कुणास ठाऊक तुमच्याच आजूबाजूची व्यक्ती भविष्यात चंद्रकांत दादासारंखीच मोठी होऊ शकते.

राजकारणात कधी कोणाचं नशीब कसं पालटेल हे अजिबात सांगता येत नाही. इथं कधी-कधी दुर्लक्षित असणारी माणसं देखील अचानक सत्तेच्या केंद्रस्थानी जाऊन बसतात आणि सत्तेतील काही माणसं कायमची बेदखल होऊन जातात.

हे सांगायचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेलं एक वजनदार नाव म्हणजे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कोणी काही म्हणो पण या माणसानं राजकीय पटलावर स्वतःची दखल घ्यायला सर्वांनाच भाग पाडलं आहे.

परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणूकीपुर्वी जर कोणी चंद्रकांतदादाचं नाव घेतलं असतं तर,

पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर भागातील लोकांना हे नेमके कोण महाशय? असंच विचारावं लागलं असतं.

तुम्ही-आम्ही सोडा, कदाचित त्यावेळी दस्तुरखुद्द चंदूदादांनाही विश्वास बसला नसता की उद्याच्या महाराष्ट्राचे राजकारण आपल्या भोवती फिरणार आहे म्हणून, पण काळाचा महिमा अगाद आहे इथं रावाचा रंक आणि रंकाचा राव होण्यास अजिबात वेळ लागत नाही.

आज हा विषय लिहण्याचं कारण म्हणजे चंद्रकांतदादांचा गेल्या ५-६ वर्षाचा प्रवास जवळून अनुभवला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीपुर्वी चंद्रकातदादा हे मुंबईतील मनोरा आमदार निवासात आमचे सख्खे शेजारी होते. त्यावेळी आम्ही आमदार निवासातील D विंग मध्ये 114 रुममध्ये राहत होतो तर चंदूदादा आमच्या रुमला लागूनच असलेल्या 113 नंबरच्या रुममध्ये राहत होते. त्यामुळे त्यांचे नेहमीच दर्शन ठरलेलं असायचं. इतर आमदारांसारखी कार्यकर्त्यांची गर्दी दादांच्या रूमला अजिबात नव्हती, त्यामुळे दादा असतील तेंव्हाच ती खोली उघडली जायची.

आता पश्चिम महाराष्ट्रातीलच असल्याने त्यांच्याविषयी बऱ्यापैकी माहिती होती.

चंदूदादाचं व्यक्तिमत्व म्हणजे,

एकदम साधं, पांढरा शर्ट ,काळी पॅंन्ट, डोक्याला चपचपीत लावलेलं तेल, डोळ्यावर बाबुराव स्टाईल भिंगाचा चष्मा, शर्टाच्या होतोब्यांना त्यांनी कधी बटण लावलेलं आम्ही तर पाहिलं नव्हतं. लिफ्टमधून बऱ्याचदा एकत्रच खाली जात असू, परंतु का कुणास ठावूक पण त्यावेळी इतरांप्रमाणे त्यांच्याशी ओळख वाढवावी असं एकंदरीत कधी वाटलंच नाही.

बऱ्याचदा मनोरा आमदार निवास परिसरात त्यांना स्वतःच्याच तंद्रीत एकटेच फिरताना, आमदार निवास कँन्टिंनमध्ये त्यांना एकटेच बसून जेवताना कित्येकदा पााहिले आहे. या सर्व घटनेला आमचे मित्र व रूम पार्टनर
मल्हार टाकळे, पंकज मोहोड हे साक्षीदार आहेत.

पण अचानक २०१४ च्या लोकसभेचे रिझल्ट लागले, केंद्रात सत्ता परिवर्तन झाले, अमित शहा नावाचा देशभर डंका सुरु झाला आणि त्यांच्याशी नाव जोडत,

रातोरात चंद्रकातदादाचं नाव राजकीय पटलावर चर्चेत आलं.

मीडियाचा गराडा त्यांच्या भोवती जमू लागला. प्रिंट/ इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींचा आमदार निवासात वावर वाढू लागला. पुढं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील राज्यात सत्ता परिवर्तन झालं आणि १५ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर राज्यात भाजप-सेना सरकार स्थापन झाले.

लागलीच या सरकारच्या मंत्रिमंडळात एक वजनदार मंत्री म्हणून चंद्रकांतदादाचं नावाचा समावेश झाला. आम्हाला काही काळ विश्वास बसत नव्हता की आमचा शेजारी आमदार राज्याचा मंत्री झालाय म्हणून.

दादामंत्री झाल्यानंतरही बरेच दिवस ते आमच्या शेजारच्या रुममध्येच राहत होते.

आता मात्र दादांचा ताल वाढला होता. एकएकट्या राहणाऱ्या दांदाभोवती लोकांचे-कार्यकर्त्यांचे मोहोळ वाढले होते. सतत बॉडीगार्डचा पहारा होता. दादांच्या मोकळ्या हातोब्याना आता बटणं बसली होती. काहीसे अबोल व बुजऱ्या स्वभाव वाटणाऱ्या दादांमधील कॉन्फिडन्स देखील भलताच वाढला होता.

दादांच्यातील गंगाधर गायब होऊन अचानक शक्तिमान जागा झाला होता.

बघता-बघता आमचे हे सख्खे शेजारी आमदार निवासातून टूमदार बंगल्यात राहायला गेले. काल पर्यंत आपण ज्या व्यक्तीकडे गांभीर्याने कधीच पाहिलं नव्हतं अशी व्यक्ती आज राज्याच्या मंत्रिमंडळात दाखल झाली.

तेंव्हा वाटलं च्यामारी दादूस बरोबर थोडी ओळख वाढविली असती तर आज राज्याचा महसूलमंत्री आमचा दोस्त हाय म्हणून टेंभ्याने सांगता आलं असतं.

गमतीचा भाग सोडा पण या सर्व गोष्टीचं सांगायचं तात्पर्य एवढंची की समाजात व राजकारणात वावरताना कधीच कोणाला कमी लेखू नका. कोणाची पारख त्यांच्या साध्या राहणीमानावरून, कपड्यावरून अजिबात करू नका. कारण दिवस कोणाचे कसे फिरतील हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांशी प्रमाने रहा, एकमेकांचा आदर करा आणि सर्वात महत्वाचं लोकांशी संपर्क आणि ओळखी वाढवा.

कुणास ठाऊक कदाचित उद्या तुमच्याच आजूबाजूची एखादी व्यक्ती भविष्यात चंद्रकांत दादासारंखीच मोठी होऊ शकते.

  •  अभिजीत झांबरे. (संपर्क क्रमांक- ७७३८६७५३५३)

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. Bhagvat says

    बस झाल बा कायले झाडांवर चढवून राहीला आता तर मतदारसंघ पण असा दिलाय की Direct पत्ता होणार ????????

Leave A Reply

Your email address will not be published.