आणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली..

काल मुंबईमध्ये वस्ताद लहुजी साळवे यांच्या २२८ व्या जयंती कार्यक्रमात बोलतांना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला सुद्धा विराजमान होऊ शकते असं म्हटलंय. उद्धव ठाकरे यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल का अशी चर्चा सुरु आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, 

“राज्याचे रक्षण करण्यासाठी आपण शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहू शक्ती एकत्र आल्यास देशात एक मोठी ताकद उभी राहू शकते. गद्दार मूठभरही राहिलेले नाहीत आणि निष्ठावान डोंगराएवढे आहेत. आपल्याला राज्यात पुन्हा सत्ता आणायची आहे. आपला व्यक्तीच मुख्यमंत्री पदावर असेल, मग ती  महिला असो किंवा पुरुष.”

उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर शिवसेनेतेही अनेक महिला नेत्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून चर्चा केली जात आहे, यात रश्मी ठाकरे यांच्या नावाची जास्त चर्चा सुरु आहे.

पण एकदा अशी संधी महाराष्ट्राला १९७७ च्या दरम्यान चालून आली होती, मा.प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने ..

प्रतिभा पाटील यांच्या रुपानं भारताला पहिल्यांदाच महिला राष्ट्रपती लाभल्या होत्या. प्रतिभा पाटील या राष्ट्रपती म्हणून २०१२ पर्यंत देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत राहिल्या. त्यांच्या कारकीर्दीतल्या बऱ्याच कामांचा आणि निर्णयाचा आजही अनेकजण कौतुकानं उल्लेख करतात.

वयाच्या अवघ्या २७व्या वर्षो त्यांनी कॉंग्रेसमधून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकून सुद्धा आल्यात. १९६२ च्या काळात हि मोठी गोष्ट होती एक महिला इतक्या कमी वयात आमदार म्हणून निवडून आली आहे.

यानंतर मात्र त्या थांबल्या नाहीत ना त्यांची राजकीय कारकीर्द थांबली नाही. १९६५ ते १९८५ एवढ्या कालावधीत त्या सलगपणे महाराष्ट्राच्या विधानसभेत विजयी होऊन जात होत्या.

कदाचित त्या यापूर्वीच महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री होण्याचा देखील मान मिळवला असता परंतु होणारया अनेक राजकीय उलथा-पालथीमुळे त्यांना हि संधी मिळालीच नाही.

हि घटना आहे तेंव्हाची जेंव्हा शरद पवारांनी कॉंग्रेस पक्ष सोडला. १९७७ च्या निवडणुकीत कॉंग्रेस पार्टी विभागली गेली. कॉंग्रेस आय आणि कॉंग्रेस यु, पवार कॉंग्रेस यु मध्ये सामील झाले होते. पण पुन्हा कॉंग्रेस यु ची साथ सोडून पवार जनता पार्टीच्या समर्थनावर राज्याचे मुख्यमंत्री बनले.

इंदिरा कॉंग्रेस ने शरद पवारांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये आणण्यासाठी लाख प्रयत्न केले, त्यांच्यासाठी सत्तेचा सोनेरी सापळा लावला असेही म्हणले जाते परंतु पवारांनी इंदिरा कॉंग्रेससमोर शरणागती पत्करली नाही.

महाराष्ट्रातील इंदिरा कॉंग्रेसच्या नेत्यांनी पवारांचे राज्यातले सरकार पडण्याचे बरेच प्रयत्न केले,  या नेत्यांमध्ये कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षा प्रेमलाबाई चव्हाण, प्रा.राम मेघे, वसंतदादा पाटील, प्रतिभाताई पाटील हे दिग्गज नेते होते.

मात्र या नेत्यांमध्ये कसलाही प्रकारचा ताळमेळ बसत नव्हता. पत्रकार परिषदा घेण्याचा धडाका लावूनही आता सरकार कोसळत नसते, याची जाणीव आता जेंव्हा या नेत्यांना झाली तेंव्हा ते पुढच्या प्रक्रियेला लागले.

त्यानंतर पक्षांतराच्या मार्गाने सरकार बनवायचे कि, विधानसभा बरखास्तीची मागणी करायची? हा घोळ बरेच दिवस चालू होता.

शेवटी बरखास्तीच्या मागणीला सर्वांनी हातभार लावला आणि त्याबद्दलची एकूण तीन निवेदने पंतप्रधानांना दिली गेली.

