पक्ष फोडणाऱ्या भुजबळांना पराभूत करण्यासाठी बाळासाहेबांनी नगरसेवकाला मैदानात उतरवलं होतं
गोष्ट आहे नव्वदच्या दशकातील. १९९० ची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली होती. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना आणि भाजपची पहिल्यांदाच युती झाली होती. निकाल जाहीर झाला तेव्हा १४१ जागा जिंकत काँग्रेसने सत्ता राखली होती. तर शिवसेनेला ५२ आणि भाजपला ४२ जागा मिळाल्या होत्या.
विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन सुरु होते. मात्र याच अधिवेशनाच्या दरम्यान एक दिवस अचानक बातमी आली,
१८ आमदारांना घेऊन छगन भुजबळांनी शिवसेना फोडली.
या बातमीनंतर शिवसेना पक्ष आणि शिवसैनिकांचा अक्षरशः तिळपापड झाला होता. गद्दारांना कधीच माफी नाही म्हणत बाळासाहेब ठाकरेंनी भुजबळांना ‘लखोबा लोखंडे’ची उपमा दिली होती. शिवसैनिकांनी त्याकाळात छगन भुजबळांना धडा शिकवण्यासाठी जंग जंग पछाडलं होतं. पण काही केल्या भुजबळ सापडले नव्हते. त्यांना चोवीस तास पोलीस संरक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं.
भुजबळ १८ आमदारांना घेऊन बाहेर पडले होते. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यतून कारवाईची शक्यता होती. मात्र त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्यामुळे भुजबळांची पक्ष फुटी कायद्याने टिकली. परिणामी आमदारकी वाचली. मात्र त्यानंतर काहीही करून भुजबळांना १९९५ च्या निवडणुकीत घरी बसवायचे असा चंगचं शिवसैनिकांनी बांधला होता.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी देखील १९९५ च्या निवडणुकीपर्यंत हि गोष्ट डोक्यात ठेवली होती.
पुढे १९९५ ची निवडणूक जाहीर झाली आणि भुजबळांचा माझगाव विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला. शिवसेना आता भुजबळांविरोधात कोणाला उतरवणार? असा प्रश्न होता. निवडणूक प्रतिष्ठेची होती, त्यामुळे सेनेकडून कोणीतरी मोठा चेहरा असणार हे नक्की होते, फक्त ते कोण याची सबंध महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती. आणि नाव जाहीर झाले.
नगरसेवक बाळा नांदगावकर.
सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण छगन भुजबळ दोनदा महापौर, आमदार, मंत्री असा एक एक टप्पा चढत दिग्गज नेते बनले होते. सोबतच निवडणुकीत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला होती. अशा स्थितीमध्ये एका नगरसेवकाला उमेदवारी दिल्यामुळे बरीच चर्चा सुरु होती. पण बाळासाहेब ठाकरे यांचा निर्णय झाला होता.
त्यांनी बाळा नांदगावकरांना आदेश दिला आणि ते देखील हा आदेश शिरसावंद्य मानून भुजबळांविरोधात मैदानात उतरले.
बाळा नांदगावकर तेव्हा इनमीन ३७-३८ वर्षांचे तरुण नेते होते. महापालिकेचे नगरसेवक म्हणून काम करत होते. आक्रमक स्वभावामुळे आणि त्यांच्या कामांमुळे ते मतदारसंघात देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते. सोबत बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे जे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते होते त्यामध्ये सुद्धा बाळा नांदगावकर यांचं नाव होते.
मात्र भुजबळांविरोधात त्यांना पहिल्यांदाच माझगावमधून विधासभेसाठी मैदानात उतरवण्यात आले होते.
छगन भुजबळांचा हा पारंपरिक मतदारसंघ होता. १९८५ ला ते पहिल्यांदा याच मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यानंतर १९९० ला पण ते इथूनच ७ हजार मतांनी निवडून आले होते. पुढे मंत्री झाले होते. त्यामुळे बाळा नांदगावकर यांच्यासाठी एकप्रकारे हि निवडणूक आव्हानात्मक वाटत होती. मात्र प्रचार दोन्ही पक्षांकडून अत्यंत चुरशीचा झाला होता. मतदान पार पडले.
जेव्हा निकाल लागाला तेव्हा मात्र तरुण तुर्क बाळा नांदगावकर जायंट किलर ठरले होते. त्यांना तब्बल ४१ हजार ७२९ मत मिळाली होती. तर काँग्रेसकडून उभ्या असलेल्या भुजबळांना २९ हजार ४५४ मत मिळाली होती. बाळा नांदगावकर १२ हजार २७५ मतांनी निवडून आले होते.
बाळासाहेब ठाकरेंच्या वाघाने भुजबळांना पराभूत करून पहिल्यांदा विधानसभा गाठली अशी चर्चा त्यावेळी महाराष्ट्रभर सुरु होती.
यानंतर बाळा नांदगावकर अफाट प्रसिध्द झाले.असं म्हणतात कि, माझगावमधील तो पराभव भुजबळ यांच्या इतका जिव्हारी लागला की त्यानंतर त्यांनी मुंबईतील राजकारणातील आवरून नाशिकमध्ये निघून गेले. त्यानंतर नांदगावकर १९९९, २००४ असे सातत्यानं या मतदारसंघातून निवडून येत गेले.
हे हि वाच भिडू
- बाळासाहेबांच्या सुरक्षेवरून राणे आणि भुजबळांच्यात मोठी खडाजंगी झाली होती..
- खूप टीका सुरु झाली कि बाळासाहेब परबांना सांगायचे, अनिल त्या केबलच्या तारा खेच.
- मनोहर जोशींनी स्कीम केली आणि भुजबळांना पवारांच्या विरुद्ध निवडणुकीला उभं केलं.