छत्रपतींच्या चाकणचे औरंगजेबाने इस्लामाबाद असे नामकरण केले होते

चाकण, पुण्यातल्या राजगुरुनगर ( खेड) तालुक्यातलं हे गाव. जे ‘उद्योगनगरी’ किंवा ‘उद्योगाची पंढरी’ म्हणून खूपच फेमस आहे.  त्यातल्या त्यात पुणे – नाशिक हायवे आणि मुंबई- अहमदनगर नॅशनल हायवेमुळं त्याला वाहतूकीच्या दृष्टीनं  जास्त महत्व प्राप्त झालंय. म्हणायला जरी गाव असलं तरी गेल्या १५-२० वर्षात उद्योगामुळं त्याचा चांगलाच विकास झालाय.

दरम्यान, ‘चाकण’ या नावाच्या मागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात.  त्यातल्याच एका दंतकथेनुसार, एका युद्धात दशरथ राजाला मिळालेल्या शापाप्रमाणं युद्धाच्या वेळी त्याच्या रथाचं चाक जमिनीत अडकलं होत. जे त्यानं जमिनीतून  काढण्याचा आतोनात प्रयत्न केला, पण त्याच्या पदरी अपयश  आलं, आणि ते चाक तिथंच अडकून पडलं. ते चाक ज्या ठिकाणी पडलं होत, त्या ठिकाणी आज चकेश्वर नावानं  शंकराचं मोठं मंदिर उभं आहे. जिथल्या तळाच्या ठिकाणी ते चाक पडल्याचं वाडवडील सांगतात. त्यामुळंच या गावाला आधी ‘चक्रीनगर’ म्हणून ओळखलं जायचं, पण कालांतराने याला ‘चाकण’ असं नाव पडलं.  तर ज्ञानेश्वरीत याचा उल्लेख ‘चाकण ८४ ‘ असा आहे. 

या सगळ्यात , चाकण अजून एका गोष्टींमुळं प्रसिद्ध आहे ते म्हणजे तिथला ‘संग्रामदुर्ग किल्ला’. ज्याला आधी भुईकोट किल्ला म्ह्णून ओळखलं जायचं. इतिहासकार ग्रँड डफ यांच्या म्हणण्यानुसार बुशदीद हबशी नावाच्या माणसाने हा किल्ला बांधला होता. आदिलशाहीच्या ताब्यात असताना फिरंगोजी नरसाळा हा या किल्ल्याच्या किल्लेदार होता. नंतर स्वराज्य स्थापन व विस्ताराच्या वेळी शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातून संग्राम दुर्ग जिंकून घेतला. पण, महाराजांनी किल्लेदार म्ह्णून फिरंगोजींनाच कायम ठेवलं.

चाकणची लढाई 

 १६५९ मध्ये औरंगजेब मुघल बादशहा बनला. त्यानंतर त्याने मराठ्यांच्या धोरणात अनेक फेरबदल  केले.  दक्षिणेस  शिवाजी महाराजांची वरचढ होऊ नये म्ह्णून त्याने  दक्षिणेच्या सुभ्यावर शाहिस्तेखानाची नेमणूक केली, जो औरंगजेबाचा मामा होता. आदेश मिळताच मोठ्या सैन्यासह त्याने पुण्याकडं कूच केली. खानाच्या सैनिकांनी पुणे आणि आसपासच्या परिसरात विध्वंस करायला सुरुवात केली. यातच त्याने चाकणसुद्धा उध्वस्त करायला घेतलं.  शाहिस्तेखानानं स्वतःचा पराक्रम दाखवण्यासाठी चाकणचा संग्राम दुर्ग किल्ला जिंकून दाखवायचं ठरवलं. यासाठी त्यानं सैनीकांची व्युव्हरचना केली. 

संग्रामदुर्ग किल्ला हा बलाढ्य  किल्यांपैकी एक होता.  ज्याच्या पूर्वेस तटावर आणि प्रवेशद्वारावर चार आणि मध्ये एक भक्कम बुरुज होते. किल्ल्याभोवती ३० फुट खोल व १५ फुट रुंद खंदक होता. प्रत्येक बुरुंजावर तोफा होत्या. मराठ्यांनी किल्ल्यामधून मुघल सैनिंकावर तोफांचा मारा करायला सुरुवात केली.   फिरंगोजींची नेतृत्वाखाली मराठ्यांच्या या प्रतीकारांमुळं शाहिस्तेखानाला किल्ला काय जिंकता येईना.

त्यामुळं वैतागलेल्या मुघल सैनिकांनी आपल्या छावणीपासून किल्ल्याच्या तटापर्यंत मोठं भुयार खोदलं.

या तटाला सुरुंग लावत त्यांनी मोठं भगदाड पाडलं, ज्यामुळे मुघल सैन्य आत घुसायला यशस्वी झालं. यामुळं अनेक मराठा मावळ जखमी झाली आणि शस्त्रास्त्रांचा साठाही वाया गेला.  शिवाजी महाराजांनी किल्ला जोपर्यंत लढवणं शक्य आहे, तोपर्यंत लढायला सांगितलं आणि नाईलाज झालाच तर मुघलांना द्यायचं सुचवलं. कारण महाराज त्यावेळी शिद्दी जौहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. त्यामुळे कोणतीच मदत करता येत नव्हती.

तरी मराठ्यांनी शूर ३०० – ३५० लोकांनीशी चाकण तब्बल ५६ दिवस झुंजवत ठेवला होता.

अखेर सगळेच मार्ग बंद झाल्याने मराठ्यांना संग्रामदुर्ग  शाहिस्तेखानाला सोपवायला लागला. संग्रामदुर्ग जिंकल्यावर शाहिस्तेखानाने  बांधकामे केली, इतरही डागडुजी केली. तिकडे औरंगजेबाला  चाकण शहर मुघलांनी जिंकल्याची बातमी समजली, अर्थातच त्याला आनंद झाला. ज्यामुळं ओरंगजेबाने चाकण शहराचे नाव बदलून इस्लामाबाद असं ठेवलं होत.

पण मुघलांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. इ.स. १६६९-७० मध्ये मराठ्यांनी  चाकणचा किल्ला  पुन्हा मुघलांकडून जिंकला.  त्यानंतर महाराजांनी मराठ्यांना चैथाई व सरदेश्मुखीच्या सनदा दिल्या. 

दरम्यान, सध्या चाकणचा हा संग्रामदुर्ग किल्ला जमीनदोस्त अवस्थेत पडलाय. औद्योगिक करणामुळं तिथं आज किल्ल्याच्या परिसरात मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात विकसित झालीये. किल्याच्या बराच भाग कोसळलेल्या अवस्थेत आहे.  अनेक सरकार येऊन गेली, अनेकदा पात्र पाठवून झाली, मागण्या  करून झाल्या, पण किल्ल्याच्या पुनर्वसनाचं काम तसेच रखडून पडलंय.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.