त्यातले पहिले निवेदन विजय नवल पाटील यांनी तयार केले, परंतु त्यातला मसुदा नीट लिहिला नसल्यामुळे, दुसरे निवेदन ए.टी पाटील यांनी दिले. त्यात असे म्हंटले गेले कि, महाराष्ट्रात पक्षांतर झाल्याने अस्थिरता निर्माण झाली आहे आणि तसेच पक्षबदलुना घेऊन सरकार स्थापन केले गेले आहे जे स्थिर राहणार नाही. तर तिसरे निवेदन प्रा. राम मेघे आणि प्रतिभा पाटील यांनी दिले. त्यांनी दिलेले निवेदन मात्र सविस्तर आणि मुद्देसूद होते.

आता शरद पवार काही कॉंग्रेसमध्ये परतणार नाहीत हे स्पष्ट झाले होते आणि कॉंग्रेस नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला कारण आता मुख्यमंत्री होण्याची घाई सर्वांनाच झाली होती.

कारण घाई झालेल्या या मंडळीना विधानसभा बरखास्त करून दुसऱ्या निवडणुका घ्यायच्या होत्या. विधानसभा बरखास्त करून जर निवडणुका झाल्यात तर मुख्यमंत्री कोण बनणार यासाठी स्पर्धा चालल्या होत्या.

या स्पर्धेच्या दरम्यान एका खासदाराने तर असेही उद्गार काढले होते कि, “आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी रांगच रांग लागली आहे”. 

या मुख्यमंत्र्याच्या स्पर्धेच्या यादीत सुरुवातीला वसंतदादा पाटील जे सर्वात ज्येष्ठ होते. त्यानंतर प्रतिभाताई पाटील, बाबुराव काळे, रामराव आदिक, श्रीमती प्रेमालाबाई चव्हाण व ए.आर.अंतुले यांची नावे होती.

आता वसंतदादा पाटील,श्रीमती प्रतिभा ती पाटील आणि बाबुराव काळे यांची खरं तर जास्त चर्चा होती. यात वसंतदादांची अवस्था त्रिशंकूसारखी झाले होती. त्यांना आमदारकीचा राजीनामा देण्याची इच्छा नव्हती. परंतु त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून घेणार हे पक्कं असल्याची चर्चा चालू होती.

मंत्रिमंडळाचे नावे जाहीर झाली त्याच्या आदल्या दिवशी त्यांचे नाव नक्की झाले. मुंबईतल्या माहीम येथल्या त्यांच्या घरासमोर फटाके उडवण्यात येत आहेत अशी बातमी दिल्लीत येऊन धडकली होती. परंतु इथे मात्र बातमीचा काहीच थांगपत्ता नव्हता.

दादांकडे सगळेच जन तुम्ही कृषिमंत्री होणार का अशी विचारणा करीत होते. परंतु पंतप्रधान इंदिरा गांधी या जोपर्यंत निरोप पाठवणार नाहीत तोपर्यंत हि बातमी पक्की कशी समजायची असा पेच दादांसमोर होता.  राजीनामा देऊन आलेल्या वसंतदादांचा समावेश मंत्रिमंडळाच्या पहिल्या फेरीत झाला नव्हता.

महाराष्ट्रात पक्ष बदल घडवून आणून सरकार बनवायचे कि नाही हेही त्यांचे ठरत नव्हते. पक्ष बदल करून सरकार बनवले तर पक्षबदलाचे श्रेय वसंतदादांना जाणार आणि तेच मुख्यमंत्री बनणार हे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेत्या प्रतिभाताई ओळखून होत्या त्यामुळे पक्षबदलात त्यांनी रस घेतला नाही.

त्या पक्षांतर घडवून आणून सरकार स्थापन करण्याच्या भानगडीत त्या पडल्याच नाहीत, जर त्यांनी तशी भूमिका घेतली असती तर कदाचित त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवर दावा करता आला असता.

नागपूर मध्ये त्यांच्याच बंगल्यावर वसंतदादा व प्रेमालाबाई चव्हाण यांची इंदिरा कॉंग्रेस प्रवेश करणाऱ्या इच्छुकांशी बोलणी चालत पण त्यातही प्रतिभाताई यांनी कधीच सहभाग घेतला नाही.

विधानसभा विसर्जित करून निवडणुका घ्याव्यात, हि मागणी त्यांनी प्रथम केली आणि त्याचं भूमिकेला त्या शेवटपर्यंत चिटकून राहिल्या होत्या. कदाचित याचमुळे त्यांची मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली असावी हे नाकारता येत नाही.

 हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.