यूपी काँग्रेसमध्ये असेही मुख्यमंत्री होऊन गेले ज्यांना नेहरूंच्या आधी नमन केलं जायचं

युपीमध्ये सध्या विधानसभा निवडणुका चालू आहेत. सगळं वातावरण कसं निवडणूकमय झालंय. काँग्रेस, बीजेपी, सप यांची लढत सुरूच आहे. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर चांगलीच खडाजंगी चालू आहे. तसं तर युपीच्या मुख्यमंत्र्यांचे अनेक किस्से आजवर ऐकण्यात आले आहेत. आता उत्तर प्रदेश हे राज्यच राजकीय घडामोडींसाठी ओळखलं जातं.

देशाला अनेक ख्यातनाम मुख्यमंत्री देणाऱ्या या राज्यात मात्र असाही एक मुख्यमंत्री होऊन गेला आहे, ज्याची लोकप्रियता इतकी होती की जवाहरलाल नेहरू आणि ते सोबत असले तर युपीचे आमदार आधी त्यांना नमन करायचे आणि मग नेहरूंना.

या मुख्यमंत्र्यांचं नाव म्हणजे ‘चंद्रभानू गुप्ता’

चंद्रभानू गुप्ता यांचा जन्म १४ जुलै १९०२ चा, अलीगढच्या बिजौली इथला. त्यांचे वडील हिरालाल हे सामाजिक व्यक्ती होते. त्यांचा प्रभाव चंद्रभानू यांच्यावर पडलेला असल्याने त्यांचंही मन समाजात रमायचं. तो काळ आर्य समाजाचा होता. चंद्रभानूही त्यांच्याशी जोडले गेले आणि त्यांची निष्ठा इतकी होती की आयुष्यभर ते ब्रम्हचारी राहिले.

चंद्रभानू यांचं सुरुवातीचे शिक्षण लखीमपूर खेरी इथे झाले. हो, हे तेच लखीमपूर खेरी आहे जिथे शेतकरी आंदोलनकर्त्यांना राजकीय नेत्याच्या मुलाने गाडीखाली चिरडल्याने गेल्यावर्षी वातावरण लय तापलं होतं. इथे सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चंद्रभानू कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी लखनौला आले आणि पुढे लखनौलाच वकील म्हणून कार्यरत झाले.

हा तो काळ होता जेव्हा लॉ करणाऱ्या व्यक्तींना खूप मान असायचा आणि शिवाय प्रॅक्टिस करण्यासाठी स्कोप देखील असायचा. प्रसिद्धी मिळायची ती गोष्ट वेगळीच राहिली कारण या काळात जास्त कुणी लॉ शिकत नसायचे.

शिक्षणासोबत चंद्रभानू स्वातंत्र्य चळवळीतही सक्रिय होते, ते ही वयाच्या १७ व्या वर्षापासून. यामागचं कारण म्हणजे तेव्हा तरुणपनाचं ते लक्षण मानलं जायचं. त्यानुसार सीतापूर इथल्या रौलेट कायद्याच्या विरोधात ते आंदोलनात सहभागी झाले होते. सायमन कमिशनच्या विरोधात ते उभे राहिले. संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीत ते जवळपास १० वेळा तुरुंगात गेले. 

यादरम्यान एक प्रसंग असा आला जेव्हा त्यांच्या अभ्यासाचा त्यांना फायदा झाला. काकोरी घटनेत जेव्हा वकिलांची गरज भासली होती तेव्हा क्रांतिकारकांच्या बचावात त्यांनी खटला लढला होता.

मात्र चंद्रभानू गुप्ता यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली ती १९२६ मध्ये. त्यांना उत्तर प्रदेश काँग्रेस आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य करण्यात आलं तेव्हा. अभ्यासात हुशार असलेल्या चंद्रभानूंचं नाणं राजकारणातही चांगलंच वाजू लागलं. अल्पावधीतच काँग्रेसमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि यूपी काँग्रेसचे अध्यक्ष असा पल्ला गाठत १९३७ च्या निवडणुकीत ते उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४६ मध्ये स्थापन झालेल्या पहिल्या राज्य सरकारमध्ये, ते गोविंद बल्लभ पंत यांच्या मंत्रिमंडळात संसदीय सचिव म्हणून सामील झाले. १९४८ ते १९५९ या काळात त्यांनी अनेक खात्यांचे मंत्री म्हणून काम केलं.

