त्याच्या आदेशावर गणपती दूध प्यायले आणि राजीव गांधीची हत्या झाली..?
साल १९७५ चं. प्रसंग पहिला.
ब्रिटनच्या लंडनमधले ते दिवस होते. कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या अध्यक्ष म्हणून मार्गोरेट थॅचर यांनी नुकताच कारभार स्वीकारला होता. तर भारताचे उप उच्चायुक्त म्हणून नटवर सिंग ब्रिटनमध्ये नियुक्त होते. नटवरसिंग याचं वय देखील त्यावेळी जेमतेम तिशीच्या दरम्यान होतं.
याच काळात यशपाल कपूर यांच्या संदर्भ देवून त्यांना एक व्यक्ती भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये आली. साधूसंताचे असतात तसे कपडे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, कपाळावर भस्म अशाच अवतारात ती व्यक्ती नटवरसिंग यांना भेटली होती. या भेटीत त्यांनी नटवरसिंग यांना कोणती मागणी केली तर त्यांना मार्गारेट थेचर यांना भेटायचं होतं.
नटवरसिंग संकटात सापडले होते. अशा साधूसंताला भलं मार्गोरेट थॅचर यांच्याकडे काय काम असणार. धड त्याला इंग्रजी देखील बोलता येत नव्हतं. तरी देखील यशपाल कपूर यांच्या संदर्भातून आल्यामुळे नटवरसिंग यांनी त्यांची भेट घडवून आणण्याचं ठरवलं. मार्गारेट थॅचर यांची वेळ घेण्यात आली. नटवरसिंग यांनी त्या साधूला सांगितल मी स्वत: येईल आपण भेट घेवू.
प्रसंग दूसरा.
समोर कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या प्रमुख मार्गोरेट थॅचर बसल्या आहेत. त्यांच्या समोर नटवरसिंग आणि मांत्रिक. त्या मांत्रिकाला इंग्रजी येत नव्हतं. त्याने समोरच्या टेबलवरचा एक कागद घेतला त्याला उभ्या आडव्या रेषा मारून कोणतेही पाच प्रश्न मनात धरण्यास मार्गारेट थॅचर यांनी सांगण्यात आलं. मार्गोरेट थॅचर या ब्रिटीनच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जातात. इतक्या महत्वाच्या माणसाला हा साधू काहीही करायला सांगत आहे म्हणल्यानंतर नटवरसिंग याचं डोकं कामातून जाण्याची वेळ आली होती. पण आत्ता या माणसाला इथे आणुन चुकलोयच तर उपयोग नाही म्हणून त्यांना देखील साधूचं ऐकण्याशिवाय पर्याय राहिला नव्हतां.
कागदाच्या तुकड्यावर लिहण्यात आलेले पाच प्रश्न. थॅचर यांच्या चेहऱ्यावर संशयाच्या रेषा उमटू लागल्या होत्या. इतक्यात त्या साधूने पहिला प्रश्न त्यांना मनातल्या मनात वाचयला सांगितला. थॅचर यांनी ते देखील केलं. त्यांनी मनातल्या मनात प्रश्न पुर्ण करताच तो प्रश्न नेमका काय होता ते या तांत्रिकानं सांगितलं. जस होतं तसं.
आत्ता थॅचर बाईंच्या चेहऱ्यावर उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांनी तात्काळ दूसरा प्रश्न वाचला तो देखील मनातल्या मनातच. त्या तांत्रिकाने प्रश्न कोणता होतं ते सांगितलं. तीन. चार. पाच. सगळे प्रश्न त्या तांत्रिकाने जसेच्या तसे सांगितले.
झालं आत्ता थॅचरबाईंचा संपुर्ण विश्वास या तांत्रिकावर बसला होता. त्यांनी अजून प्रश्न विचारण्यास सुरवात केली इतक्यात मांत्रिक म्हणाले आत्ता सुर्यास्त झाला. आत्ता मी काहीही सांगू शकत नाही आपणास अजून काही विचारायचं असेल तर आपण नटवरसिंग यांच्या घरी भेटू शकतो.
नटवरसिंग यांच्यावर त्या मांत्रिकांच्या उत्तराचं ट्रान्सलेशन करण्याची जबाबदारी होती. नटवरसिंग यांना माहित होतं एका पक्षाचा नेता असा कोणत्याही उप उच्चायुक्ताच्या घरी जावू शकत नाही. तरी देखील त्यांनी भितभितच तांत्रिकाच्या उत्तराचं ट्रान्सलेशन केलं. त्यावर थॅचर बाई म्हणाले, नटवरसिंग आपलं घर कुठे आहे.
पुढे त्या नटवरसिंग यांच्या घरी आल्या. ज्या प्रमाणं त्या मांत्रिकानं हाताला धागा बांधायला सांगितला होता तसाच बांधून. थॅचर यांनी सर्वात शेवटचा प्रश्न विचारला मी पंतप्रधान होईल का? त्यावर हा मांत्रिक म्हणाला, तीन ते चार वर्षात तुम्ही पंतप्रधान व्हालं. ते देखील अकरा किंवा तेरा वर्षांसाठी ! पुढे काय झालं, तर ते सर्व जगाला माहित आहे. थॅचर अकरा वर्षांसाठी ब्रिटनच्या पंतप्रधान झाला आणि हो सोबत त्या मांत्रिकाच्या भक्त देखील झाल्या होत्या.
