चाफेकर बंधूनी ज्याला मारलं त्याच रँडने पुण्यात नायडू हॉस्पिटल स्थापन केले होते

गेले वर्षभर झाले कोरोनाने सगळ्या जगाला छळले आहे. अजूनही हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. लस मिळाल्यावर संकट टळलं असं वाटत असतानाच दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रावर आक्रमण केलंय. काही महिन्यांपूर्वी बंद केलेली कोरोना जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जवळपास सव्वाशे वर्षापूर्वी अशाच एका संसर्गजन्य रोगाने भारताला वेठीला धरले होते.

तो रोग म्हणजे प्लेग.

1896 साली आलेल्या पुरामुळे मुंबईतल्या गोदामातले उंदीर मेले हा रोग सगळीकडे पसरला. शेकडो जनांचा मृत्यू झाला. लाखो जण शहर सोडून निघू लागले. रेल्वे जहाजावर तपासणी केल्याशिवाय प्रवेश मिळेना झाला होता. पण तरीही अस्वच्छतेमुळे फैलावणाऱ्या या रोगाने पुण्यात एंट्री केली.

19 डिसेंबर रोजी पुण्याच्या रास्तापेठेत प्लेगचा पहिला रुग्ण सापडला. काहीच दिवसात पुण्यात या रोगाने आक्राळविक्राळ रूप धारण केले. सगळीकडे हाहाकार उडाला.

तेव्हाच्या इंग्रज सरकारने प्लेगवर मात करण्यासाठी एक प्लेग प्रतिबंधक समिती स्थापन केली. याचा कमिशनर होता वॉल्टर चार्ल्स रँड.

तेव्हाची आयसीएस परीक्षा पास होऊन भारतात ब्रिटिश सेवेसाठी दाखल झालेला रँड यापूर्वी साताऱ्यात उपजिल्हाधिकारी होता. धडाक्यात निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करणारा अधिकारी अशी त्याची ओळख होती.

डब्ल्यू सी रँडने पुण्यात प्लेगशी लढा देण्याची जबाबदारी उचलली. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे या रोग्यांना एकत्र ठेवण्यासाठी मुळा-मुठेच्या संगमावर प्लेग हॉस्पिटल सुरू करण्यात आले.

संसर्ग पसरू नये म्हणून मुद्दामहून शहराबाहेरची जागा निवडण्यात आली होती. तिथेच रुग्णासाठी विलगीकरण छावणी सुरू केली. या प्लेग हॉस्पिटलचे पहिले मेडिकल ऑफिसर होते डॉ. अॅडम्स वायली.

मार्च महिना उजाडला तसा पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घालायला सुरवात केली. तरी खूप जण आपले घर सोडून मदतीच्या छावणीत येण्यास तयार नव्हते. ते एकोणीसावे शतक होते, अंधश्रद्धानी भारतीय समाज व्यवस्थेला पोखरल होत.

प्लेग हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे धर्म बाटेल अशी भीती पुण्यातील अनेकांना होती.

प्लेग थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. अखेर रँडने मिल्ट्रीला बळजबरीने लोकांना घरातून बाहेर काढण्याचे आदेश दिले. यासाठी 893 जणांची तुकडी तैनात केली होती.

पुणेकरांनी जोरदार विरोध केला. सैनिक बूट घालून घरात शिरतात, देवघरात जातात, बाया मुलींनासुद्धा उचलून बाहेर आणतात असे आरोप होऊ लागले.

लोकमान्य टिळकांनी देखील रँडच्या या बळजबरीवर आपल्या अग्रलेखातुन जोरदार हल्ला चढवला.

सैनिकांच्या संख्ये पेक्षा डॉक्टरांची संख्या जास्त असती तर बरं झालं असत अस त्यांचं म्हणणं होतं. भारतीयांच्या धार्मिक भावना परंपरा दुखावू नये अन्यथा याचे परिणाम वाईट होतील असे अनेकांचे मत होतं.

तर मेडिकल इमर्जन्सीच्या वेळी जातपात सोवळे ओवळे पाळणे योग्य नाही असे रँडच मत होतं.

भीती खरी ठरलीच. प्लेगच्या साथीत झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधूनी २२ जून १८९७ रोजी गणेशखिंड रोडवर गोळ्या घालून रँडची हत्या केली. लोकमान्य टिळकांचा त्यांना आशीर्वाद होता अस म्हटलं जातं.

रँड च्या मृत्यूनंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दडपशाही कमी केली.

पुढे अनेक वर्षे हे पुण्याच्या जनरल प्लेग हॉस्पिटलमध्ये फक्त प्लेगच नाही तर अनेक संसर्गजन्य रोगांचे रोगी भरती केले जात होते.

महानगरपालिका आणि मुंबई सरकार, लष्करी खाते, जिल्हा लोकल बोर्ड या सगळ्यांच्याकडे या रुग्णालयाच्या खर्चाची वाटणी करण्यात आली होती. बरीच वर्षे पुण्याला प्लेगने छळले.

१९३३ साली प्लेग प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष असणाऱ्या डॉ. नायडू यांचं नाव या हॉस्पिटलला देण्यात आले.

आज स्थापना होऊन १२५ वर्षे झाली आजही स्वाइन फ्लू असो वा कोरोना प्रत्येक संसर्गजन्य रोगाचा उपाय पुण्यात नायडू हॉस्पिटल या एकमेव रुग्णालयातच होतो आणि याचे श्रेय जाते पुणेकरांवर अत्याचार करणाऱ्या रँडला.

संदर्भ – health care in bombay Presidency, 1896-1930

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Vitthal says

    It’s a fact!

Leave A Reply

Your email address will not be published.