इथं बॉलिवूड पिक्चर बॉयकॉट होतायेत तिकडं चंद्रपूरच्या ‘पल्याड’ सिनेमाची दखल फोर्ब्सने घेतलीय

मराठी फिल्म इंडस्ट्रीत समाजातील वास्तव दाखवणारे अनेक सिनेमे आहेत. हे सिनेमे सामाजिक मुद्द्यांना प्रेक्षकांच्या समोर मांडतांना आपल्या दमदार कन्टेन्टच्या बळावर त्यांची मनं जिंकून घेतात. मग त्यात देऊळ असो, रेडु असो, सैराट किंवा जोगवा असो. पण आता या मराठी सिनेमांच्या यादीमध्ये आणखी एक सिनेमा दाखल होणार आहे.

तो सिनेमा म्हणजे ‘पल्याड’ 

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्दर्शक शैलेश दुपारे यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा जगभरातील फिल्म फेस्टिवलमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. ऑगस्ट २०२२ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात सिनेक्वेस्ट फिल्म अँड क्रिएटिव्हिटी फेस्टिव्हल पार पडला. त्या फेस्टिवलमध्ये पल्याड सिनेमाचं  सुद्धा प्रदर्शन करण्यात आलं होतं.

या फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित झालेल्या पल्याडची दखल थेट अमेरिकेच्या जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने घेतली आहे. फोर्ब्स मासिकाने पल्याड सिनेमाचे दिग्दर्शक शैलेश दुपारे यांची मुलाखत प्रसिद्ध केलीय. फोर्ब्सला मुलाखत देतांना शैलेश दुपारे यांनी सिनेमाची कथा आणि सिनेमाची निर्मितीचा प्रवास उलगडला आहे. 

सिनेमाची कथा ही मसनजोगी समाजावर आहे…

महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्याच्या सीमाभागात किंवा मसनजोगी नावाचा समाज राहतो. हा समाज मेलेल्या मृतांचे अंत्यसंस्कार करण्याचे काम करतो. स्मशान जोग्यांच्या कामामुळे इतर समाजातील लोकं त्यांच्याशी सामाजिक संबंध ठेवत नाही. तसेच त्यांचा विटाळ मानतात. त्याच स्मशान जोगी समाजाची कथा या सिनेमात दाखवण्यात आलीय.

या सिनेमामध्ये एका गावात स्मशान जोग्याचे काम करणारा म्हातारा, त्याची विधवा सून आणि त्याच्या नातवाची कथा दाखवली आहे. 

स्मशान जोग्याचे काम करणारा म्हातारा हा पिढ्यान्-पिढ्या तीच कामे करत आलेला असतो. त्यामुळे त्याच्या नातवाने सुद्धा असेच स्मशान जोग्याचे काम करावे अशी त्याची इच्छा असते. त्यामुळे तो आपल्या नातवाला त्याच कामाची शिकवण देतो. परंतु मुलाच्या आईची भूमिका मात्र त्याच्या आजोबांच्या विरुद्ध असते. तिच्या मुलाने स्मशान जोग्याचे काम करू नये, त्याने शिक्षण घ्यावं, चांगलं आयुष्य जगावं अशी तिची इच्छा असते. 

या सिनेमात मुलाचे आजोबा त्याला जातीने पूर्वापार आखून दिलेली कामं करण्याची शिकवण देतात. तर मुलाची आई मात्र त्याला त्या कामाच्या पल्याड जाऊन नवीन आयुष्य सुरु करण्याची शिकवण देते. 

मसनजोगी समाजाचे वास्तव मांडणाऱ्या या सिनेमाची कथा डिस्कव्हरी चॅनलमधून कळली होती.  

डिस्कव्हरी चॅनलवरील टॅबू नावाचा कार्यक्रम येतो. तो कार्यक्रम पाहत असतांना सुदर्शन खडांगळे यांना या परंपरेची माहिती मिळाली होती. सुदर्शन खडांगळे यांनी ही माहिती दुपारे यांना सांगितली. त्यानंतर दुपारे आणि त्यांच्या मित्राने मिळून या परंपरेवर शॉर्ट फिल्म बनण्याचे ठरवले. मात्र जेव्हा या परंपरेबद्दल दुपारे यांना आणखी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी यावर संपूर्ण सिनेमाच बनवण्याचं ठरवलं. त्याकरिता दुपारे आणि त्यांच्या मित्राने या सिनेमाची स्क्रिप्ट लिहायला सुरु केली.  

स्क्रिप्ट लिहून झाल्यावर शैलेश दुपारे यांनी आपली कथा ७०-८० लोकांना सांगितली. अनेकांना सिनेमाची कथा आवडली मात्र सिनेमात गुंतवणूक करायला कुणीही तयार नव्हते. 

तेव्हा खचून ना जाता शैलेश दुपारे यांनी स्वतः पैसा ओतायचा अन् या सिनेमाची निर्मिती करायची ठरवलं. त्यांनी स्वतःच्या पैशाने मार्च २०२० मध्ये सिनेमाचं शूटिंग सुरु केलं. मात्र शूटिंग सुरु झाल्याच्या अवघ्या चार दिवसानंतरच लॉकडाऊनला सुरुवात झाली. त्यामुळे सगळं शूटिंग थांबवावं लागलं. शुटिंग थांबल्यामुळे सगळं विस्कळीत झालं. 

