आझाद यांच्या आईला शेणकूट विकायची वेळ आलेली, मराठी क्रांतिकारकाने त्यांचा सांभाळ केला

२७ फेब्रुवारी १९३१, अलाहाबादचे आल्फ्रेड पार्क उद्यान. चंद्रशेखर आझाद आपल्या एका साथीदाराबरोबर एका मित्राची वाट पहात होते. पण दुर्दैवाने तो मित्र पोलिसांचा खबरी निघाला. अख्ख्या त्या उद्यानाला इंग्रज पोलिसांनी वेढा घातला होता. आता काय करायचे हा प्रश्न  त्यांच्या साथीदाराला पडला. तेव्हा चंद्रशेखर आझाद उद्गारले,

“दुश्मन की गोलीयोकां हम सामना करेंगे. हम आझाद है आझाद ही रहेंगे. “

हातात असलेल्या एका पिस्तुलाच्या बळावर त्यांनी इंग्रज सेनेशी लढाई सुरु केली. काही वेळानी आतून गोळ्याचा आवाज येणे बंद झाले. कोणीतरी आत जाऊन पाहणे गरजेचे होते पण कोणाही पोलीस शिपायाचे धाडस होईना. अखेर कसे तरी पोलीस चंद्रशेखर आझाद यांच्या जवळ जाऊन पोहचले. तेव्हा दिसलं,

आझाद यांनी स्वतःला आपल्या पिस्तुल मधली शेवटची गोळी मारून घेतली होती.

इंग्रजांनी चंद्रशेखर आझाद यांच्या बद्दलची बातमी लोकांना कळाली तर डांगे सुरु होतील म्हणून त्यांचं गुपचूपपणे रसुलाबाद घाटावर नेऊन अंतिम संस्कार देखील केले. त्यांच्या घरच्यांनाही कळवण्याचं कष्ट घेतलं गेलं नाही.

चंद्रशेखर आझाद यांचं खरं नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी. त्यांच्या वडिलांचं मूळ गाव उत्तरप्रदेश मध्ये होतं पण तिथून ते मध्यप्रदेशमधील अलीजापूर मधल्या भावरा या गावात स्थलान्तरित झाले. त्यांच्या तिसऱ्या पत्नीच्या म्हणजेच जगराणीदेवी यांच्या पोटी चंद्रशेखर जन्माला आले.

घरची परिस्थिती हलाखीची होती. जागरानी देवी यांची इच्छा होती की मुलाने संस्कृतचा अभ्यास करून पंडित व्हावं. यासाठी चंद्रशेखर वाराणसीला आले मात्र गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चंद्रशेखर यांनी सहभाग घेतला. त्यावेळी अटक झाल्यावर न्यायालयात चंद्रशेखर यांनी आपले आडनाव ‘आझाद’ असल्याचे नोंदवले.

तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.  

पुढचं आयुष्य त्यांनी मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी अर्पण केलं. घर कुटुंबावर तुळशीपत्र सोडलं ते तेव्हाच. भगतसिंग सुखदेव वगैरे साथीदार मिळत गेले आणि हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना झाली.

त्यांच्या क्रांतिकार्याचे मुख्य ठिकाण झाशी हेच होते. आझाद फार कमी वेळा आपल्या घरी जायचे. त्यांनी आपल्या कुटूंबाच्या सुरक्षिततेसाठी घरची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली होती. फक्त एकदाच भावरा या गावी जाताना एका साथीदाराला सुद्धा नेलं होतं, त्याच नाव सदाशिवराव मलकापूरकर.

सदाशिवराव मलकापूरकर हे व त्यांचे बंधू शंकरराव मलकापूरकर हे चंद्रशेखर आझाद यांचे जवळचे सहकारी. एकदा राजगुरू यांना बॉम्ब व शस्त्रास्त्रे पोहचवण्याच्या नादात भुसावळ रेल्वे स्थानकावर सदाशिवराव आणि त्यांचे साथी भगवानदास मौहार यांना अटक झाली. तेव्हा शंकररावांनी जेवणाच्या डब्ब्यातून सदाशिवरावांना पिस्तूल तुरुंगात पोच केलं.

