फक्त एका फोटोच्या बदल्यात त्याने चंद्रशेखर आझाद यांची पिस्तूल भारतात परत पाठवली…

चंद्रशेखर आझाद म्हणजे जबरदस्त क्रांतिकारी नेता. भारदस्त तब्येत, मिशांना पिळ देणारा रुबाबदार बलदंड तरुण. आझादांच्या नुसत्या पुतळ्याकडे पाहील्यावर रक्त सळसळते. एवढी प्रचंड ऊर्जा असणारा ‘पैलवानी’ बाजाचा आणि ‘विद्वान’ बुद्धीचा हा क्रांतिकारक.

भगतसिंहाच्या फाशीच्या एक महिना आधी, 27 फेब्रुवारी 1931 रोजी त्यांचा मृत्यू झाला. नॉट बॉवर आणि काही सैनिकांसोबत झालेल्या धुमश्चक्रीमध्ये आझादांना वीरमरण प्राप्त झाले. फुलचंद जैन यांच्या नोंदीनुसार आझादांकडे 448 रुपये आणि 22 रिकाम्या तसेच 16 भरलेली/जिवंत काडतुसे मिळाली. याचसोबत आझादांनी प्रतिकार केलेली ‘कोल्ट पिस्तुल’ सुद्धा इंग्रजांनी जमा करून घेतली.

100193786 azad 5

भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांनी भारतातून अनेक गोष्टी मालकी हक्क दाखवत इंग्लंडला नेल्या. त्यातच, आझादांची ही पिस्तुल नॉटबॉवरला ‘भेट’ म्हणून देण्यात आली.

स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक ठिकाणी नवनवीन संग्रहालय उभारण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामची माहिती येणाऱ्या पिढ्यांना मिळावी म्हणून अनेक नेत्यांचे फोटो, त्यांच्या काही वापरातल्या गोष्टी, वृत्तपत्राची कात्रणे इ. लोकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली.

अशातच, सुधीर विद्यार्थी नावाच्या एका ध्येयवेड्या व्यक्तीला आझादांच्या ‘बमतुल बुखाराचे’ वेड लागले.

आझाद अखेरच्या काळात अलाहाबादच्या ‘कटरा मुहल्ला’ मध्ये भवानी सिंह रावत या गढवालच्या क्रांतिकारकसोबत राहत होते. त्यांचा शोध घेऊन ती मौजर बंदूक शोधायचा प्रयत्न त्यांनी सूरु केला.दुसरीकडे, रामकृष्ण खत्री यांनीही आझादांच्या बंदुकीचा कुठे ठावठिकाणा लागतोय का, यासाठी प्रयत्न सुरु केले.

यातच, नॉटबॉवर कडे असणाऱ्या आझादांच्या पिस्तोलची बातमी रामकृष्ण खत्रीना समजली.

अलाहाबादच्या ‘कमिशनर मुस्तफी’ मार्फत नॉटबॉवर कडून ती बंदूक वापस मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले. कागदपत्रांची तपासणी झाली. 27 फेब्रुवारी 1931 चा रिपोर्ट काढण्यात आला. सर्व पुरावे पाठवून, सततचा पत्रव्यवहार करूनसुद्धा नॉटबॉवर दाद देत नव्हता. अखेरीस, मुस्तफी यांनी लंडनमधल्या Indian High Commission मार्फत नॉटबॉवर वर दबाव टाकण्यास सुरुवात केली.

अखेरीस या ‘भारतीय अस्मितेच्या’ लढ्याला यश आले. नॉटबॉवर, ज्याच्या वैयक्तिक संग्रहात आझादांची बंदूक होती.. त्याने ते भारताला वापस करण्याविषयी तयारी दर्शवली.

1972 मध्ये ती बंदूक दिल्लीमध्ये आली आणि 27 फेब्रुवारी 1973 रोजी अलाहाबादमध्ये तिचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी निघालेल्या मिरवणुकीत भारतातील जवळ जवळ सर्वच क्रांतिकारक सहभागी झाले होते. आझाद-भगतसिंहाचे क्रांतिकारी दोस्त यामध्ये सहभागी होते. ‘शचिंद्रनाथ बक्षी’ यांच्या अध्यक्षतेखाली मोठी सभा पार पडली आणि मोठ्या थाटामाटात तिची रवानगी लखनौच्या संग्रहालयात झाली. पुढे अलाहाबाद येथे संग्रहालय तयार झाल्यानंतर बंदुकीस लखनौवरून वापस आणण्यात आले.

आता चंद्रशेखर आझादांचा हा साथीदार अलाहाबादच्या संग्रहालयात मोठ्या दिमाखात विराजमान आहे. 2016 पासून या बंदुकीसोबत फोटो-व्हिडिओ काढण्याची सोयसुद्धा केली आहे.

azad2

या बंदुकीची नोंद खालीलप्रमाणे –

Colt pistol, PTFA manufacturing comp. Hart Fort city (America) Patented, April 20, 1897-December 22, 1903. Colt Automatic Caliber 32,RIMLESS & SMOKELESS.

आझादांनी त्यांच्या आयुष्यात अनेक बंदूक वापरल्या. त्यामध्ये तीन मौजर वापरल्याचे उल्लेख आपल्याला मिळतात. त्यापैकी एक, सर्वात आवडीची मौजर ‘बमतुल बुखारा’ ही कुठे आहे याविषयी काहीही माहिती नाही. तिचे काही धागेदोरे उजेडात आले आहेत. आझादांची बमतुल बुखारा सुद्धा या भूमीत परत येईल, अशी धुरकट आशा आता उत्पन्न झाली आहे. आझाद त्यांच्या शेवटच्या तीन चार महिन्यात ही Colt Pistol वापरत होते.

सुधीर विद्यार्थी यांचे ‘भारतीय क्रांतिकारक’ विशेषतः अश्फाकउल्ला खान, भगतसिंह यांच्यावर फार सुंदर काम आहे.

त्यांच्या एका नोंदीनुसार सन 1977 मध्ये वृत्तपत्रात एक बातमी आली होती. ज्यामध्ये एका चोराने आझादांची मौजर अलाहाबाद संग्रहालयातून पळवून नेली, असा मजकूर होता. पण आझादांची मौजर अजूनही नेमकी कुठे आहे, हे माहीत नाही. तसेच 1973 पासून ही पिस्तुल संग्रहालयातच आहे. या बातमीचा आधार घेऊन अनेकजण चुकीच्या गोष्टी पसरवू पाहत आहेत. सुधीर विद्यार्थी यांनी त्याचवेळेस या बातमीचा विरोध केला होता.

नॉटबॉवर हा आझादांच्या विरोधात भारतात आणलेल्या चार शार्प शूटर पैकी एक. जेव्हा त्याच्याकडून बंदूक भारताला वापस देण्याविषयी होकार आला तेव्हा त्याने दोन गोष्टींची मागणी केली.
एक म्हणजे भारत सरकारचे अभिनंदनपर/शुभेच्छा पर पत्र आणि दुसरे म्हणजे ‘आल्फ्रेड पार्क’ मध्ये असणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांच्या रुबाबदार पुतळ्याचा फोटो.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Manjit Ghunte says

    खूप छान वाटत मला तूमचे लेख वाचायला एक सजेशन होतं बबलू पालवणकर बद्दल जर आपण लिहिला तर खूप छान माहिती आहे त्यांची देखील

Leave A Reply

Your email address will not be published.