तेलंगणाचा थल्लैवा…!

कॉन्फीडन्स कसा पाहिजे तर रजनीकांतसारखा. वाघासारखी पावले टाकत शत्रूच्या गँगला एकटा भिडतो. असाच एक रजनीकांत हैद्राबाद मध्ये देखील आहे. कलवाकुंतला चंद्रशेखर राव म्हणजेच तेलंगणाचे मुख्यमंत्री  के सि आर. 


गडी पक्का राजकारणी. 


राजकारणाचे सुरवातीचे धडे गिरवले युथ काँग्रेसमध्ये. एनटी रामाराव यांच्या अखंड आंध्रच्या तेलगु अस्मितेच्या हाकेला ओ देऊन तेलगु देसम पार्टी मध्ये प्रवेश केला. तिथे बरीच वर्षे काढली. आमदारकी खासदारकी पासून ते मंत्रीपद सगळ उपभोगल.

एक दिवस त्यांना आठवलं आंध्रप्रदेश हा तेलंगणावर अन्याय करतोय. चंद्राबाबू नायडू तेव्हा आंध्रचे मुख्यमंत्री होते. चंद्रशेखर राव नी २७ एप्रिल २००१ ला तेलगु देसम पार्टीचा राजीनामा दिला आणि तेलंगणा राष्ट्र समिती नावाचा पक्ष स्थापन केला.


तेलगु अस्मितेला खो देऊन तेलंगणा राष्ट्र समिती बनवली तर खरी पण म्हणावा तसा जोर सुरवातीला दिसत नव्हता.

काँग्रेसचे बाहुबली वाय एसआर रेड्डी जो पर्यंत मुख्यमंत्री होते तो पर्यंत चंद्रशेखर राव यांची डाळ शिजली नाही. २००९च्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला काँग्रेसने धोबीपछाड दिला. तेव्हा सगळ्यांना वाटलं की तेलंगणाचा मुद्दा कालबाह्य झाला. 


पण कहाणी में फिरसे ट्विस्ट आला.

काँग्रेसला निवडणुका जिंकून देणारे वायएसआर रेड्डींचे अपघाती निधन झाले. आंध्रमध्ये काँग्रेस अनाथ झाली. असं म्हणतात हा धक्का पचवू न शकल्याने अनेक वायएसआर कार्यकर्त्यानी आत्महत्या केली.  वाय एसआर यांच्या चिरंजीवाला त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडलं होत पण घराणेशाही वर शिक्का नको म्हणून त्याला ते पद नाकारण्यात आलं. वायएसआर काँग्रेस नावाचा नवा पक्ष जगमोहन रेड्डीने स्थापन केला. आंध्र काँग्रेसला खिंडार पडला.


झालेला घोळ निस्तरण्यासाठी काँग्रेसने हात पकडला चंद्रशेखर राव यांचा.  चंद्रशेखर राव ने तेलंगणा बनवण्याच्या बदल्यात पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे आश्वासन सोनिया गांधीना दिले. मनमोहनसिंग सरकारने तेलंगणाचा कडू घोट घेतला. पण ऐनवेळी चंद्रशेखर रावने काँग्रेसला झक्कू दिला. तेलंगणा बनला, पण तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष काँग्रेसमध्ये विलीनच केला नाही.

काँग्रेससाठी आंध्र गेलं तेलंगणा गेलं हातात धुपाटण राहिलं.


इथून सुरु झालं चंद्रशेखर राव युग.


२ जून २०१४ला तेलंगणाचा पहिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तिथून येणारी प्रत्येक निवडणूक मोठ्या मेजोरीटीने जिंकली.  २०१४नंतरची मोदी लाट असू दे किंवा काही लोक म्हणत आहेत तशी आत्ताची राहुल गांधी लाट अशा कोणत्याही लाटा चंद्रशेखर रावना अडवू शकली नाही. शेतकऱ्याच्यासाठी च्या विविध योजना कर्जमाफी वगैरे मुळे केसीआर यांची लोकप्रियता वाढतच होती.


याचा अर्थ असा नव्हता की चंद्रशेखर राव यांच्या बद्दल काहीच वाद नाहीत.

त्यांनी आपल्या पोराबाळानां नातेवाइकांना पक्षात सरकारमध्ये अनेक पदे वाटली आहेत. त्यांचा ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रावर जरा जास्तच विश्वास आहे. मुख्यमंत्री झाल्यावर हैद्राबाद मध्ये त्यांनी नवा अलिशान मुख्यमंत्री निवास बांधून घेतला आणि पूजापाठ करून तिथे थाटात प्रवेश केला. भ्रष्टाचाराचे विवाद तर त्यांना नवीन नाहीत. याशिवाय अमित शहा यांच्यासोबत त्यांच्या डील असतात असा आरोप विरोधकांनी केला. 


चंद्रशेखर राव यांनी विरोधकांच्या आरोपांना शून्य टक्के किंमत दिली.


आपल्या नेहमीच्या धक्कातंत्र देण्याच्या स्टाईलप्रमाणे त्यांनी विरोधकांना मध्यावधी निवडणूक जाहीर करून जोरदार धक्का दिला. तब्बल ९ महिने आधी निवडणूक जाहीर केल्यामुळे कोणताच पक्ष तयारीत नव्हता. मध्यावधी निवडणुका हा एक जुगार असतो. काही काही वेळा तो स्वतःवरच उलटण्याची शक्यता असते.

पण चन्द्रशेखर राव यांनी हा जुगार खेळला. या निवडणुकीत राहुल गांधी चंद्राबाबू नायडू  नरेंद्रमोदी ओवेसी या सगळ्यांना रजनीकांतप्रमाणे अंगावर घेतले आणि मागच्या निवडणुकीपेक्षाही २४ सिटा जास्त जिंकल्या.

तेलंगणा में रेहना होगा तो सिर्फ चन्द्रशेखर राव केहना होगा याच्यावर शिक्कामोर्तब केला.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.