दलित समाजाला “शासक” बनवायचय : चंद्रशेखर आझाद

गेल्या १५ महिन्यात आम्ही जे काही भोगलंय, त्याचा हिशेब दलित समाज २०१९ सालच्या निवडणुकीत चुकता करेल. २०१४ साली भाजपला सत्तेत आणण्यात दलित समाजाची मोठी भूमिका राहिल्याचं भाजपचं सांगतं, आता दलित समाजच भाजपला सत्तेतून घालवणार…

“आता फाशी झाली तरी खैर नाही पण भाजपची दलित समाजा विषयीची दुटप्पी भूमिका जनतेसमोर आणणार. इथून पुढे प्रत्येक दिवस ‘भीम आर्मी’ भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काम करेल”

१३ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री अडीच वाजता सहारनपूर जेलमधून सुटका करण्यात आलेला ‘भीम आर्मी’ चा अध्यक्ष चंद्रशेखर आझाद माध्यमांशी बोलताना जेलबाहेर जमलेल्या आपल्या हजारो समर्थकांना संबोधित करत होता.

जेलमधून बाहेर पडल्यानंतर लगेचच चंद्रशेखरने भाजपाविरोधात रणशिंग फुंकलं होतं. आज परिस्थिती अशी आहे की उत्तर प्रदेशात भाजपसमोर तो एक कडवं आव्हान म्हणून उभा आहे.

कोण आहे चंद्रशेखर आझाद…?

चंद्रशेखर आझाद उर्फ ‘रावण’ गेल्या वर्षभरात उत्तर प्रदेशातील आणि देशभरातील दलित समाजाचा प्रमुख तरुण नेता म्हणून समोर आलाय. २०१४ साली उत्तर प्रदेशातील दलित विचारवंत सतीश कुमार यांनी ‘भीम आर्मी’ नावाच्या संघटनेची स्थापना केली होती, ज्या संघटनेने आता देशभरात हात-पाय पसरलेत.

देशातील महत्वाच्या अशा जवळपास सर्वच राज्यात ही संघटना जाऊन पोहोचलिये. चंद्रशेखर आझाद या संघटनेचा प्रमुख चेहरा आणि अध्यक्ष आहे.

सहारनपुरमध्ये जातीय दंगली पसरविण्याच्या आरोपाखाली जून २०१७ मध्ये चंद्रशेखरला उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटकेत टाकलं होतं, मात्र त्याचा अटकेचा कालावधी पूर्ण होण्याच्या २ महिन्यांपूर्वीच त्याची सुटका करण्यात आली.

चंद्रशेखर आझाद
फोटो- सिटिझन्स फॉर जस्टीस अँँड पीस

चंद्रशेखर आझाद प्रचंड आक्रमक आहे. त्याच्या याच आक्रमकतेमुळे तो दलित समाजामध्ये प्रचंड लोकप्रिय देखील आहे. त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येईल की उत्तर प्रदेश सरकारने जेव्हा रात्री अडीच वाजता त्याला सहारनपुर जेलमधून बाहेर सोडलं, त्या रात्री अडीच वाजता जेलच्या बाहेर त्याची वाट बघत साधारणतः अडीच हजार लोक वाट बघत बसले होते. विशेष म्हणजे चंद्रशेखरला रात्री सोडण्यात येणार नाही, हे स्थानिक प्रशासनाने जाहीर करून सुद्धा केवळ तो सुटणार याची चाहूल लागल्यानंतर एवढ्या मध्यरात्री त्याच्यासाठी ही गर्दी जमली होती.

चंद्रशेखर आझाद देशभरात सर्वप्रथम चर्चेत आला तो जून २०१६ साली. घड्कौली या गावाबाहेर दलितांनी एक बोर्ड लावला होता. या बोर्डवर ‘दा ग्रेट चमार’ असं लिहिलेलं होतं आणि याच बोर्डवरून पुढे गावातील दलित आणि राजपूत लोकांमध्ये वाद पेटला होता.

हा सगळा वाद आणि ‘भीम आर्मी’च्या एकूण भूमिकेविषयी ‘द क्विंट’ने एक डॉक्युमेंटरी केलीये. त्यातून ‘भीम आर्मी’ आणि चंद्रशेखर आझादचं व्यक्तिमत्व समजून घ्यायला बरीच मदत होते. त्यातच तो सांगतो,

“मै अपनी कम्युनिटी को शासक बनाना चाहता हुं

उत्तर प्रदेशच्या राजकारणात चंद्रशेखरचं स्थान काय…?

