मनोहर जोशींनी स्कीम केली आणि भुजबळांना पवारांच्या विरुद्ध निवडणुकीला उभं केलं.

ऐंशीच्या दशकातला काळ. महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे मोठा स्पेस होता. जनता दल, शेकाप यांची विरोधी पक्षाची जागा भरून काढण्यासाठी शिवसेना भाजप हे पक्ष प्रयत्नशील होते. अनेक नवीन नेते या आंदोलने चळवळी यातून समोर येत होते. आक्रमक तरुण कार्यकर्त्यांची फळी उभी राहत होती.

यात आघाडीवर होते शिवसेनेचा ढाण्या वाघ समजले जाणारे छगन भुजबळ.

एका सर्वसामान्य भाजी विक्रेत्या कुटूंबात जन्म घेऊन मुंबईच्या महापौरपदापर्यंत पोहचायचा पराक्रम त्यांनी करून दाखवला होता. सेनेच्या वरच्या फळीत त्यांचं नाव घेतलं जायचं. आक्रमक भाषण शैली मुळे ते फेमस झाले होते.

‘सुंदर मुंबई, मराठी मुंबई’ या नाऱ्यामुळे त्यांची महापौरपदाची कारकीर्द खूप गाजली. त्यामुळे प्रसिद्धीही खूप मिळाली होती.

शिवसेना महाराष्ट्रभर वाढवण्यासाठी बाळासाहेबांचे प्रयत्न सुरु होते. तेव्हा त्यांच्याबरोबर छगन भुजबळ देखील कायम स्टेजवर असायचे. बेळगाव-कारवारच्या आंदोलनात  भुजबळांनी बेळगावमध्ये वेश बदलून प्रवेश केलेला प्रवेश प्रचंड गाजला. त्यांना तिथल्या पोलिसांनी मारहाण देखील केली, जवळपास  दिड महिने ते कर्नाटकाच्या जेलमध्ये होते.

भुजबळ तिथून बाहेर आले ते राज्याचा मोठा नेता बनूनच. त्यांच्या या कामगिरीमुळे शिवसेनेची आणि त्यांची लोकप्रियता त्या भागामध्ये प्रचंड वाढली होती.

साधारण १९८६ सालचा डिसेंबर महिना असेल. बेळगाव कारवार सीमाआंदोलनातून थोडी उसंत मिळाल्यावर छगन भुजबळ आपल्या कुटुंबियांना घेऊन कोडाईकनालला चार दिवस सहलीसाठी गेले होते.

तिथे पोहचल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांना मुंबईहून मनोहर जोशींचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, गरवारे क्लबची निवडणूक आहे, विरुद्ध बाजूला शरद पवार आहेत आणि त्यांच्यासमोर निवडणुकीत तुम्हाला उभं राहायचं आहे.

भुजबळ तेव्हा गरवारे क्लबचे मेंबर होते, पण त्यांना एकूण मुंबई क्रिकेट क्लबमधल्या राजकारणाची कल्पना नव्हती. मनोहर जोशींनी आणि त्यांच्या मुलाने तो फॉर्म भरला होता आणि तीन-चार दिवसांनीच निवडणूक होती.

जोशी पितापुत्राने आपला फॉर्म भरला आहे हे कळताच भुजबळांनी गडबडीत आपली सहल गुंडाळली आणि थेट मुंबईला येऊन थडकले. त्यांनी मुंबईला पोहचताच मनोहर जोशी यांची भेट घेण्यासाठी फोन लावला तर त्यांना कळलं की जोशी बाहेरगावी गेलेत.

छगन भुजबळ यांना आश्चर्य वाटलं.

आपल्याला एवढ्या गडबडीत कोडाई कॅनालमधून धावपळ करून यायला लावलं आणि यांचा इथे पत्ताच नाही.

भुजबळ ताबडतोब बाळासाहेबांकडे गेले. त्यांना या सर्व निवडणुकीच्या प्रकरणात आपल्याला कसे अडकवण्यात आलं आहे याची माहिती दिली.’हे जोशी वडील-मुलगे माझ्या नावे फॉर्म भरून कुठे तरी गायब झालेत’ हेही सांगितलं.

