेली आहे. देशभरातील सिख बांधव त्याठिकाणी येतात आणि दुर्बिणीतून गुरुद्वाऱ्याचं दर्शन घेतात.

केंद्र सरकारच्या ताज्या निर्णयामुळे किमान भारताकडून तरी डेरा बाबा नानक पासून तर कर्तारपूरपर्यंतचा भाविकांचा व्हिजा मुक्त प्रवास होऊन त्यांना गुरु नानक यांचे दर्शन करणे शक्य वाटू लागले आहे. आता या प्रक्रियेला पाकिस्तानकडून कसा प्रतिसाद मिळतो यावरच पुढचं चित्र अवलंबून असणार आहे. दरम्यान पाकिस्तानकडून देखील लवकरच या कॉरीडॉरच्या निर्मिती संदर्भात सकारात्मक घोषणा करण्यात येणार असल्याचा दावा माध्यमांमधील प्रकाशित बातम्यांमध्ये करण्यात आलेला आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.