सुलोचनादीदींना चंद्रकांत मांढरेंच्या पत्नी समजून गावकऱ्यांनी गोंधळ घातला

मराठी प्रेक्षक हा कलाकारांवर नेहमीच प्रेम करत आला आहे. हे प्रेम ऑटोग्राफ, फोटो अशा गोष्टींपुरतं मर्यादित नाही. तर त्यापलीकडे प्रेक्षक मराठी कलाकारांवर जीव ओवाळून टाकतात.

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना आहे. आत्ता फेसबुक, इंस्टाग्राम अशा अनेक गोष्टींमुळे कलाकारांच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सतत कळत असतात. सगळ्याच गोष्टी कळत असल्याने सध्याच्या काळात मनात इतकं कुतूहल नसतं. परंतु पूर्वी तसं नव्हतं. मोठ्या पडद्यावर दिसणारा कलाकार प्रत्यक्ष आयुष्यात कसा वागतो , काय करतो याबद्दल प्रेक्षकांना खूप कुतूहल असायचं. तसेच तेव्हा सोशल मीडिया नसल्याने सिनेमात दिसणाऱ्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना खऱ्या वाटायच्या.

यामुळे प्रेक्षकांनी चंद्रकांत मांढरे आणि सुलोचनादीदी यांच्याविषयी एक गोड गैरसमज करून घेतला होता.

तो किस्सा उलगडण्याआधी या दोन दिग्गज कलाकारांविषयी थोडंसं…

भिडूंनो, कलाकार अनेक भूमिका करतो पण त्याची एखादी भूमिका एवढी गाजते की त्याची ती ओळख आपल्या मनातून जात नाही. असंच काहीसं या दोघांबाबतीत म्हणता येईल.

चंद्रकांत मांढरे हे नाव उच्चारताच सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहतात त्यांनी रंगवलेले छत्रपती शिवाजी महाराज.

शरीराने सुदृढ, डोळ्यांमध्ये स्वराज्य निर्माण करण्याचा ध्यास, तेजःपुंज चेहरा असे छत्रपती शिवाजी महाराज चंद्रकांत मांढरे यांनी ज्या पद्धतीने सिनेमात रंगवले आहेत त्याला तोड नाही. ‘छत्रपती शिवाजी’ सिनेमातला एका प्रसंगाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो.

मातृभूमीच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराज आई भवानी जवळ प्रार्थना करतात. त्या प्रसंगात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चंद्रकांत यांच्या डोळ्यात असलेली आर्तता, कळकळ पाहून आपण शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होतो. याला कारण चंद्रकांत मांढरेंचा प्रभावी अभिनय.

दुसरीकडे सुलोचनादीदी.

योगायोग म्हणजे सुलोचनादीदींची सुद्धा ऐतिहासिक भूमिका अजरामर आहे. ती म्हणजे जिजाऊसाहेबांची. ‘मराठा तितुका मेळवावा’ या सिनेमात सुलोचनादीदींनी जिजामातांची भूमिका साकारली. आजही मराठी सिनेसृष्टीत त्यांनी साकारलेल्या जिजामाता या सर्वांसमोर आदर्श आहेत.

करारी डोळे, स्वराज्याचं तोरण बांधाचयं‌ स्वप्न, कोणालाही धाक वाटावा असा आवाज असे अभिनयाचे अनेक पैलू सुलोचनादीदींनी सुंदर रित्या साकारले आहेत. एखादी भूमिका लोकप्रिय झाल्यावर वारंवार त्याच भूमिकांच्या ऑफर्स कलाकारांना येतात. आणि कलाकार सुद्धा अशा ऑफर्स स्वीकारतात.

परंतु सुलोचनादीदींनी मात्र संपूर्ण कारकिर्दीत केवळ एकदाच ही भूमिका साकारली आणि पुढील आयुष्यात जिजामाता म्हणजे सुलोचनादीदी अशी त्यांची ओळख बनली.

हे दोघे प्रतिभासंपन्न कलाकार जेव्हा एकत्र आले तेव्हा अभिनयाचा अनोखा आविष्कार पाहायला मिळाला.

या दोघांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये एकत्र काम केले. त्यापैकी काही सिनेमांमध्ये हे दोघे नवरा – बायको होते. अभिनयाचं नाणं खणखणीत असल्याने या दोघांची सिनेमांत नवरा – बायको मध्ये असणारी केमिस्ट्री उत्तम रंगायची. यामुळे मराठी प्रेक्षकांनी या दोघांबद्दल एक वेगळाच गैरसमज करून घेतला होता.

हा किस्सा सुलोचनादीदींनी एका मुलाखतीत सांगितला होता…

झालं असं की, चंद्रकांत मांढरे एका गावी गेले होते. आपला आवडता कलाकार गावी आल्याने गावकऱ्यांनी साहजिक गर्दी केली. गावकऱ्यांनी विनंती केली, की आम्हाला मांढरे पती – पत्नींचा एकत्र फोटो आठवण म्हणून काढायचा आहे.

चंद्रकांत गावकऱ्यांचा आग्रह मोडू शकले नाहीत.

त्यांनी जवळच उभ्या असलेल्या पत्नीला बोलावले. चंद्रकांत यांची पत्नी आली. गावकरी मात्र चकित झाले. त्यांना वाटलं चंद्रकांत मस्करी करत आहेत. अखेर गावकऱ्यांनी बोलून दाखवलं की,

‘या तुमच्या पत्नी नाहीत. आम्ही सिनेमात तुमच्या पत्नीला अनेकदा बघितले आहे. तुम्ही कृपया त्यांना बोलवा.’

आत्ता झाला प्रकार चंद्रकांत यांच्या लक्षात आल्या. हे सर्व भोळे गावकरी सिनेमात दिसणाऱ्या चंद्रकांत आणि सुलोचना या दोघांना खऱ्या आयुष्यात सुद्धा पती – पत्नी समजत होते.

या कारणावरून गावकऱ्यांनी काहीसा गोंधळ घालायला सुरुवात केली.

अखेर चंद्रकांत यांनी गावकऱ्यांना सविस्तर समजावले तेव्हा कुठे गावकरी शांत झाले. हा प्रकार जेव्हा सुलोचनादीदींना कळाला, तेव्हा साहजिक त्यांना प्रेक्षकांच्या प्रेमाची गंमत वाटली.

तेव्हा कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी कोणतंही माध्यम नव्हतं. त्यामुळे काही वेळेस डोळ्यांना जे दिसेल, तेच प्रेक्षक खरं मानायचे. एकूणच हा प्रकार जाणून घेतल्यावर एक महत्वाची गोष्ट कळून येते ती म्हणजे, गावकऱ्यांमध्ये झालेला गैरसमज ही नकळतपणे चंद्रकांत आणि सुलोचनादीदींच्या अभिनयाला दिलेली अस्सल पोचपावती म्हणावी लागेल.

दोघांचा रुपेरी पडद्यावरचा अभिनय इतका दर्जेदार होता, की प्रेक्षकांनी त्यांच्याविषयी असा गोड गैरसमज करून घेतला. मराठी सिनेमांवर आणि कलाकारांवर प्रेम करणाऱ्या अशा प्रेक्षकांमुळे तसेच प्रत्येक भूमिका समरसून साकारणाऱ्या कलाकारांमुळे आज मराठी सिनेसृष्टी स्वतःचं वेगळं स्थान टिकवून आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.