याच पिस्तुलाने मलकापूरकर आणि भगवानदास मौहार यांनी क्रांतिकारकांशी फितुरी करण्यावर भर न्यायालयात गोळ्या चालवल्या. सदाशिवराव यांचा हा पराक्रम इतिहासात भुसावळ बॉम्ब खटला म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना या खटल्यात अंदमान येथे जन्मठेपेची शिक्षा झाली.

पुढं काही वर्षांनी ते जेव्हा अंदमानमधून बाहेर आले तो पर्यंत चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे दिग्गज क्रांतिकारक मातृभूमीसाठी हुतात्मा झाले होते. देशात सशस्त्र क्रांतीच स्वप्न पाहणारी हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी काळाच्या पडद्याआड गेली होती.

सदाशिवराव मलकापूरकर यांची सुटका झाल्या झाल्या त्यांना सर्वप्रथम चंद्रशेखर आझाद यांच्या कुटूंबाची आठवण आली. त्यांच क्षेमकुशल आहे का हे पाहण्यासाठी ते मध्यप्रदेश मधल्या भावरा येथे गेले. आझाद यांच्या साथीदारांपैकी फक्त त्यांनाच या गावाची माहिती होती. तिथे गेल्यावर मात्र त्यांना मोठा धक्का बसला. चंद्रशेखर आझाद यांच्या वडिलांचं निधन झालं होतं.

या महान क्रांतिकारकांच्या आईला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस कंठावे लागत होते. त्या कधी जंगलात लाकडे गोळा करून तर कधी शेणकूट विकून जगत होत्या. इंग्रजांच्या धाकामुळे गावकऱ्यांकडून त्यांना कोणतीही मदत होत नव्हती.

उलट ‘डकैत की माँ’ असं म्हणत त्यांची संभावनाचं केली जात होती.

ज्या चंद्रशेखर आझाद यांनी देशासाठी प्राण दिले त्यांच्या आईवर ही वेळ आलेली पाहून सदाशिवराव यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. त्यांनी या माउलीला आपल्या सोबत झाशीला येण्याची विनंती केली. पण त्या म्हणाल्या,

“ज्या जागी पतीचा मृत्यू झाला आहे ते गाव मी सोडू शकत नाही. माझा पण शेवट याच गावात होणार.”

पण सदाशिवराव मलकापूरकर यांनी त्यांना खूप समजावलं. ते म्हणाले,

चंद्रशेखर आझाद यांची शेवटची इच्छा होती कि तुम्हाला तीर्थयात्रेला नेऊन आणू. आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या सोबत चला.

अखेर जगरानी देवी तयार झाल्या. सदाशिवराव यांच्या आईच निधन झालं होतं. आपल्या आईच्या जागी जगरानीदेवी याना समजून त्यांची अखेरपर्यंत सेवा केली. त्यांना काहीही कमी पडू दिल नाही. मुलाचं जे कर्तव्य असत ते त्यांनी यथायोग्य पूर्ण केलं. जगरानी देवी आपल्या शेजार्यांना नेहमी म्हणायच्या,

“चंदू जर जिवंत असता तर त्याने जे केलं असतं तसंच सदाशिव माझा सांभाळ करतोय. “

असं म्हणतात की जेव्हा जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्याबद्दल कळाले तेव्हा त्यांनी पाचशे रुपयांची मदत पाठवून दिली होती. मात्र इतर कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही.

२२ मार्च १९५२ रोजी जगराणीदेवी यांचे निधन झाले. सदाशिवराव मलकापूरकर यांनीच त्यांचे मुलगा म्हणून अंतिम संस्कार केले. या माऊलीची आठवण म्हणून झाशीच्या नागरिकांनी एके ठिकाणी त्यांचा पुतळा उभा करायचं ठरवलं. मास्टर रुपनारायण नावाच्या शिल्पकाराने हि मूर्ती बनवली होती. पण तत्कालीन प्रशासनाने याला विरोध केला. त्यांच्या पुतळा उभारण्यावरून दंगल झाली, पोलिसांनी गोळीबार देखील केला. यात तीन जणांचा मृत्यू झाला.

अखेर जगरानी देवी यांचा पुतळा झाशी शहरात उभा राहू शकला नाही. सदाशिवराव मलकापूरकर रडत रडत म्हणाले,

” चंद्रशेखर आझाद ने तो अपनी जान देकर भारत माँ पर शहीद हो गये लेकिन हम इतने दुर्भाग्यशाली है की उनकी माँ के लिए अपनी जान भी नहीं दे सके. “

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.