शिवसैनिकांनी भुजबळांच्या घरावर हल्ला केला होता, भुजबळ थोडक्यात वाचले होते..
परवा शरद पवार यांच्या राहत्या घरी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. चप्पलफेक करण्यात आली. यावरून एसटी कर्मचाऱ्यांचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०५ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या..
पण याहूनही भयंकर हल्ला हा इतिहासात छगन भुजबळ यांच्या घरावर झाला होता. गोष्ट होती नव्वदच्या दशकातली. शिवसेनाचा वाघ तेव्हा त्याच्या अगदी भरात होता. भाजप-शिवसेना युतीने मुख्यमंत्री शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या कॉंग्रेसचा दारूण पराभव करत सत्ता ताब्यात घेतली होती त्याला एक वर्ष होत आले होते. एवढी वर्षे विरोधात बसून वाट पाहिलेल्या शिवसैनिकांनी जुने हिशोब चुकते करण्याचा सपाटा लावला होता.
सगळ्यात मुख्य टार्गेट वर होते छगन भुजबळ.
एके काळी शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळखले गेलेले छगन भुजबळ काही वर्षापूर्वीच सेनेचे 18 आमदार घेऊन कॉंग्रेस पक्षात आले होते. खुद्द शरद पवारांनी त्यांना कॉंग्रेसमध्ये आणल होतं असं म्हणतात. गद्दारांना कधीच माफी नाही म्हणणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना लखोबा लोखंडेची उपमा दिली होती. शिवसैनिक त्याकाळात छगन भुजबळाना धडा शिकवण्यासाठी जंग जंग पछाडल होतं पण भुजबळ काही सापडले नव्हते. त्यांना चोवीस तास पोलीस संरक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. पवारांनी त्यांना मंत्री देखील केलं.
पण आता पवारांची सत्ता गेली होती. खुद्द भुजबळ सुद्धा विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांच्याकडून पराभूत झाले होते. तरी शरद पवारांनी त्यांना विधानपरिषदेवर घेतलं. भुजबळ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता बनले.
विधानपरिषदेमध्ये पहिल्या दिवसापासून मनोहर जोशी यांच्या सरकारचे वाभाडे काढण्यास त्यांनी सुरवात केली. भुजबळांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी युती सरकारतर्फे कोणीच एवढा अनुभवी व सक्षम नेता नव्हता. त्यामुळे शिवसेनेच्या भुजबळाबद्दलच्या रागात वाढच झाली होती.
दरम्यान रमेश किणी खून प्रकरण घडले.
पुण्याच्या अलका टोकीज जवळ रमेश किणी या व्यक्तीचा मृतदेह सापडला. जमिनीच्या मालकीप्रकरणावरून हा खून झाला असण्याची शक्यता समोर आली, त्यातच हा खून राज ठाकरे यांच्या सांगण्यावरून करण्यात आलाय असा संशय व्यक्त करण्यात आला. राज ठाकरे तेव्हा शिवसेनेत विद्यार्थी संघटनेचे प्रमुख होते आणि शिवसैनिक त्यांच्यात भावी बाळासाहेबांची प्रतिमा पहात होते.
भुजबळांची तोफ विधानपरिषदेमध्ये कडाडली.
कसे शिवसैनिक खंडणीसाठी, जागा रिकाम्या करण्यासाठी उद्योजकांना धारेवर धरतात आणि या हप्त्यांचे लागेबांधे थेट मातोश्रीपर्यंत कसे पोहचतात याच्या कहाण्या त्यांनी उघड करण्यास सुरवात केली. सत्तेत आल्यानंतर थेट ठाकरे घराण्यावर होणारा हा पहिला हल्ला होता. शिवसैनिकांच्यात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. भुजबळांनी दुखरी नसं दाबली होती, त्याला उत्तर देणे गरजेचे होते. त्यात रमाबाई आंबेडकरनगर प्रकरण सुद्धा गाजत होत.
जुलै १९९७. रविवारचा दिवस होता.
छगन भुजबळांचा मुक्काम मंत्रालया समोरच्या अ-१० या शासकीय बंगल्यात होता. रविवार असल्यामुळे वर्दळ कमी होती. साधारण दहाच्या सुमारास बंगल्याच्या बाहेर गर्दी होण्यास सुरवात झाली. आधी तर कोणाला कळेना की नेमके काय झाले आहे. काही तरी गडबड आहे एवढचं जाणवत होतं. ती गर्दी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची होती.
पावसाळ्याचे दिवस होते. तुरळक पाउस सुरु होता. त्यातच बाहेरून घोषणाबाजीचा आवाज सुरु झाला.
काही तरी विपरीत घडतय हे लक्षात आल्यावर बंगल्याची दारे खिडक्या बंद करण्यात आली. पण तो पर्यंत दगडफेक सुरु झाली. खिडकीच्या काचा फुटल्या. पोलिसांना कळवण्यात आलं पण कोणीही आलं नव्हत.
थोड्याच वेळात शिवसैनिकांचा जोर वाढला. सर्व बाजूनी शिवसैनिक आत घुसले. पुढच दार तोडण्यात आलं. छगन भुजबळ घरातच होते. शिवाय त्यांचा मुलगा व पुतण्या देखील बंगल्यात हजर होते. तुटलेल्या दारातून हल्लेखोरांच लोंढार आत घुसले. वाटेत दिसेल त्याची नासधूस करण्यात येत होती. पण मुख्य शोध भुजबळांचा सुरु होता. त्यांना आज संपवायचं याच उद्देशाने हा हल्ला झाला होता.
अखेर बंगल्याच्या सगळ्यात शेवटच्या कोपऱ्यात असलेल्या बेडरूम मध्ये लपलेले भुजबळ सापडले. त्यांच्या सोबत पोलिसांनी त्यांना दिलेला बॉडीगार्ड होता. त्या खोलीत गोंधळ सुरु झाला. हल्लेखोर आता छगन भुजबळांना पकडणार एवढ्यात त्या पोलीस हवालदाराला प्रसंगावधान सुचले.
त्याने आपली सर्विस रिव्होलव्हर बाहेर काढली आणि जोरजोरात फायर फायर असं किंचाळायला सुरवात केली.
आधीच गोंधळ होता त्यात पोलिसाचा तो आवाज ऐकून त्यात आणखी वाढ झाली. पुढे उभे असलेले हल्लेखोर धावू लागले. मागच्यांना काही कळेना, तेही वाट फुटेल तिथून बाहेर धावत सुटले. काही वेळातच भुजबळांचा बंगला रिकामा झाला. त्या पोलिसाच्या समयसूचकतेमुळे भुजबळांचा जीव वाचला.
पुढे अनेक वर्षे हा खटला चालला. दरम्यानच्या काळात छगन भुजबळांच बाळासाहेबांशी मनोमिलन देखील झालं. त्यांनी खुल्या दिलान या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरची चौदा वर्षे चाललेली केस मागे घेतली.
हे ही वाच भिडू.
- छगन भुजबळ की दुबईचा व्यापारी इक्बाल शेख?
- ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले ते सात प्रसंग आणि त्यामागचं राजकारण काय होतं.
- बाळासाहेब ठाकरेंनी का घेतला होता शिवसेना सोडायचा निर्णय ?