चंद्रास्वामी त्यांच नाव ! काहींना हे नाव नरसिंह रावांचा मांत्रिक म्हणून माहित असेल, काही राजीव गांधींच्या हत्येतील संशयीत म्हणून माहित असेल ! काहीना हवाला रॅकेट चालवणारा तर काहिंना सेटिंग करणारा म्हणून माहित असेल तर काहींच्या मते तो आजही साधू आणि अध्यात्मिक पुरूष असेल.
हि गोष्ट त्याचं चंद्रास्वामींची.
चंद्रास्वामी मुळचे राजस्थानचे. १९४८ ला त्यांचा जन्म झाला होता. वडिल सावकारी करायचे आणि हा मुलगा अध्यात्म आणि देवदेव करायचां. लहानपणापासून भविष्य सांगण्याचा आणि समजून घेण्याचा नाद त्यांना लागला.
नरसिंहराव मुख्यमंत्री १९७१ ते ७३ च्या दरम्यान आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते. याच काळात त्यांच्यासोबत चंद्रास्वामी दिसू लागले. नरसिंहरावांसोबत असणाऱ्या या माणसांबद्दल कुतूहल निर्माण झांलं आणि पत्रकारांनी तो कुठून नरसिंहरावांपर्यन्त पोहचला याची माहिती घेण्यास सुरवात केली. काहींच्या मते तो तरुणपणात दिल्लीतील खासदारांच्या निवासमध्ये रहायला होता. सिद्धेश्वर प्रसाद बिहार मधून खासदार झाले होते. तिथे हे दोन तरुण रहायचे. एकाच नाव होतं चतुर्भूज गौतम जे पुढे चंद्रशेखर यांचे सचिव झाले आणि दूसरे होते चंद्रास्वामी.
तिथेच त्यांनी प्रत्येक गोष्टींचा फायदा घेण्यास सुरवात केली. त्यांना पत्रिका पहायचा नाद होता. नेत्यांच्या पत्रिका ते पाहून भविष्य सांगू लागले. काहींच्या मते ते आपल्या ओळखिच्या साधूसंताना भविष्य विचारायचे आणि ते सांगायचे. त्यांना स्वत:ला काहीचं येत नव्हतं. खर खोटं आजही कोणी सांगू शकत नाही पण एक गोष्ट खरी होती ती म्हणजे या माणसांना चांगल्या ओळखी निर्माण करण्यास सुरवात केली होती.
आत्ता साल चालू होतं ते १९९१ चं. या दरम्यान चंद्रास्वामी कोण होते तर असा माणूस ज्याला पंतप्रधान नरसिंहराव यांची भेट घेण्यासाठी अपॉइन्टमेंट घ्यायला लागत नाही. ज्यांचा दिल्लीत मोठ्ठा आश्रम होता आणि तो आश्रम खुद्द इंदिरा गांधींनी दिल्याचं सांगण्यात येत होतं. असा मांत्रिक ज्याला भारतातलेच नाही तर जगभरातले नेते आपला गुरू मानू लागले होते.
राजीव गांधीच्या हत्येत सहभाग.
राजीव गांधींच्या हत्येवर जैन आयोगाने आपला अहवाल सादर केला. त्यामध्ये लिट्टे समर्थकांना मदत केल्यांचे आरोप थेट चंद्रास्वामींवरती करण्यात आले होते. दाऊदसोबत देखील संबध होते व त्यांच्यावर असणारे खटले गृहमंत्रालयातून कमजोर करण्यासाठी त्याने मदत केली असल्याचे आरोप झाले. पुढे त्यांच नाव आलं ते अदनान खशोगी यांच्यासोबत असणाऱ्या संबधांमुळे, आयकर विभागाच्या धाडीमध्ये तब्बल ११ मिलीयन डॉलर्सचा व्यवहार अदनान खशोगीबरोबर झाल्याचं उघडकीस आलं होतं.
काहीं पत्रकारांच्या मते, रॉ ने देखील त्यांचा वापर आपल्या हितसंबधातून बातम्या काढण्यासाठी केला. अदनान खशोगी सोबत असणारे संबध हे रॉ ने पेरलेलं जाळ होतं की खरोखरचं त्यांनीच एका तस्कराला भारताचा रस्ता मोकळा करुन दिला होता ते फक्त चंद्रास्वामी सांगू शकले असते.
मात्र या सगळ्याचा शेवट नक्कीच वाईट असतो. १९९६ साली त्यांच्यावर चार्जशीट दाखल करण्यात आलं. त्यांची रवानगी तुरूंगात झाली. आपल्या भल्यामोठ्या हितसंबधातून ते केसेस लढत राहिले पण या सगळ्यांचा खरा शेवट झाला तो २३ मे २०१७ ला. २३ मे रोजी त्यांच निधन झालं त्यावर ANI ने त्यांना अध्यात्मिक गुरू म्हणून संबोधलं यावर प्रतिक्रिया देताना वरिष्ठ पत्रकार राम बहादुर राय म्हणाले होते, लोकं विसरुन जातील ते एक अध्यात्मिक गुरू होते. लोकं तर त्यांना पंतप्रधानांचा मांत्रिक. बोफोर्स, सेंट किटस्, हवालाकांड, अदनान खशोगीसोबत संबध, दाउद या गोष्टींसाठीच लक्षात ठेवतील. आज चंद्रास्वामी देखील त्याच गोष्टींसाठी लक्षात राहिले आहेत हे विशेष.
हे ही वाचा –
- सुशीलकुमार की वसंत साठे, कोणी पळवला होता इंदिरा गांधींचा अस्थिकलश ?
- मायलेकराच्या भांडणात झाला होता अटलजींचा पराभव !
- पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकणार होता.. पण ?