छगन भुजबळ की दुबईचा व्यापारी इक्बाल शेख…?

साल होत १९८६.

बेळगावमध्ये तेव्हाच्या कर्नाटक सरकारने केलेल्या कन्नड सक्तीविरुद्ध आंदोलन पेटलं होतं. जनता दलचे रामकृष्ण हेगडे तेव्हा तिथले मुख्यमंत्री होते. सक्तीने बेळगावमधल्या मराठी भाषिकांवर कन्नड अस्मिता लादण्याचा प्रयत्न तिथल्या जनतेने झुगारून लावला होता.

पारतंत्र्यात अनुभवता आले नाही असा पोलिसी जाच बेळगावमध्ये पहावयास मिळाला. सीमावासीय बांधवांवर अत्याचार होत असताना महाराष्ट्र हातावर हात धरून बसणे शक्य नव्हते.

महाराष्ट्रातूनही बेळगावच्या कन्नड सक्तीविरुद्ध जेष्ठ नेते एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु झाले. कधी नव्हे ते सर्व पक्षीय नेते एकत्र रस्त्यावर उतरले.  महाराष्ट्रातल्या सर्व  नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशाची बंदी घालण्यात आली होती.

तेव्हाचे विरोधी पक्ष नेते शरद पवार आपल्या सोबत सुरेश कलमाडी यांना घेऊन अचानक बेळगावमध्ये अवतरले. यामुळे खवळलेल्या हेगडे सरकारने आंदोलन दाबण्याचे प्रयत्न वाढवले. अशातच बेळगावात शरद पवारांवर लाठीचार्ज झाला आहे अशी अफवा पसरल्यामुळे तिथे दंगली पसरल्या. यात पोलिसांनी केलेल्या लाठी चार्जमध्ये दोघे जण मृत्युमुखी पडले.

आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले होते. ‘मराठी मुलखातून मुंगीलासुद्धा प्रवेश दिला जाणार नाही’ असा पवित्र कानडी पोलिसांनी घेतला होता. महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व रस्त्यांवर  नाके बंदी करण्यात आली.

एवढं  सगळं घडत असताना मराठीचा कैवार घेतलेली शिवसेना मागे असणे शक्य नव्हते. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या सरसेनापतीला आदेश दिला की स्वतः बेळगावच्या मराठी भाषिकांच्या आंदोलनाला हजर हो.

ते सरसेनापती म्हणजे छगन भुजबळ.

तेव्हा छगन भुजबळ यांच्या पत्नीचे ऑपरेशन होते. घरात टेन्शनच वातावरण असूनही बाळासाहेबांच्या आदेशावरून छगन भुजबळ बेळगावच्या अवघड मोहिमेवर निघाले. इकडे त्यांच्या बायकोचे ऑपरेशन स्वतः बाळासाहेबांच्या निगराणीखाली पार पडले.

छगन भुजबळांनी सर्वात प्रथम मिशी काढली. वेषांतर करून खांद्यावर शबनमची पिशवी अडकवली आणि मुंबईहून विमानाने गोवा गाठला. पण तिथे त्यांना काही पत्रकारांनी ओळखले. आता आली पंचाईत. मग त्यांनी वेशात पूर्ण बदल केला.  झब्बा पायजमा सोडून शर्ट आणि पँट घातली. गळ्यात टाय बांधला. डोळ्यावर चष्मा तोंडात सिगार अशा वेशात खोटी दाढी लावून  ते बनले दुबईचे व्यापारी इक्बाल शेख.

कारमधून खानापूर मार्गे बेळगावचा प्रवास सुरु झाला. त्यांच्यासोबत एक कन्नड बोलणारा ड्रायवर होता. जागोजागी पोलीस अडवत होते. तेव्हा तो पोलिसांना सांगायचा की गाडीत दुबईचा शेठ आहे. पाईपचा बिझिनेस आहे. डिक्कीमध्ये सँम्पलच्या काही पाईप ठेवलेल्या असायच्या. पोलिसांना शंका आली नाही. तीन जूनला संध्याकाळी छगन भुजबळ बेळगावात पोहचले आणि एका मराठी व्यापाऱ्याच्या घरी त्यांनी दोन दिवस मुक्काम केला.

५ जूनच्या आंदोलनात कानडी पोलिसांना गुंगारा देत ते सत्याग्रहाच्या जागी ‘हुतात्मा चौकात’ अचानक अवतरीत झाले. तेव्हा आंदोलनात हजर असलेले बेळगावचे माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. अष्टेकरांनी सांगितलं,

“भुजबळ कुठून आले हे कोणालाच कळले नाही.  भुजबळांना पाहून तिथं जमलेल्या जनसमुदायामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. पोलीसांचं नाक कापलं गेलं होत. त्यांनी जमलेल्यांना  भयानक मारहाण केली. भुजबळ यांना देखील  मारहाण झाली. पुढे दोन महिने त्यांना धारवाड जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला आणि पुढे महाराष्ट्राचे मंत्री झाल्यानंतर त्यांच्यावरची केस मागे घेण्यात आली”

असा हा महाराष्ट्राच्या लढवय्या नेत्याचा . आजही बेळगावमध्ये त्यांची लोकप्रियता तितकीच आहे.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.