सुपरमॅन, स्पायडरमॅनपेक्षा भारी, कंप्युटरहून तेज दिमाग असलेला चाचा चौधरी !

जगात सुपरमॅन, स्पायडरमॅन, हीमॅन, अँटमॅन, अॅक्वामॅन गेला बाजार बॅटमॅन असे अनेक सुपरहिरो येऊन गेले. कोण उडू शकतो तर कोणाकडे कोळ्याप्रमाणे जाळे फेकण्याची ताकद आहे तर कोण आपल्याकडे असलेला भरमसाठ पैसा वापरून सुपरहिरो सूट घालून फिरतोय. प्रत्येकाची वेगवेगळी सुपरपॉवर  मात्र तल्लख डोकं ही सुपरपॉवर मात्र एकाच हिरो कडे आहे.

आपले अस्सल भारतीय चाचा चौधरी

जगातल्या मोठ्यात मोठ्या सुपरहिरोला, सुपरव्हिलनला एका फटक्यात लोळवण्याची ताकद असणारे चाचा चौधरी जन्माला घातले भारताचे वाॅल्ट डिस्ने अशी ओळख असलेल्या प्राणकुमार शर्मा यांनी.

प्राणकुमार शर्मा मुळचे लाहोर जवळच्या कसूर गावचे. १५ ऑगस्ट १९३८ साली त्यांचा जन्म झाला. फाळणीनंतर त्यांचं कुटुब भारतात आलं. परिस्थिती हलाखीची होती मात्र घरच्यांना शिक्षणाचे महत्व ठाऊक होते त्यांनी प्राणकुमार शर्मा यांचे शिक्षण थांबवल नाही.

ग्वाल्हेरच्या महाविद्यालयात पोलिटिकल सायन्सची डिग्री घेतली. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन दिल्ली विद्यापीठातून केलं. एवढ शिक्षण म्हणजे त्या काळी चांगल्या पगाराची नोकरी हमखास मिळाली असती पण त्यांचा ओढा चित्रकलेकडे होता.

मुंबईच्या जेजे स्कूलमध्ये प्राणकुमार शर्मा यांना अॅडमिशन मिळाल आणि तिथून पुढे त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.

जेजे मध्ये त्यांना कार्टून्सची ओळख झाली. भारतात या पूर्वी फक्त राजकीय व्यंगचित्रे काढली जात होती. आर.के लक्ष्मण, के शंकर पिल्लई, बाळासाहेब ठाकरे असे दिग्गज व्यंगचित्रकार होते मात्र लहानमुलांच्या कार्टूनक्षेत्रात काम विशेष होत नव्हतं.

प्राणकुमार शर्मा यांनी कॉलेज पूर्ण झाल्यावर वर्तमानपत्रासाठी कार्टूनस्ट्रीप काढायला सुरवात केली. मिलाप या वर्तमानपत्रात डाबू हा त्यांचा पहिला कार्टून छापून आला. तो बऱ्यापैकी गाजला. त्यानंतर काही छोटे मोठे कॅरेक्टर्स बनवले पण त्यांना सर्वात मोठा ब्रेक मिळाला चाचा चौधरी मूळे.

चाचा चौधरी म्हणजे गावाकडचा एक बुजुर्ग म्हातारा ज्याच्याकडे प्रत्येक गोष्टीच सोल्युशन असते.

प्राणकुमार शर्मा म्हणतात त्यांनी लहानपणी गावाकडे असे कॉमन सेन्स असणारी म्हातारी माणस पाहिली होती शिवाय इतिहासात मगध साम्राज्य उभे करायला चन्द्र्गुप्ताला प्रेरणा देणारे आर्य चाणक्य यांच्यावरून स्फूर्ती घेतली.

१९७१ साली लोटपोट या मासिकात पहिल्यांदा चाचा चौधरी अवतरले.

चाचा चौधरींची हुशारी, हजरजबाबीपणा, कम्प्युटरपेक्षा तेज डोकं हा त्याचा युएसपी होता. जगातला आजवरचा कोणताही सुपरहिरो कंप्युटर पेक्षा तेज दिमाग ही सुपरपॉवर वापरणारा नव्हता.

भारतात काही कॉमिक्स तयार होत होते मात्र ते सरळ सरळ पाश्चात्य सुपरमनचे भ्रष्ट कॉपी होते. चाचा चौधरी मात्र अस्सल भारतीय मातीतला होता. त्याच्यावर कोणाचाही प्रभाव नव्हता. अगदी कपडे सुद्धा गावाकडच्या चौधरीचे. अंगात कुडता, नेहरू जॅकेट, लाल पगडी आणि नाकाखाली भरघोस अनुभवाने पिकलेल्या भरघोस मिश्या.

गावात कोणालाही कसलाही प्रॉब्लेम आला तर मिडलक्लास घरात राहणारे हे चाचाजी एकटेच सगळ्या समस्या सोडवायचे. 

पुढे गावातल्या समस्या भयंकर बनू लागल्या. सिनेमाच्या इफेक्टमुळे लहानमुलांच्याही विश्वस्त खळबळ उडाली होती. अखेर अनेकांच्या आग्रहाखातर चाचाजींच्या मदतीला साबू ला आणले गेले.

