अख्ख्या भारतात अनेकांना पुस्तक वाचायची सवय लावणारा ‘चांदोबा’ आता फक्त आठवणीत उरलाय.
तो जमाना कॉमिक्सचा होता. टीव्हीचे वगैरे लाड जास्त चालायचे नाहीत. सिनेमा वगैरे तर खूप लांबची गोष्ट. मग सुट्टीत प्रचंड खेळून दमल्यावर पडून वाचायची सवय लागली.
तेव्हा हाती लागलेलं पहिलं पुस्तक म्हणजे चांदोबा.
दर महिन्याला पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे चांदोबा उगवायचा. गावातल्या स्टँडवरच्या वर्तमानपत्राच्या स्टॉलवर हे मासिक हमखास मिळायचं. ज्यांच्या कडे नसायचा त्यांनी दुसरे पुस्तक देऊन बार्टर सिस्टीमने देवाणघेवाण व्हायची.
फॉरेनमध्ये आमच्या वयाची मुलं स्पायडरमॅन, सुपरमॅनचे कॉमिक्स वाचत असतील तेव्हा आम्ही चंपक, चांदोबा,किशोर, ठकठक वाचत होतो.
पण या सगळ्यात चांदोबाला वेगळंच महत्व होतं.
चांदोबा हे फक्त टाईमपास सटरफटर गोष्टी सांगणारं मासिक नव्हतं तर त्यात रामायण, महाभारत अशी भारतातील पौराणिक कथा, इसपनीतीच्या गोष्टी, पंचतंत्र याशिवाय महान ग्रीक, रोमन पौराणिक कथा यांचेही भाषांतर असायचे.
बऱ्याच गोष्टी दिर्घ असायच्या. शेवटी क्रमशः अस लिहून पुढच्या महिन्याची वाट पाहायला लावलं जायचं. चांदोबा मधल्या प्रत्येक गोष्टी मनोरंजक तर असायच्याच पण काही तरी बोधपूर्ण संदेश देता येईल असा त्यांचा प्रयत्न असायचा. शेवटी एखादी स्पर्धा असायची. त्याची उत्तरं हिरीरीने पाठवली जात होती.
सगळ्यात महत्त्वाची चित्रे असायची.
थोडेसे दाक्षिणात्य दिसणारे रंगाचा भरपूर वापर करून काढलेली चांदोबा मधली सुबक चित्रे आजही डोळ्यासमोर उभी राहतात.
विशेषतः आठवतो तो वेताळच्या गोष्टी मधला विक्रम आणि वेताळ. त्यातली एक टिपिकल ओळसुद्धा आठवते,
“विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडाजवळ गेला आणि लटकणारे प्रेत खांद्यावर घेऊन स्मशानाच्या दिशेने चालू लागला. तेव्हा प्रेतातील वेताळ त्याला म्हणाला….”
या मासिकाचा जन्म अगदी स्वातंत्र्याच्या सोबतच झाला अस म्हटलं पाहिजे.
कारण जुलै इ.स. १९४७ मध्ये चांदोबाची पहिली आवृत्ती बाजारात आली. पहिल्यांदाच भारतात बालसाहित्यावर मासिक छापलं होतं.
याची सुरवात अंबुलीमामा या नावाने तेलगू मध्ये झाली. नागीरेड्डी आणि चक्रपाणि या दोन मित्रांची ही कन्सेप्ट होती. तिथल्या मुलांना हे मासिक आणि त्यात बनवलेली चित्रे खूप आवडली. अगदी काही दिवसातच तामिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी या भाषामध्ये चंदामामा मिळू लागला.
मराठी चांदोबाची सुरवात १९५१ साली झाली.
सुमारे ६ आणे इतक्या किमतीच्या चांदोबाच्या सुमारे ६००० प्रती सुरुवातीला विकल्या जात होत्या. हळूहळू १२ भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ लागलेला चांदोबा संपूर्ण भारतात लोकप्रिय होत होता. इ.स. १९८० मध्ये चांदोबाच्या सर्व भाषा मिळून सुमारे ९ लाख प्रती विकल्या गेल्या.
रामायण महाभारत या टीव्ही सिरीयल प्रमाणेच भारतीय संस्कृतीची खरी ओळख चांदोबा मासिकाने करून दिली होती.
नागीरेड्डी आणि चक्रपाणि यांचे निधन झाल्यानंतर विश्वनाथ रेड्डी यांनी चांदोबाचे काम पाहण्यास सुरुवात केली. विश्वम या नावाने ते अजूनही चांदोबाचे संपादकीय काम पाहतात.
साधारण नव्वदच्या दशकात केबल टीव्ही आला. डिस्नेचे कार्टुन सकाळ संध्याकाळ झळकू लागले आणि चांदोबा मागे पडू लागला.
दोन हजार नंतर तर त्याच्या बद्दल आपण विसरूनही गेलो. आता तर आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्याना वाचनाची सवयच उरली नाही. चांदोबा अजूनही छापला जातो का हे आपल्याला ठाऊक नाही.
कधी डिस्ने तर कधी आणखी कोण चांदोबा सुरू करणार अशा बातम्या आल्या होत्या.
मध्यंतरी काही दिवसांपूर्वी चांदोबा इंटरनेटवर पीडीएफ स्वरूपात मिळणार अस वाचलं होतं पण ती साईट आता सापडत नाही. पूर्वी आपल्याकडे जुने चांदोबा साठवून ठेवायची सवय होती, आता अशाच रद्दीच्या गठ्ठ्याच्या भावविश्वातून आठवणींचा चांदोबा शोधावा लागेल.
हे ही वाच भिडू.
- अस्सल भारतीय मातीतलं कार्टुन यशस्वी होत नाही हा गैरसमज छोटा भीमने मोडला
- किसमी चॉकलेट म्हणजे आपल्या हातात आलेलं पहिलं सॉफ्ट पॉर्न होतं.
- असा मोगली होणे नाही..