चंद्रकांत सूर्यकांत हे मांढरे बंधू मराठी सिनेमातले चंद्रसूर्य होते…..

मराठी चित्रपटसृष्टी आज घडीला ज्या ठिकाणी आहे त्याचा पाया कोल्हापूरच्या दोन रांगड्या गड्यांनी घातला. या दोन भावांमुळे मराठी सिनेमाला मराठी प्रेक्षक जाऊन गर्दी करू लागला. एकाच फ्रेममध्ये छत्रपती शिवराय आणि शंभूराजे साकारण्याचं भाग्य या दोन बंधूना मिळालं, आणि कित्येक वर्ष या दोन भावांनी मराठी सिनेमावर आपली छाप सोडली ती आजतागायत टिकून आहे. तर जाणून घेऊया या दोन भावांविषयी.

चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे या दोन नावांशिवाय मराठी सिनेमाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. चंद्रकांत आणि सूर्यकांत हे दोन बंधू मराठी सिनेसृष्टीतील चंद्र सूर्य होते.

सिनेमाचा कुठलाही प्रकार असू दे पौराणिक असो किंवा तमाशाप्रधान सिनेमा असो चंद्रकांत आणि सूर्यकांत हे दोन नायक त्यात असले म्हणजे सिनेमा सुपरहिट होणार इतपत लोकांना याबद्दल खात्री असायची.

ऐतिहासिक आणि ग्रामीण सिनेमावर मांढरे बंधूनी राज्य केलं असं म्हणता येईल इतके सिनेमे या दोघं भावांनी हिट केले. दिग्दर्शक आणि निर्मात्यांना या दोन बंधुंशीवाय सिनेमा बनवण्यासाठीचा पर्याय नव्हताइतकं वलय या दोन भावांचं होतं. रुबाबदार आणि रांगडं व्यक्तिमत्व, बलदंड शरीर, धष्टपुष्ट व्यक्तिमत्व आणि तेजस्वी चेहरा यामुळं या दोघा भावांवर अनेक अभिनेत्र्या त्याकाळी फिदा असायच्या.

वडिलांचा अत्तर विकण्याचा व्यवसाय होता त्यात या दोन भावांना कलेची जास्त आवड होती. चित्रकला आणि शिल्पकला या दोन्ही गोष्टीत दोघेही भाऊ पारंगत होते. चंद्रकांत यांना बाबुराव पेंटर यांनी सिनेमाचे पोस्टर बनवण्याची संधी दिली आणि पुढे चंद्रकांत थेट सिनेमात आले. फेटेवाला पाटील आपल्या बेरकी आवाजात संवाद करताना चंद्रकांत पाटील रुबाबदार भासायचे. 

छत्रपती शिवराय यांना पडद्यावर साकारण्याचा पहिला मान हा चंद्रकांत मांढरे यांना जातो. चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोन बंधूंमध्ये १३ वर्षांचं अंतर होतं. चंद्रकांत ज्यावेळी सिनेमात काम करत असे तेव्हा सूर्यकांत हे जेवणाचा डबा घेऊन जात असे. बाल शिवाजी सिनेमात सूर्यकांत मांढरे यांना शिवरायांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.

जुने जाणते सिनेरसिक आणि चंद्रकांत सूर्यकांत मांढरे यांच्यासोबत काम करणारे लोकं सांगतात कि दोन्ही भाऊ एकमेकांचा प्रचंड आदर करायचे. ज्या ज्या वेळी त्यांच्यात वाद व्हायचे तेव्हा दोघे भाऊ रात्रभर विचार करायचे आणि सकाळी एकमेकांबरोबर माफी मागायचे. इतकं प्रेम या दोघं भावांमध्ये होतं. या दोन्ही बंधूंनी चौदा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ‘लग्नाला जातो मी’ (१९६०) या चित्रपटामध्ये त्यांनी नायक आणि खलनायक अशी दुहेरी भूमिकाही सहजतेने साकारली. 

मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, पाठचा भाऊ, स्वराज्याचा शिलेदार अशा अनेक सिनेमांमध्ये या दोघा भावांनी जबरदस्त अभिनय करून लोकांची वाहवा मिळवली. अभिनेत्री उमा यांनी सूर्यकांत यांचा सांगितलेला हा किस्सा –

मल्हारी मार्तंड नावाचा सिनेमा होता, सूर्यकांत यांच्या पत्नीची भूमिका उमा यांनी केली होती. जयश्री गडकरसुद्धा या सिनेमात होत्या. या सिनेमातल्या एका प्रसंगात सूर्यकांत हे आपल्या भूमिकेत इतके शिरले होते कि जिथे कानाखाली मारायचा फक्त अभिनय करायचा होता तिथे सूर्यकांत यांनी खरोखर उमा यांच्या कानाखाली मारली होती. ती चापट इतकी जोरात होती कि उमा यांच्या गालावर थेट पाच बोटं उमटली होती आणि सूर्यकांत यांच्या बोटातील अंगठी उमा यांच्या गालात रुतली आणि तिथून रक्त यायला सुरवात झाली होती. 

नंतर शॉट ओके झाल्यावर सूर्यकांत यांनी उमा यांची माफी मागितली होती. इतके ते भूमिकेशी समरस झाले होते. या दोन भावांनी मराठी सिनेमात जी छाप सोडली ती विसरणं अशक्य आहे. वारणेचा वाघ सिनेमात सूर्यकांत यांनी साकारलेली सत्तू भोसलेची भूमिका हि अजरामर भूमिकांपैकी एक ठरली तर चंद्रकांत यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका हि लोकांच्या डोक्यातून न जाणारी भूमिका ठरली.

मांढरे बंधूनी मराठी मन ओळखलं आणि त्यानुसार भूमिका केल्या ज्या प्रचंड हिट झाल्या. आजही या दोन भावांची जोडीनं अनेक मराठी प्रेक्षकांची फेव्हरेट जोडी आहे. पुढे सूर्यकांत मांढरेनी आपल्या जीवनपटाबद्दल धाकटी पाती नावाचं पुस्तकही लिहिलं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.