भारतातल्या गल्लीबोळात देखील चामिंडा वासच्या उडीची कॉपी केली जायची..

खरंतर क्रिकेट हा बॅट्समनचा गेम आहे असं जगजाहीर झालं होतं, बॉलींग डिपार्टमेंट हा फक्त चौकार षटकार खाण्यासाठीच बनला आहे अशी धारणा होती. पण सुरवातीला बॅटिंगचा हा गेम बॉलिंगमध्ये कसा ट्रान्सफर झाला तर ९०च्या दशकात जी बॉलिंग लाइनअप आली त्यामुळे बॅट्समन सुद्धा बॉलरला घाबरून खेळू लागले.

अशाच गोलंदाजीच्या ताफ्यातील जबरदस्त आणि तेजतर्रार बॉलर होता श्रीलंकेचा चामिंडा वास. चामिंडा वास हा असा खेळाडू होता त्याच्या धारदार बॉलिंगपुढे भले भले बॅट्समन टरकायचे. शोएब अख्तर, ब्रेट ली, ऍलन डोनाल्ड हि मंडळी फास्ट बॉलिंगवर विकेट काढण्यासाठी फेमस होते. पण यांच्याउलट चामिंडा वासची लाईन लेन्थ अचूक  असायची आणि तो विकेट मिळवायचा.

आपल्या भेदक बॉलिंगच्या जोरावर चामिंडा वासने अनेक रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केले जे अजूनही अबाधित आहेत. बॉलिंगमध्ये तर वास खतरनाक होताच पण तो बॅटिंगसुद्धा अप्रतिम करायचा. आपल्या बॅटिंगच्या बळावर त्याने श्रीलंकेला अनेक यादगार सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.

चामिंडा वासचं नाव हे आजवरचं सगळ्यात मोठं नाव आहे, त्याच खरं नाव वर्णाकुलासुर्या पटाबेंडिगे उशांता जोसेफ चामिंडा वास असं आहे.

मोठ्या भावाला क्रिकेट खेळताना बघून चामिंडा वासला आपणही क्रिकेट खेळावं असं वाटू लागलं आणि तिथून तो सतत खेळतच राहिला आणि श्रीलंकेच्या संघात सामील झाला. देवावर त्याचा भयंकर विश्वास होता मॅच सुरु होण्याच्या अगोदर आणि मॅच संपल्यानंतर तो देवाचे आभार मानायला विसरायचा नाही. १९९४ साली भारताविरुद्ध वासने पदार्पण केलं. पण त्यात त्याला काही विशेष कमल करता आली नाही. तिथं त्याला केवळ एक विकेट मिळाली.

श्रीलंका दौऱ्यावर गेल्यावर तिथेही त्याला विशेष काही करता आलं नाही. पाकिस्तानविरुद्ध एकही विकेट त्याला मिळवता अली नाही. त्याला सुरवातीला संधी बऱ्याच मिळत होत्या पण विकेट मिळत नव्हत्या. त्यावरून त्याने आत्मपरीक्षण केलं आणि आपल्या बॉलिंगवर तो जास्त मेहनत घेऊ लागला. त्याच्या मेहनतीचं फळ त्याला न्यूझीलँड विरुद्धच्या टेस्ट सामन्यांमध्ये दिसून आलं.

१९९५ सालच्या न्यूझीलँड विरुद्धच्या सामन्यामध्ये आपल्या बॉलिंगची धार दाखवत दोन्ही इनिंगमध्ये ५-५ विकेट घेतल्या. चामिंडा वासच्या या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडला श्रीलंकेकडून २४१ धावांच्या विशाल अंतराने प्रभाव स्वीकारावा लागला. एका सामन्यात न्यूझीलँड संघाच्या सहा विकेट घेऊन सगळी बॅटिंग लाईन अप उध्वस्त केली होती. या सामन्यात बॅटिंगमध्ये सुद्धा आपण कमी नाही आहोत हे दाखवून देत ५१ धावांची खेळी केली होती.

१९९६ च्या वर्ल्डकपमध्ये चामिंडा वासला संधी देण्यात आली. वर्ल्डकपमध्ये विशेष काही करता आलं नसलं तरी टिच्चून बॉलिंग करत त्याने विरुद्ध संघाच्या धावांचा रोख कमी केला. त्यावर्षीच्या जेतेपदावर ऑस्ट्रेलियाला पराभूत करून श्रीलंकेने आपलं नाव कोरलं. त्यावर्षी श्रीलंकेला वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावल्याने श्रीलंकन सरकारने देशातील तिसरे सर्वात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांचा सन्मान केला.

चामिंडा वास ओळखला जायचा आपल्या रनअप साठी. विशेषतः त्याची रणअप नंतरची जम्प इतकी फेमस झाली की भारतातल्या गल्लीबोळात देखील त्याला कॉपी केलं जायचं.

वास सुरवातीला १४०-१४५ च्या स्पीडने बॉलिंग करायचा. पण पाठीच्या दुखण्याने चामिंडा वासच्या क्रिकेट करियरवर मोठा परिणाम झाला. पाठीची सर्जरी करावा लागली तेव्हा क्रिकेट रसिक म्हणत होते कि आता चामिंडा वास काय परत क्रिकेट खेळू शकणार नाही. पण चामिंडा वास हा इतका निश्चयी होता कि त्याने सर्जरी झालेली असूनही क्रिकेट प्रॅक्टिस करायला सुरवात केली. 

बॅक प्रॉब्लेममुळे वासने त्याची बॉलिंग ऍक्शन सुद्धा चेंज केली त्यामुळे त्याचा स्पीड कमी झाला. प्रॅक्टिसमध्ये लाईन लेन्थ, वेग यावर बराच काळ त्याने मेहनत घेत पुन्हा कमबॅक केलं. २००१ साली त्याच्या बॉलिंगची शिकार झाली ती झिम्बाब्वे टीम. त्याच्या बॉलिंगच्या वादळात झिम्बाब्वे टीम अक्षरशः उडून गेली. चामिंडा वासने त्या सामन्यात ८ विकेट घेतल्या होत्या आणि ३८ धावांवर झिम्बाब्वे टीम ऑल आउट झाली होती. या सामन्यात वासने हॅट्रिक घेतली होती.

बांगलादेशविरुद्धच्या एका सामन्यात तर वासने पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या तीन चेंडूवर हॅट्रिक नोंदवत एक नवीन रेकॉर्ड तयार केला होता.

चामिंडा वासमुळे श्रीलंकन टीम विदेशात जाऊन मोठमोठ्या संघाना टक्कर देऊ लागली.

चामिंडा वासची विशेषता हि होती कि तो कितीही रन पडले तरी तो लाईन लेन्थ बदलायचा नाही आणि विकेट मिळवायचा. कॅप्टनसुद्धा चामिंडा वासवर फुल्ल विश्वास ठेवायचा. टेस्टमध्ये ३५५ आणि वनडेमध्ये ४०० विकेट त्याने मिळवल्या आहेत.

सचिन तेंडुलकर विरुद्ध चामिंडा वास हा एक एपिक बॅटल म्हणून ओळखला जायचा. पुढे चामिंडा वासने लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा अशी मजबूत बॉलिंग पलटण श्रीलंकेला दिली. श्रीलंकेच्या क्रिकेटचा कोहिनुर म्हणून चामिंडा वास ओळखला जातो.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.