बाळासाहेब सुरुवातीला संतापले. पण त्यांचा स्वभाव आव्हानं पेलण्याचा होता. शरद पवार नुकतेच काँग्रेसमध्ये परत आले असावेत. बाळासाहेबांचे ते चांगले मित्रच होते मात्र तरी त्यांनी छगन भुजबळ यांना आता माघार घ्यायची नाही असं सांगितलं. 

या गरवारे क्लबच्या निवडणुकीची व्यूहरचना करण्यासाठी बाळासाहेब स्वतः सरसावले. त्यांनी त्यांच्या वर्तुळातील बजाज वगैरेसारख्या प्रभावी लोकांना स्वतःहून फोन लावला. ‘आमचे छगन भुजबळ गरवारेच्या निवडणुकीला उभे आहेत, त्यांना मत द्या’, असं ते त्यांना आवर्जून सांगत होते.

इकडे मनोहर जोशींचा पत्ताच नव्हता. भुजबळांनी देखील आपल्या परिचयातल्या काही लोकांना फोन केले. निवडणुकीची तयारी तशी काहीच नव्हती.

निवडणुकीचा दिवस उजाडला. छगन भुजबळ काही शिवसैनिक सैनिकांना घेऊन मतदानाच्या ठिकाणी जाऊन पोहचले. तिथे समोर शरद पवारसाहेब आणि त्यांच्या पॅनलचे लोक बॅच लावून उभे होते. थोड्या वेळाने पाहतात तर काय मनोहर जोशींचे भाचे सुधीर जोशी आणि त्यांचा ग्रुप आला आणि थेट पवारांचा प्रचार करायला उभा राहिला.

भुजबळ यांना सगळी गोम समजून आली. खरं तर या निवडणुकांमध्ये पक्षाचा संबंध नसतो. पण तरी मनोहर जोशींनी मारून मुटकून त्यांना पवारांविरोधात उभं केल्यामुळे आपोआपच या निवडणुकीला पक्षीय राजकारणाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. हाय प्रोफाइल निवडणुकीत भुजबळ संबंध नसताना अडकले.

शिवसेनेत आपलं वाढत प्रस्थ पाहून जोशींनी आपले पंख कापण्यासाठी यात अडकवलं असल्याच त्यांना वाटलं.

निकाल जो काही लागायचा तो लागला. भुजबळ प्रचंड मतांनी पराभूत झाले होते. त्यादिवशी संध्याकाळी ते मुंबईच्या महापौर बंगल्यावर गेले. भुजबळ त्यावेळी महापौर नव्हते, पण त्याकाळी सायंकाळी बाळासाहेब तिकडे पाय मोकळे करायला म्हणून यायचे. त्यांची भेट घेण्यासाठी भुजबळ महापौर बंगल्यावरच गेले.

बाळासाहेबांना माहीत होत की गरवारे क्रिकेट क्लबच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निकालाचाही अंदाज असावाच. त्यांनी भुजबळांना थेट विचारलं,

किती मतं पडली?

छगन भुजबळांनी तिथे काय घडलं ते सर्व सांगितलं. भुजबळ सांगतात,

त्यानंतर बाळासाहेब असे काही संतापले, की असं मी त्यांना कधीच पाहिलं नव्हतं. मनोहर जोशींना त्यांनी वाट्टेल त्या शिव्या घातल्या. अगदी कोहिनूरला आग लावतो, असंही म्हणाले.

भुजबळांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. झालं ते जाऊ द्या, वगैरे म्हणाले. फार बोलण्याची त्यांची त्याही काळी टाप नव्हती. पण मनोहर जोशींनी आपल्याला अडकवून चुकीचं राजकारण केल्यानंतरही आपला शिवसेनेचा खंदा नेता छगन भुजबळ निवडणुकीला उभा आहे आणि तो निवडून यायला हवा, या भावनेने स्वतः बाळासाहेबांनी सगळी सूत्रं हाती घेतली आणि त्यांच्या हृदयात एवढं प्रेमसुद्धा होतं. या सगळ्या भानगडीत माझा काय संबंध, असा विचारही त्यांनी केला नाही. याचा भुजबळांना अभिमान वाटला.

उलट मनावर घेऊन ऐनवेळी त्या निवडणुकीसाठी आटापिटा केला. त्यांना संताप आला, आपण पडल्याचं दुःख झालं याच त्यांना विशेष वाटलं. म्हणूनच ते म्हणतात कि पक्ष सोडला तरी त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम कधी कमी झालं नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.