चंपासिंग थापा ; शिंदेना फायदा नसणारी लोकं ठाकरेंना का सोडून चाललीयेत ?

जवळपास ४०-४२ वर्षांपूर्वी एक चंपासिंग थापा नावाचा पोरगा गोरेगावात लहान-मोठी कामे करून पोट भरायचा. त्याची भांडुपचे नगरसेवक के.टी थापा यांच्या सोबत ओळख होती. असंच एक दिवस तो नगरसेवकांसोबत मातोश्रीवर आला. बाळासाहेब ठाकरेंना तो पहिल्यांदा भेटला होता. के. टी. थापा यांनी त्या नेपाळी पोराच्या हाताला चव आहे असं म्हणत त्याच्या स्वयंपाकाचे कौतुक केले…ते कौतुक ऐकून बाळासाहेबांनी त्याला मातोश्रीवर स्वयंपाक करायला सांगितले. त्या २० वर्षाच्या पोराने पहिल्यांदाच बाळा साहेबांसाठी जेवण बनवले..बाळासाहेबांना जेवण एवढं आवडलं कि…बस्स्स तेंव्हापासून जिथं बाळासाहेब तिथं चंपासिंग असं समीकरण बनलं, बाळासाहेब जिथेही कुठं दौऱ्याला जात सोबत चंपासिंग असत…

मीनाताई ठाकरेंच्या अकाली निधनानंतर तर चंपासिंग बाळासाहेबांची सावली बनूनच राहत. बाळासाहेबांची औषधे, त्यांचं डेली रुटीन सगळं काही चंपासिंगच बघत असत. बाळासाहेबांनी त्याच्यावर एवढा विश्वास टाकला कि, मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीला लागूनच चंपा सिंग यांची छोटीशी खोली होती..बाळासाहेबांनी चंपासिंगला कुटुंबाचं सदस्य म्हणून पाहिलं..बाळासाहेब हयात असे पर्यंत चंपासिंगने कधीही सुट्टी घेतली नव्हती. बाळासाहेब गेल्या त्या दिवशी त्यांच्या पार्थिवाशेजारी उभे राहून गुलाबपुष्पांच्या गुच्छाने वारा घालत उभा असलेल्या चंपासिंगला कित्येकांनी पाहिलंय….

पण आज चंपासिंगची आठवण काढण्याचं निमित्त म्हणजे, चंपासिंग यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय…

हो ! बाळासाहेबांच्या जिवाला जीव देणारा, बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत बनलेला आणि ठाकरे कुटुंबासाठी इमानदार असलेले चंपासिंग शिंदे गटात गेलेत.

चंपासिंग थापा यांचा नेपाळमध्ये शिवसेना उभी करण्यात महत्वाची भूमिका होती अस सांगितलं जात असलं तरी या बातमीत तथ्य आढळत नाही. नाही म्हणायला नेपाळमध्ये शिवसेना आहे पण त्या पक्षाचा व महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा संबंध आढळत नाही. दूसरी गोष्ट सांगण्यात आली म्हणजे हे चंपासिंह थापा भांडूपमधून नगरसेवक होते. पण तसही नाही. चंपासिंह थापा कधीच राजकारणात नव्हते..तरिही ते शिंदे गटात गेले. 

आत्ता थापाचा नक्की एकनाथ शिंदे गटाला फायदा काय होणार तर फक्त आणि फक्त नैतिकता..

एकनाथ शिंदेचा पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि नैतिकतेवर जोर राहिलेला आहे. हेच नैतिक बळ मिळवून देण्याचं काम थापा सारखे लोक करत आहेत..

या यादीत अजून कोण-कोण आहे तेच पाहूया.

  • स्मिता ठाकरे  

कधीकाळी शिवसेनेत समांतर सत्ताकेंद्र म्हणून स्मिता ठाकरे प्रस्थापित होत गेल्या. स्मिता ठाकरे या बाळासाहेब ठाकरेंच्या सुन. उद्धव ठाकरेंचे थोरले बंधु जयदेव ठाकरे यांच्या त्या पत्नी. 1995 च्या युती शासनाच्या काळात स्मिता ठाकरेंच शिवसेनेतलं वर्चस्व वाढत गेलं. मात्र राज, उद्धव आणि स्मिता ठाकरे अशा सत्तासंघर्षाची अखेर उद्धव ठाकरेंच्या कार्याध्यक्षपदात झाली. राज ठाकरेंनी मनसे काढली आणि स्मिता ठाकरे राजकारणाच्या केंद्रबिंदूवरून गेल्या.

आज स्मिता ठाकरे सिनेमा निर्मात्या आहेत. पण त्याचं स्वत:च अस राजकीय बळ नाही. स्वत:चा असा गट नाही की स्वत:च्या हिम्मतीवर त्या राजकारण करू शकतील अशी आजही परिस्थिती नाही.

पण त्या चर्चेत आल्या त्या एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने. बंडानंतर दिनांक 26 जुलै रोजी स्मिता ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शिंदे मुख्यमंत्री झाल्याबद्दल स्मिता ठाकरेंनी त्यांच अभिनंदन केलं होतं. पण ठाकरे गटाला पाठींबा देणार का याबद्दल त्यांनी कोणतच उत्तर दिलं नव्हतं..

