महाराष्ट्रात तेव्हा चड्डी काँग्रेस विरुद्ध धोती काँग्रेस लढाई फेमस झाली होती

काँग्रेस पक्ष म्हणजे एखाद्या पुरातन वटवृक्षाप्रमाणे आहे. त्याच्या पारंब्या कुठंकुठं पर्यंत पोहचल्या आहेत हे सांगता येत नाही. जवळपास १३० वर्षांची परंपरा असलेला हा पक्ष किती वेळा फुटला आणि कसा फुटला याला गणना नाही. प्रत्येक पिढीची लोक म्हणतात पूर्वीची काँग्रेस आता राहिली नाही. कोणी म्हणतं गांधींची काँग्रेस स्वातंत्र्यानंतर संपून  गेली. कोणी म्हणतं शास्त्रीजींच्या नंतर काँग्रेस इंदिरा काँग्रेस बनली.

काँग्रेसची आजवरची नावे आणि त्याचे किस्से अफाट आहेत. याच काँग्रेसचा महाराष्ट्रातला नावाचा हा गंमतीशीर किस्सा.

गोष्ट आहे १९७८ सालची. आणीबाणी संपून काही काळ उलटला होता. केंद्रात जनता पक्षाचं सरकार होतं. आणिबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत कॉग्रेसचा दारूण पराभव झाला होता. उत्तरेतल्या सर्व राज्यात कॉग्रेसची धुळधाण उडाली होती. मध्यप्रदेशातून माधवराव शिंदे हा एकमेव उमेदवार सोडल्यास कॉग्रेसचा दुसरा कोणी खासदार लोकसभेत निवडून आलेला नव्हता. अगदी रायबरेलीमध्ये इंदिराजी व बाजूला अमेठीत संजय गांधी पराभूत झाले होते. मग मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता सरकार बनले व विरोधीपक्ष नेतेपद यशवंतराव चव्हाण यांना मिळाले. 

पण काँग्रेसमध्ये काही आलबेल नव्हतं. आणिबाणीमधील चुकांचे खापर इंदिरा गांधी आणि संजय गांधींवर फोडण्यात आलं. पक्षातील नाराजी वाढू लागली. त्यात हे दोन्ही नेते पराभूत झाल्याने त्यांच्याविरुद्ध पक्षातल्या इतर नेत्यांना जोर चढला होता.  

त्याकाळात कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते के. ब्रह्मानंद रेड्डी तर संसदेतील विरोधी पक्ष नेते होते यशवंतराव चव्हाण. काँग्रेसच्या इतर नेत्यांशी इंदिरा गांधींचे वाद वाढले. त्यातून इंदिराजी आपल्या निष्ठावंताना घेऊन बाहेर पडल्या. 

इंदिरा गांधींनी नवीन पक्ष स्थापन केला. या पक्षाला इंदिरा काँग्रेस म्हणून ओळखलं जाऊ लागलं. दुसरा पक्ष ब्रम्हानंद रेड्डी यांच्यामुळे रेड्डी काँग्रेस म्हणून ओळखला जाऊ लागला. दोन्ही काँग्रेसचा दावा होता कि आम्हीच खरा काँग्रेस पक्ष आहोत.

या नव्या दोन्ही पक्षांची पहिली परीक्षा १९७८ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवेळी होणार होती.

इंदिरा गांधींनी वेगळा पक्ष जरी काढला असला तरी महाराष्ट्रातले काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते यशवंतरावांच्यामुळे रेड्डी काँग्रेसमध्ये गेले होते. जे काही मोजके नेते उरले होते त्यांना फार मोठा जनाधार नव्हता. यशवंतराव चव्हाणांचे विरोधक हीच काय या नेत्यांची ओळख होती. यात होते कोकणातले बॅरिस्टर अंतुले, विदर्भातले वसंतराव साठे, नासिकराव तिरपुडे. 

पश्चिम महाराष्ट्रातील वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासारखे बहुतांश नेते यशवंतरावांच्या पाठोपाठ रेड्डी काँग्रेसमध्ये गेल्या मुळे इंदिरा काँग्रेसची उरली सुरली ताकद विदर्भातच दिसत होती. इंदिरा गांधीनी विदर्भातल्या नासिकराव तिरपुडे यांना आपल्या या नव्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले. तिरपुडे यांनी प्रयत्नाने विदर्भाचा सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबुवंतराव धोटे यांना पक्षात आणलं. 

१९७८ च्या निवडणुकीत या दोघांनी इंदिरा कॉग्रेसच्या प्रचाराची मुख्य धुरा वाहिली. जेव्हा हे दोन्ही पक्ष प्रचाराला उतरले तेव्हा ते सगळेच मूळचे काँग्रेसचे असल्यामुळे मतदारांमध्ये देखील जाम कन्फ्युजन व्हायचं. त्यातूनच कोणातरी चलाख डोक्याच्या पत्रकाराने या दोन्ही पक्षांना नवी टोपणनावे पाडली.

एक म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि ब्रम्हानंद रेड्डी यांच्या आडनावावरून ‘च’ ‘ड्डी’ काँग्रेस. तर दुसरे जांबुवंतराव धोटे आणि नासिकराव तिरपुडे यांच्या आडनावावरून ‘धो’ ‘ति’ काँग्रेस. आधी तर टोमणा म्हणून हि नावे पाडण्यात आली होती पण पुढे गंमती गंमतीमध्ये हि टोपण नावे प्रचंड फेमस झाली. 

वर्तमानपत्रातून तर त्याचा वापर झालाच पण शिवाय जनता देखील याच चड्डी काँग्रेस आणि धोती काँग्रेस वरून उमेदवारांना ओळखू लागली.  

१९७८ सालच्या विधानसभा निवडणुका तिरंगी झाल्या. जनता पक्षाची देशभरात हवा होती पण चड्डी काँग्रेस आणि धोती काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. विदर्भ मराठवाड्यात धोती काँग्रेस तर इतरत्र चड्डी काँग्रेसने यश मिळवलं. 

विधानसभेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. जनता पक्ष अपक्षांना घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत होता. चड्डी काँग्रेस आणि धोती काँग्रेस एकत्र येतील असं त्यांना स्वप्नात देखील वाटत नव्हतं. पण शरद पवार यांच्या चाणक्यनीतीने चमत्कार केला आणि चड्डी धोती एकत्र आले. चड्डी काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री तर धोती काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले.

हे चड्डी धोतीचं सरकार मात्र फार काळ टिकलं नाही. दोन्ही पक्षातल्या नेत्यांच्या कुरबुरी वाढल्या. शरद पवारांनीच योजनाबद्ध पद्धतीने वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं आणि आपला गट वेगळा काढून जटा पक्षाच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. हेच ते सुप्रसिद्ध पुलोद सरकार आणि हाच तो कुप्रसिद्ध  खंजीर खुपसण्याचा प्रयोग.   

संदर्भ- जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा ब्लॉग 

हे ही वाच भिडू.

  

Leave A Reply

Your email address will not be published.