महापौर असलेल्या भुजबळांनी हुतात्मा चौकाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले होते

ऐंशीच्या दशकाचा काळ. मराठी माणसाचा आव्वाज म्हणून झालेल्या शिवसेनेला हिंदुत्व गवसलं होतं.  हातात रुद्राक्षाची माळ, अंगावर भगवी शाल पांघरलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचारसभा गाजवू लागले. गर्व से कहो हिंदू है ची घोषणा शिवसेनेने प्रसिद्ध केली होती. रामजन्मभूमी आंदोलनामुळे   संपूर्ण देश भारावून गेला होता.

याच आक्रमक हिंदुत्वामुळे एकदा आंबेडकरी चळवळीचे नेते आणि शिवसैनिक आमनेसामने आले होते.

याला कारणीभूत ठरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला रिडल्स इन हिंदुइजम हा ग्रंथ.

इ.स. १९५६ च्या सप्टेंबर महिन्यात आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला होता. त्यांना त्या ग्रंथात काही फेरफार करायचे होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. पहिल्यांदा १९८७ साली महाराष्ट्र राज्य सरकारने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे’ या श्रृंखलेखालील खंड चौथा म्हणून हा ग्रंथ प्रकाशित केला होता. या ग्रंथात ग्रंथकाराने हिंदू धर्मातील अतार्किक बाबींवर प्रकाश टाकलेला आहे. मात्र त्यांनी राम-कृष्णादी पौराणिक देवतांवर केलेले विवेचन विवादास्पद ठरले होते.

हा ग्रंथ प्रकाशित करण्यात येण्यापूर्वीचे लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांनी या ग्रंथात राम व कृष्ण याचा अवमानकारक करणारा मजकूर असल्याचा लेख लोकसत्तातील आपल्या साप्ताहिक सदरात लिहिला. हा ग्रंथ हिंदुविरोधी आहे अशी चर्चा सुरु झाली.

जेष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत या वादात पडल्या. त्यांनी लोकसत्तात मोठा लेख लिहून डॉ. बाबासाहेब याच्या ग्रंथावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अरुण कांबळे, राजा ढाले, रूपा कुलकर्णी-बोधी, नामदेव ढसाळ, कुमार सप्तर्षी आदी मैदानात उतरले.

त्यानंतर या ग्रंथावर बंदी आणण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. शिवसेना या वादात उतरल्यावर प्रकरणाला मोठे वळण लागले.

अखेर सरकारने या ग्रंथातील राम-कृष्ण याच्याबाबतचे परिशिष्ट मागे घ्यावे अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा दमच शिवसेनेकडून भरण्यात आला. यावर तीव्र प्रतिक्रिया म्हणून दलितांच्या विविध संघटना एकवटल्या व त्यांनी बोरिबंदरपासून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढण्याचे ठरवले.

२३ नोव्हेंबर १९८७ रोजी सीएसटी (तेव्हाची बोरिबंदर) स्थानकापासून मंत्रालयापर्यंत हा रिडल्सच्या मोर्चानिघाला होता. जवळपास दहा लाख दलित कार्यकर्त्यांचा मोर्चा अविस्मरणीय असाच होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रेमापोटी राज्यातील खेडयातील जनता या मोर्चासाठी रस्त्यावर उतरली होती.

राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेले अबाल वृद्ध महिला पुरुष सगळे कार्यकर्ते बोरिबंदर परिसरात जमले व मोर्चाला सुरुवात झाली. मजलदरमजल करीत हा मोर्चा लाखोंच्या संख्येने सरकारच्या नावाने घोषणा देत हुतात्मा चौकापर्यंत धडकल्यानंतर काळाघोडा परिसरात हा मोर्चा पोलिसांनी अडवला. आंदोलन विसर्जित झाले. पण प्रकरण इथेच संपलं नाही. त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी देखील उमटले.

दुसऱ्या दिवशी शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे तेजतर्रार नेते छगन भुजबळ  कार्यकर्त्यांसह हुतात्मा चौकात आले. त्याकाळात मुंबईचे महापौर देखील होते. त्यांनी सोबत आणलेल्या गोमूत्राच्या बाटल्या तिथे रिकाम्या केल्या. आंदोलनामुळे अपवित्र झालेली हुतात्मा चौकाची भूमी आम्ही पवित्र केली अशी भाषा शिवसैनिकांनी वापरली.

छगन भुजबळांनी केलेल्या या प्रकारामुळे पुन्हा वाद पेटला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

अखेर सर्व आंबेडकरी नेते, बाळ ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी एकत्रित बोलवलं. “या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी महाराष्ट्र सरकार सहमत असेलच असे नाही”, अशी तळटीप टाकण्याच्या तडजोडीवर हा वाद मिटवला. 

या घटनेला तीस वर्षे ओलांडली. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले. समता परिषदेच्या मार्फत मागास्वर्गीगीय समाजावर होणाऱ्या अत्याचाराला ते वाचा फोडतात. पण कितीही पुरोगामीत्व त्यांनी स्वीकारलं असलं तरी त्यांचे विरोधक करताना या प्रसंगाची आठवण नेहमी करतात.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.