नोबेल विजेत्या भारतीयाचा सन्मान म्हणून नासाने दुर्बिणीला नाव दिल ‘चंद्रा टेलिस्कोप’

भारताच्या मातीत अनेक महान माणसं जन्माला आली आहेत. या व्यक्तींनी भारताचं नाव जगभरात गाजवलं. यातील एक महत्वाचं नाव म्हणजे सुब्रमण्यन चंद्रशेखर. नव्या पिढीला या शास्त्रज्ञाविषयी कदाचित माहित नसेल. पण सुब्रमण्यन चंद्रशेखर यांनी संशोधनाचं करुन ठेवलेलं काम इतकं मोठं आहे की, आज जगभरात सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा आदर केला जातो.

खगोलशास्त्रज्ञ चंद्रशेखर यांचा मोठेपणा दर्शवण्यासाठी एकच गोष्ट सांगावीशी वाटते ती अशी, विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनच्या संशोधनाची जो शास्त्रज्ञ पडताळणी करायचा, त्या आर्थर एडिंग्टन नावाच्या शास्त्रज्ञाने सुब्रमण्यन चंद्रशेखर यांची माफी मागितली होती.

आज सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा स्मृतीदिन.

चंद्रशेखर यांना ‘चंद्रशेखर लिमिट’ या शोधासाठी १९८३ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुब्रमण्यन चंद्रशेखर हे पहिले खगोलशास्त्रज्ञ आहेत, ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

खरं म्हणजे १९३५ साली, चंद्रशेखर यांना हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला असता, परंतु त्यांच्या संशोधनाच्या मुळाशी न जाता चंद्रशेखर यांनी मांडलेले तर्कवितर्क किती तकलादू आहेत, याचाच उहापोह करण्यात पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी धन्यता मानली.

सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९१० रोजी लाहोर येथे झाला. चंद्रशेखर यांचं कुटूंब उच्चशिक्षीत. सी.व्ही.रामन हे नोबेल पुरस्कार पटकावलेले पहिले भारतीय. सी.व्ही.रामन हे सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचे काका.

चंद्रशेखर यांनी काकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षणाच्या दिशेने वाटचाल केली. वयाच्या १४ व्या वर्षी चंद्रशेखर यांनी शालेय शिक्षण पूर्ण करुन मद्रास येथील ‘प्रेसिडेन्सी काॅलेज’ मधून फिजीक्स या विषयात पदवी संपादन केली. मित्रांनो, त्याकाळी आपल्या देश पारतंत्र्यात होता, भारतात ठिकठिकाणी क्रांतीचं वातावरण होतं. अशा वातावरणात चंद्रशेखर यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला.

१८ व्या वर्षात आपण जी आयुष्याची मजा अनुभव असतो, त्या वयात ‘द काॅम्पटन स्कॅटरींग अँड द न्यू स्टॅटिसटीक्स’ हा पहिला संशोधन निबंध चंद्रशेखर यांनी लिहिला.

याच वर्षात त्यांनी बी. एस्सी ऑनर्सचं पदवी शिक्षण पूर्ण केलं.फिजीक्स विषयात अभुतपूर्व यश मिळवणारे चंद्रशेखर यांना पी.एचडी करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठाकडून स्काॅलरशीप मिळाली. चंद्रशेखर भारत सोडून परदेशात जायला निघाले. परदेशात जाण्यासाठी बोटीने प्रवास करत होते. तो समुद्री प्रवासच चंद्रशेखर यांच्या संशोधनाचा पाया होता.

या समुद्री प्रवासात आकाशाकडे बघता बघता चंद्रशेखर यांनी गणित केले, सर्व इंधन संपल्यानंतर आपल्याच गुरुत्वाकर्षणाखाली स्थिर राहण्यासाठी तारा कितपत मोठा असावा? त्यांची कल्पना अशी होती, तारा लहान झाल्यावर त्यातले पदार्थकण एकमेकांच्या अतिशय जवळ येतात.

चंद्रशेखर यांनी सर्व गोष्टींचा अनुमान लावुन गणित केले, सुर्याच्या वस्तुमानाप्रमाणे १.४४ पटीपेक्षा जास्त वस्तुमानाचा थंड झालेला तारा, स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाखाली टिकाव धरु शकणार नाही.

या वस्तुमानालाच ‘चंद्रशेखर मर्यादा’ असे म्हणतात.