  • निहार ठाकरे

निहार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे तिसरे चिरंजीव बिंदुमाधव यांचे पुत्र. बिंदुमाधव याच सुरवातीच्या काळात शिवसेनेत प्राबल्य होतं. उद्धव नाहीत की राज नाहीत. शिवसेनेत सक्रिय होतील ते बिंदुमाधवच असा त्यावेळेच्या राजकारण्यांचा अंदाज होता. पण बिंदुमाधव यांच्या अपघाती मृत्यूमुळे ही शक्यता मावळली. बिंदुमाधव यांचे पुत्र निहार तेव्हा लहान होते. ते राजकारणात कधीच आले नाहीत.

पण इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांच्यासोबत त्यांच लग्न झाल्यानंतर ते चर्चेत आले होते. निहार ठाकरे पेशाने वकिल असून ते लॉ फर्म चालवतात. निहार ठाकरेंनी देखील एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. या भेटीनंतर आपला एकनाथ शिंदेंना पाठिंबा असून आपली लॉ फर्म त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असेल अस विधान त्यांनी केलेलं. निहार ठाकरेंच देखील स्वत:च अस राजकिय मुल्य नाही. राजकारणात स्वत:ची अशी ताकद नाही.

  • मिलिंद नार्वेकर 

विठ्ठल आणि त्यांचे बडवे असे आरोप जेव्हा जेव्हा झाले तेव्हा तेव्हा मिलिंद नार्वेकरांवर बडवे असल्याचे आरोप झाले. मिलिंद नार्वेकर म्हणजे उद्धव ठाकरेंची सावली. वयाच्या 21 व्या वर्षी शाखाप्रमुख होण्याचं स्वप्न घेवून आलेले नार्वेकर हे पुढे मातोश्रीचे समांतर सत्ताकेंद्र झाले. उद्धव ठाकरेंपर्यन्त पोहचायचं असेल तर नार्वेकर हेच पहिला व शेवटचा पर्याय होते. पण नार्वेकरांकडे असणारी ही पॉवर येत होती ती उद्धव ठाकरेंमुळे.

गणेशउत्सवाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकरांच्या घरी दाखल झाले होते. शिवाय जेव्हा विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करण्याचे भाषण चालू होते तेव्हा धनंजय मुंडे म्हणाले होते, मी फडणवीस यांना भेटायला मध्यरात्री गेलो पण तिथेच मागच्या दाराने नार्वेकर आले होते याची चर्चा झाली नाही.

नार्वेकरांनी शिदेंना उघड उघड पाठींबा दिला नसला तरी ते उद्धव ठाकरेंपासून दूर जात असल्याचीच चिन्ह आहे. नुकत्याचं झालेल्या गट प्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंसोबत असणारे मिलिंद नार्वेकर हे दूर मागे बसलेले दिसले तर जिथे नेहमी मिलिंद नार्वेकर दिसायचे तिथे बाळासाहेबांचे पुर्वीचे स्वीय सहाय्यक रवी म्हात्रे दिसले. मिलिंद नार्वेकरांची जागा आत्ता रवी म्हात्रेंनी घेतल्याचं बोललं जात आहे. कदाचित पुढच्या काळात मिलिंद नार्वेकर देखील शिंदे गटाकडे जातील अस जाणकार सांगतात. त्यांच्याकडे पॉलिटीकल पॉवर आहे पण ती पॉवर उद्धव ठाकरेंमुळेच यायची. स्वत: राजकारण, स्वत:चा गट अस काही मिलिंद नार्वेकरांकडे नाही

  • वरुण सरदेसाई

नवनीत राणा प्रकरणात रस्त्यांवर जोरजोरात घोषणा देणारे वरुण सरदेसाई देखील या सत्तानाट्यानंतर शांत आहेत. त्यांची भूमिका स्पष्ट नसली तरी दिनांक ६ जुलै रोजी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरच्या विमानतळावर भेट घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

आदित्य ठाकरे मंत्री झाल्यानंतर वरुण सरदेसाईच युवासेनेचा कारभार पाहत होते. उद्धव यांच्यासाठी जसे मिलींद नार्वेकर तसेच आदित्य ठाकरेंसाठी वरुण सरदेसाई. वरुण सरदेसाई हे महाविकास आघाडीच्या काळात मंत्रीमंडळाच्या बैठकीत देखील सहभागी झाल्याचा आरोप होता. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ असल्याने त्यांच युवासेनेतलं वजन देखील वाढत होतं. आत्ता मात्र ते कुठेच नाहीत. ते देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करतील की काय अशी शंका घेतली जात आहे. त्यांच देखील स्वत:च अस तितकं राजकीय मुल्य नाही.

ही होती प्रमुख पाच नावं. ज्यांच्या इतके- तिकडे जाण्याने उद्धव ठाकरेच काय तर एकनाथ शिंदेंना देखील मोठ्ठा राजकीय फायदा होवू शकत नाही पण प्रश्न फक्त नैतिक व भावनिक राजकारणाचा आहे. अशा वेळी उद्धव ठाकरेंना मिळणारी सहनभुती उद्धव ठाकरेंचे हेच जवळचे लोक कमी करू शकतील असा अंदाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना असावा…

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.