मात्र शैलेश यांनी जे काही शूटिंग झालं होतं ते आपल्या घरी आणून शैलेश यांनी एडिटिंग केली आणि त्याचा ३-४ मिनिटाचा व्हिडिओ प्रोड्युसर्सना दाखवायला सुरुवात केली. त्यातच दुपरेंनी तो व्हिडीओ सादमवार बंधूंना दाखवला. दुपारेंनी तयार केलेला तो व्हिडीओ बघून चंद्रपूर येथील व्यावसायिक पवन सादमवार, सुरज सादमवार यांनी स्वतःची फिल्म प्रोड्युसिंग कंपनी स्थापन करून फिल्म बनवण्याचा निर्णय घेतला. 

त्यांनी स्थापन केलेल्या ‘एलिवेट फिल्म्स कंपनीच्या माध्यमातू पल्याड या सिनेमाची निर्मिती सुरू करण्यात आली. या सिनेमाची संपूर्ण शूटिंग चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही या तालुक्याच्या गावात आणि आसपासच्या परिसरात करण्यात आलीय. विशेष म्हणजे ही शूटिंग अवघ्या २५ दिवसांमध्ये करण्यात आलीय. 

या सिनेमाची कथा तर दमदार आहेच सोबतच या सिनेमातील स्टारकास्ट सुद्धा जबरदस्त आहे. 

सिनेमातील मुलाच्या भूमिकेत रुचित निनावे या बाल कलाकाराने काम केलेय. त्याच्या आजोबाच्या भूमिकेत शशांक शेंडे दिसणार आहेत. तर त्याच्या आईच्या भूमिकेत देविका दफ्तरदार असणार आहेत.  तसेच दिवंगत सामाजिक आंदोलनकर्ते वि. रा. साथीदार यांनी आपल्या अंदाजात गुरुची भमिका साकारली आहेत. सोबतच नागपूरचे देवेंद्र दोडके सुद्धा यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

फोर्ब्सने दखल घेतलेल्या पल्याड सिनेमाबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी बोल भिडूने या सिनेमाचे दिग्दर्शक शैलेश दुपारे यांच्याशी संपर्क साधला, 

पल्याड बद्दल माहिती देतांना शैलेश दुपारे सांगतात की, “सुरुवातीला आम्ही हा सिनेमा फिल्म फेस्टिवल्ससाठीच करायचं ठरवलं होतं. कारण असे सिनेमे कमर्शियल नसल्यामुळे प्रोड्युसर यात पैसे गुंतवत नाहीत. मात्र एलिवेट फिल्म्सचे मालक सादमवार बंधू यांना या सामाजिक मुद्द्याचं गांभीर्य कळलं. त्यामुळे त्यांनी यात पैसे गुंतवण्याचं ठरवलं आणि या सिनेमाला सुरुवात झाली.” 

याबद्दल आणखी सविस्तर माहिती देतांना ते सांगतात की, “आम्ही सिनेमाची कथा लिहितानाच सशांक शेंडे, देविका दफ्तरदार आणि वि. रा. साथीदार यांची निवड केली होती. कारण या सिनेमाचं गांभीर्य कळणारी मंडळीच या सिनेमाला न्याय देऊ शकतात असं वाटत होतं. सामाजिक मुद्द्याला हात घालणारा सिनेमा याआधी अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदर्शित करण्यात आलाय. त्यातील यशानंतर लवकरच हा सिनेमा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.”

‘पल्याड’ला आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये प्रदर्शित करण्यात आलंय.

त्यात दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल नवी दिल्ली, नवी दिल्ली फिल्म फेस्टिवल, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म्स फेस्टिवल सिक्कीम, ब्लॅक स्वान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल कोलकाता, अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल मुंबई आणि कोकण मराठी फिल्म फेस्टिवल मुंबई या फेस्टिवल्समध्ये पल्याडने पुरस्कार प्राप्त केले आहेत.

तर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ एशिया टोरंटो, इंटरनॅशनल कॅास्मोपॅालिटन फिल्म फेस्टिव्हल टोक्यो, एशिया आर्ट फिल्म फेस्टिव्हल हाँगकाँग, सिनेक्वेस्ट व्हीआर अँड फिल्म फेस्टिव्हल यूएसए, कॅलेला फिल्म फेस्टिव्हल स्पेन, रिचमंड इंटरनॅशनल फिल्म फस्टिव्हल युएसए आणि बायडन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल स्वीडन या फिल्म फेस्टिवल्समध्ये चित्रपटाची अधिकृत निवड करण्यात आलीय.

मराठी सिनेमाच्या पुणे-मुंबई या पारंपरिक भागाच्या बाहेर फार मोजक्या सिनेमांची निर्मिती होते. इतर भागात सिनेमांची निर्मिती करण्यात आली तरी ते सिनेमे केवळ थोडक्या भागापुरतेच मर्यादित होतात. परंतु ‘पल्याड’ सारख्या मुव्हीमुळे विदर्भातील समाजजीवनाचा भाग आता पडद्यावर येणार आहे.

हे ही वाच भिडू  

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.