उत्तर प्रदेशमधील दलित तरुणांमध्ये चंद्रशेखर आझाद प्रचंड लोकप्रिय आहे. शिवाय दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढतच चाललीये, याची भाजप सरकारला देखील कल्पना आहे. जेलमध्ये असताना त्याची वाढत चाललेली लोकप्रियता आणि दलित समजाच्या मनात भाजपची होत चाललेली नकारात्मक प्रतिमा या गोष्टी लक्षात घेऊनच सरकारने चंद्रशेखरला सजा पूर्ण होण्याच्या २ महिने आधीच सोडून दिलं.

जेलमधून बाहेर पडल्यानंतर चंद्रशेखरने भाजपविरोधात दंड थोपटलेत. २०१९ साली आपण निवडणुकीच्या मैदानात असणार नाही, हे स्पष्ट करतानाच भाजपला पराभूत करण्यासाठी जर ‘बसपा-सपा-काँग्रेस’ अशी महाआघाडी झालीच तर ‘भीम आर्मी’ महाआघाडीचं समर्थन करेल, हे तो माध्यमांशी बोलताना नियमितपणे सांगतोय.

सक्रीय राजकारणात उतरण्यापेक्षा आपल्याला रस्त्यावरची लढाई लढण्यातच अधिक रस असल्याचं सध्या तो सांगत असला, तरी रस्त्यावरची लढाई संसदेत घेऊन जाण्यासाठी का होईना तो सक्रीय राजकारणात आज ना उद्या उतरेलच. (अर्थात ती स्वगार्तार्ह बाब आहे)

मायावती आणि चंद्रशेखर आझाद. 

बसपा प्रमुख मायावती आणि चंद्रशेखर यांच्या समर्थकांमध्ये सध्या बराच गोंधळ आहे. कारण दोघांचाही समर्थक गट दलित समाजात मोठ्या प्रमाणात आहे. मायावती आपल्या ‘बुआ’ असल्याचं सांगताना त्यांच्याशी कसलेही मतभेद नाहीत, आपली सगळी ताकद आपण त्यांच्या पाठीमागे लावू असं चंद्रशेखर सांगत असला तरी, मायावतींना मात्र चंद्रशेखरचा वाढणारा प्रभाव फारसा रुचलेला नाही.

मतांच्या ध्रुवीकरणाची किंवा आपल्याला आव्हान देऊ शकेल अशा कुठल्यातरी चेहऱ्याच्या उद्याची भीती असेल पण मायावतींनी मात्र चंद्रशेखरला जितकं दूर ठेवता येईल, तितकं दूर ठेवायच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी चंद्रशेखर आझादचा उल्लेख ‘आरएसएस’ आणि ‘भाजप’चा एजंट असा करून देखील झालंय.

मायावतींना चंद्रशेखर विषयी असलेला संशय कदाचित त्यांच्या राजकीय असुरक्षिततेच्या भावनेतून आलेली असावी. कारण आकड्यांमध्ये विचार केला तर २०१४ सालची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर २०१७ सालची उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक या दोहोंमध्येही मायावतींचा जनाधार घसरल्याचंच चित्र आहे.

आजघडीला उत्तर प्रदेशात महाआघाडीची सर्वाधिक गरज कुणाला असेल तर ती मायावतींना आहे. अशा स्थितीत चंद्रशेखरचा मदतीचा हात हातात घेण्याचा एक मार्ग त्यांच्यासमोर असू शकतो, पण त्यात त्यात मायावतींना भविष्यकालीन धोका भेडसावतोय.

चंद्रशेखर मात्र योग्य त्या संधीची वाट बघतोय. मायावतींनी संघ आणि भाजपचा एजंट असं म्हंटल्यानंतर देखील त्याने मायावतींविषयी कुठलंही नकारात्मक विधान केलेलं नाही. मायावतींच्या संघर्षाविषयी आणि त्यांनी दलित समाजासाठी केलेल्या कामाविषयी आपल्याला आदर असल्याचं म्हणताना, घरची भांडणं घरात सोडवता येतील, असंही सांगायला तो विसरत नाही.

चंद्रशेखर आझादचं राजकीय भवितव्य काय असेल-नसेल ते नजीकचा भविष्यकाळच ठरवेल. पण ‘भीम आर्मी’च्या माध्यमातून दलितांच्या आत्मसन्मानाची रस्त्यावरची लढाई मात्र तो अतिशय धैर्याने लढतोय, एवढं नक्की.  अॅट्रोसीटीजच्या केसेस असतील किंवा दलितांवरील इतर कुठल्याही अन्याय अत्याचाराची लढाई असेल, चंद्रशेखर आझाद ती नेटाने लढतोय ! 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.