या संशोधनात चंद्रशेखर यांचा पुढील शोध असा होता, सुर्याच्या १.४४ पटी पेक्षा लहान असणारा तारा ‘श्वेत बटू’ मध्ये रुपांतरीत झाल्यावर आणखी कोसळत नाही. सूर्याच्या १.४४ ते ३ पट वस्तुमान असलेल्या ता-यांमधली अणुकेंद्रे एकमेकांमध्ये विलीन होऊन ता-यामध्ये फक्त न्युट्राॅन कण शिल्लक राहतात. त्यापेक्षा जास्त वस्तुमान असलेल्या ता-यांचे कृष्णविवरात रुपांतर होते.

पी.एचडी करण्यासाठी चंद्रशेखर त्यावेळी परदेशात सर आर्थर एडिंग्टन यांच्या हाताखाली अभ्यास करत होते. ११ जानेवारी १९३५ चा दिवस. इंग्लंड येथे एका मोठ्या परिषदेत चंद्रशेखर स्वतःचा हा शोध मांडून सर्व शास्त्रज्ञांना चकीत करण्यास सज्ज होते. याच परिषदेत एडिंग्टन सुद्धा याच विषयावर स्वतःचं मत मांडण्यास उत्सुक. चंद्रशेखर यांनी या परिषदेत स्वतःचं संशोधन जगासमोर ठेवण्यास सुरुवात केली. उपस्थित सर्व मान्यवर शांतपणे चंद्रशेखर यांचं म्हणणं ऐकत होते.

चंद्रशेखर यांचं बोलुन झाल्यावर एडिंग्टन स्वतःच्या जागेवरुन उठले आणि त्यांनी सरसकट चंद्रशेखर यांच्या मुद्द्यांना कोणताही पाया नाही, या सर्व गोष्टी वरवरच्या आहेत, अशी भुमिका मांडली.

खगोलअभ्यासामध्ये एडिंग्टनना गुरु मानलं जाई. चंद्रशेखर यांचं म्हणणं तिथे उपस्थित अनेक जणांना पटत असलं तरीही एडिंग्टनचा दरारा इतका होता, की त्यांच्याविरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. परिमाणतः चंद्रशेखर यांच्या सिद्धांताला मान्यता देण्यात आली नाही.

स्वतःचा या सिद्धांतामध्ये किती खरेपणा आहे, हे दाखवण्यासाठी चंद्रशेखर यांनी डगमगून न जाता संयमाने काम केले. मधल्या काळात त्यांनी अमेरिकेचं नागरीकत्व पकरलं. १९३६ साली ललिता डोरायस्वामी यांच्याशी विवाह केला. चंद्रशेखर यांच्या कार्याला ललिताने सुद्धा संपूर्ण पाठिंबा दिला. खगोलशास्त्रावर जे जर्नल अभ्यासलं जायचं अशा ‘द अॅस्ट्रोफिजीकल जर्नल’चं संपादक म्हणुन त्यांनी काम केलं. १९५२ ते १९७१ या काळात त्यांनी संपादकपदाची जबाबदारी भुषविली.

१९६९ साली भारत सरकारने पद्मविभुषण पुरस्काराने चंद्रशेखर यांना सन्मानित केले.

चंद्रशेखर यांनी तेव्हा अमेरिकेचं नागरीकत्व पत्करलं होतं. त्यावेळी हा सन्मान देताना इंदिरा गांधी म्हणाल्या,

“मला या गोष्टीचं खुप दुःख आहे की चंद्रशेखर यांच्यासारख्या मोठ्या व्यक्ती आज भारताचे नागरीक नाहीत. पण आज ते भारतात न राहता संपुर्ण जगभरात भारताचं नाव उज्वल करत आहेत, याचा मला आनंद आहे.”

पुढे काही वर्षांनी चंद्रशेखर यांनी मांडलेला सिद्धांत योग्य आहे असे कळताच सर आर्थर एडिंग्टन यांनी त्यांची माफी मागितली.

१९८३ साली चंद्रशेखर यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं. त्यांनी मांडलेल्या ‘चंद्रशेखर लिमीट’ या सिद्धांतासाठी सर्वोत्कृष्ट नोबेल पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. वयाची जवळपास ६४ वर्ष चंद्रशेखर संशोधन आणि अध्यापनाचं कार्य करत होते. १९९५ साली त्यांचं निधन झालं.

चंद्रशेखर यांच्या मृत्युनंतर त्यांच्या सन्मानार्थ ‘नासा’ तर्फे अवकाशात ‘चंद्रा टेलिस्कोप’ नावाने दुर्बिण बसवली गेली. हि दुर्बिण आज अवकाश्यातील ता-यांचा वेध घेते. चंद्रशेखर यांनी खगोलशास्त्रात आणि संधोधनक्षेत्रात करुन ठेवलेलं इतकं मोठं काम, हे सुद्धा या ता-यांप्रमाणेच अंधारात झळाळणारं आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.