आणि शेवटी ते वर्ष उजाडलं जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. सन १९६०.

जेव्हा ते राणीखेत दक्षिणचे आमदार होते आणि संपूर्णानंद मुख्यमंत्री होते तेव्हा राजकारण खूप गुंतागुंतीचं झालं होतं. काँग्रेसमध्ये गटबाजी निर्माण झाली होती. त्यामुळे यावर उपाय काढत संपूर्णानंद यांना राजस्थानचे राज्यपाल करण्यात आलं आणि चंद्रभानू यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री करण्यात आलं. मुख्यमंत्री बनताच त्यांच्या विरोधकांना खूप मोठा धक्का बसला. मात्र हे त्यांचं विरोधकांना उत्तर होतं जे त्यांनी त्यांच्या कामातून दिलं होतं.

याकाळात यूपीच्या राजकारणात गुप्ता यांचा मान खूप वाढला होता. पण एक गोष्ट जी जगविख्यात होती ती म्हणजे चंद्रभानू ज्या पक्षाकडून राजकारणात सक्रिय होते त्यांचे अध्यक्ष त्यांना आवडायचे नाही, ते म्हणजेच जवाहरलाल नेहरू. चंद्रभानू यांना नेहरूंचा समाजवाद आवडत नव्हता. तर नेहरूंना देखील गुप्ता आवडत नव्हते. पण चंद्रभानूंचा यूपी काँग्रेसमध्ये इतका दबदबा होता की आमदार आधी चंद्रभानूंसमोर नतमस्तक व्हायचे, मग नेहरूंसमोर नतमस्तक व्हायचे. नेमकं हेच नेहरूंना आवडायचं नाही.

नेहरूंना चंद्रभानू आवडायचे नाही म्हणून त्यांनी गुप्ता यांना पदावरून काढण्यासाठी नेहरूंनी एकदा गेम खेळाला असंही बोलल्या जातं. 

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा केंद्रातील नेहरूंच्या सत्तेला काँग्रेसमधील लोक चॅलेंज देत होते. तेव्हा १९६३ ला के. कामराज यांनी नेहरूंना सल्ला दिला की काही वगळता सर्व काँग्रेस मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगा, जेणेकरून राज्य सरकारांची पुनर्रचना करता येईल. काही दिवसांसाठी पद सोडण्यास सांगितलं होतं, कारण दिलं गेलं ते पक्षासाठी काम करण्याचं. पण चंद्रभानूंच्या नजरेत हा सगळा खेळ म्हणजे ज्याला नेहरू आवडत नाहीत, त्यांनी पक्षातून जावं असा होता.

चांद्रभानू यांनी पद सोडण्यास नकार दिला. तेव्हा त्यांना समजावण्यात आलं की काहीच दिवसांचा प्रश्न आहे, तुम्हाला परत मुख्यमंत्री करण्यात येईल. सर्व होऊनही जेव्हा गुप्ता तयार झाले नाही तेव्हा त्यांना आदर्शांची जाण करून देत पद सोडण्यास भाग पाडलं. मात्र नंतर व्हायचं तेच झालं. गुप्ता यांना परत पद मिळालं नाही. लोकशाहीवर हुकूमशाहीचा मोठा वार म्हणून या घटनेकडे बघितलं गेलं होतं.

चंद्रभानू त्यांच्या कार्यकाळात तीन वेळा मुख्यमंत्री बनले. पहिल्यांदा १९६० ते १९६३ पर्यंत. दुसऱ्यांदा १९६७ मध्ये. आणि तिसऱ्यांदा १९६९ मध्ये. त्यांचा तिन्ही वेळेचा कार्यकाळ कमी राहिला कारण नशिबाने साथ दिली नाही. राजकारण दांडगं असलं तरी काही ना काही कारण निघाल्याने आणि त्यांना पद सोडावं लागलं.

चंद्रभानू गुप्ता यांच्याबद्दल अजून एक किस्सा असा की, ते स्वतःला नेहमी चोर म्हणायचे. त्यांच्यावर नेहमी आरोप लावले जायचे की ते खूप पैसे कमावता. अशांना इंटरटेन न करता तेही ‘गली गली में शोर है, चंद्रभानू गुप्ता चोर है’ असं म्हणायचे. पण जेव्हा १९८० मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अकाउंटमध्ये फक्त १० हजार रुपये होते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.