हा साबू मात्र प्रचंड सुपरपॉवर असणारा होता. तो ज्युपिटर या ग्रहावरून आलेला होता, तो ज्युपिटरप्रमाणेच प्रचंड आकाराचा होता, त्याची ताकददेखील अशीच अफाट होती. एकवेळी १०८ पराठे, २० लिटर लस्सी,१२ किलो हलवा खाणारा साबू चाचाजींच्या इशाऱ्यावर कोणत्याही संकटाला भिडण्यास तयार असायचा.

तो पृथ्वीवर थांबला याच कारण म्हणजे चाचीच्या हातचे स्वादिष्ट पराठे त्याने खाल्ले होते.

बिनी चाची म्हणजे पण एक भारी कॅरेक्टर होती.

चाचाजींच जगात कितीही वजन असल तरी घरात श्रीमतीजींच ऐकाव लागायचं. छोट्याशा बुटक्या चाचाजीना ही लठ्ठ बिनी चाची कायम मला सोन्याची दागिने घेत नाही म्हणून कटकट करत असायची. खास मध्यमवर्गीय घरात चालणारे भांडण इथे पण चालायचे. कितीही वैताग असला तरी आपल्या साबूला लागणारा प्रचंड स्वयंपाक मात्र ती रांधायची.

या चौधरी कुटुंबात एक रॉकेट नावच कुत्र देखील होतं. हे कुत्र म्हणे जगातलं एकमेव शाकाहारी कुत्रं होतं. असे हे चाचा चौधरी आपल्या टीमसह कधी गोबरसिंग तर कधी राका अशा व्हिलनशी फाईट करायचे. राका हा साबू प्रमाणेच ताकदवान असतो पण त्याला अमरत्व मिळालेले असत.

24076129

साबू आणि त्याची फाईट अनेकदा रंगते मात्र चाचाजींच्या हुशारीवर साबू राकाला हरवण्यात कायम बाजी मारत असतो.

या चाचा चौधरीच्या कार्टूनने भारताच्या कानाकोपऱ्यातल्या लहान मुलांना खिळवून ठेवले. सुरवातीला लोटपोट या मासिकात येणारे हे कार्टून डायमंड पब्लिकेशन्स तर्फे स्वतंत्र कॉमिक्स म्हणून प्रसिद्ध होऊ लागले. 

भारतीयांना कॉमिक्स वाचायची सवय प्राणकुमार शर्मा यांच्या चाचा चौधरींमुळे लागली. प्राणकुमार शर्मा यांनी पिंकी, बिल्लू असे बरेच कॉमिक्स बनवले. हिंदी वाचणाऱ्या अनेक पिढ्या या कॉमिक्सवर मोठ्या झाल्या.

चाचा चौधरीची प्रसिद्धी मात्र प्राणकुमार यांच्याच नाही तर इतर कोणत्याही भारतीय कॉमिक्सला जमली नाही. चाचा चौधरी एकमेव अनोखे ठरले. त्याची मराठी, गुजराती,बंगाली, हिंदी, इंग्रजी अशा १० भाषांमध्ये निर्मिती होत होती.

केबल टीव्हीच्या जमान्यातही मुले चाचा चौधरींच्या कॉमिक्सची वाट बघत होते.

लहानमुलांना चांगली शिकवण देणे, त्यांना खोटेपणा, व्यसन, वाईट गोष्टी याच्या विषयी राग निर्माण करणे असे संदेश या सिरीयल मधून दिले जात होते. काही वेळा सरकारी योजनांच्या प्रसिद्धीसाठी देखील चाचा चौधरींचा वापर केला गेला.

पुढे २००२ साली सहारा वन या चॅनेलने रघुबीर यादव यांना घेऊन चाचा चौधरी ही सिरीयल बनवली. ती सुद्धा बऱ्यापैकी फेमस झाली. 

प्राणकुमार शर्मा यांच्या कल्पकतेने आणि त्यांच्या हातातील जादूमुळे अनेक पिढ्यांवर चाचा चौधरींचे गारुड राहिले. खुद्द इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. इतकेच काय त्यांना भारतीय वाल्ट डिस्नेची उपाधी देण्यात आली. अमेरिकेतील इंटरनशनल म्युजियम ऑफ कार्टून आर्ट्स या संग्रहालयात चाचा चौधरी या एकमेव कॉमिक कॅरेक्टरचे चित्र लावण्यात आले.

अशा या महान कार्टूनिस्टचे २०१४ साली कॅन्सरच्या विकाराने निधन झाले. त्यांची सर्व पात्रे पोरकी झाली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून २०१५ साली भारत सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मश्री हा पुरस्कार दिला.

बाकीचे सुपरहिरो लहानमुलांना घराच्या गच्चीतून हात पाय मोडायला शिकवत होते अशा काळात सुपरहिरो बनण्यासाठी अभ्यास करण्याची प्रेरणा देणारा जगातला एकमेव कॉमिक्स चाचा चौधरी यांच्या निर्मात्याचा म्हणजेच प्राणकुमार शर्मा यांचा हा प्रवास.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.