देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजच काय तर भूतप्रेतांशी लढायला चंद्रशेखर आझाद तयार होते.

चंद्रशेखर आझाद. ‘कमांडर इन चीफ ऑफ HSRA’. भारताच्या क्रांतिपर्वात होऊन गेलेला प्रचंड ताकदवान क्रांतिकारी तरुण. आझाद प्रचंड वेगळे रसायन होते. त्यांच्याविषयी आजही सर्वसामान्य भारतीयांना फारशी माहिती नाही, हे खरेतर आपले दुर्दैवच म्हनावे लागेल. आझाद भलेही कर्तव्यनिष्ठ, कठोर आणि कडक स्वभावाचे असले तरीही त्यांच्या आयुष्यात एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी घडून गेल्या आहेत, की त्याची तुलना करायला एखादा हॉलिवूड पटसुद्धा शोधून सापडणार नाही. त्यांच्या आयुष्यात घडलेले एक-दोन किस्से आज आपण पाहूया.

क्रांतिकार्य करायचे म्हणले तर अतिशय अवघड. पैश्यांच्या अडचणी, पोलिसांचा-सीआयडीचा ससेमिरा, सतत गुप्तपणे वावर, कुणाशीही जास्त संबंध न ठेवणे यांसारख्या कितीतरी अडचणींचा सामना करत सर्व तरुण भारताला स्वतंत्र करण्यासाठी धडपडत होते. पैश्यांची अडचण तर पाचवीलाच पुजलेली. त्याचे नियोजन करता-करता अक्षरशः सर्वांचे कंबरडे मोडत असे. एकेदिवशी मास्टर रुद्रनारायन आणि आझाद गप्पा मारत बसले होते. तेव्हा मास्टर आझादांना म्हणाले,

“ओरछा गावी बेतवा नदीच्या किनारी अनेक भग्न पावलेले मंदिरे आहेत. त्यातील, लक्ष्मीदेवीच्या मंदिरात एका विशिष्ठ ठिकाणी भरपूर धन पुरून ठेवलेलं आहे. पण त्या सगळ्या धनावर एक साप बसलेला असतो आणि जो कुणी ते धन जमिनीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल, त्याला तो चावतो.”

ही गोष्ट ऐकून आझाद जोरजोराने हसू लागले. ते मास्टरला म्हणाले,

“भूत-प्रेत, भूमिया सांप-वांप यह सारी ढपोरशंखी बातें है..” 

पण मास्टरला माहीत होतं, की आझादांच्या ताकदीवर कुणी शंका घेतली अथवा त्यांच्या ताकदीला आव्हान दिले, तर मात्र ते कोणतेही काम करायला मागे-पुढे पाहत नाहीत. मुद्दाम मास्टर म्हणाले,

“चला ना मग, आपण स्वतःच जाऊन पाहू काय खरं, काय खोटं ते..”

आझादांनी विचार केला की जर खरच धन पुरून ठेवलेलं असेल तर त्याचा उपयोग आपल्या संघटनेसाठीच होईल. आणि समजा नसेल काही तर असंही आपलं काहीच नुकसान नाही. उलट आपणच खरे ठरणार आहोत.

एके दिवशी जाण्याचे नियोजन करून आझाद, मास्टर आणि रामानंद ड्रायव्हर असे तिघे सायकलीने ओरछा ला पोचले. त्यांना मंदिराजवळ जायला संध्याकाळ झाली. आपल्या सोबत आणलेल्या कुदळ-फावडीने काम करायला सुरुवात केली. तिघांनी संपूर्ण रात्र मंदिरात अनेक ठिकाणी खड्डे घेतले. पहाटेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. पण, ना त्यांना कुठे पुरून ठेवलेले धन मिळाले ना कुठे धनावर बसलेला साप.. शेवटी सकाळी बेतवा नदीच्या प्रवाहात हात-पाय धुतले आणि ते झांशीला परत निघाले.. रस्त्यात मात्र मास्टर रुद्रनारायण यांची आझादांनी चांगलीच ‘खबर’ घेतली.

आझाद प्रचंड सावध व्यक्तिमत्त्व होते. कोणत्याही आणि कितीही बिकट प्रसंगी आपली बुद्धी शांत राखून निर्णय घेण्याची त्यांची क्षमता प्रचंड मजबूत होती. 

एकदा त्यांच्यावर बाका प्रसंग गुदरला होता. 

क्रांतिकारी साथीदारांसोबत बैठकीस बसल्यावर आझाद आपल्याजवळ असलेले शस्त्र सर्वांना दाखवत. वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र सोबत बाळगणे, आपल्या मित्रांना त्याची इत्यंभूत माहिती देणे यामध्ये आझादांना प्रचंड आनंद मिळत असे. असेच एके दिवशी आझाद, सदाशिवराव मलकापूरकर, विश्वनाथ वैशंपायन आदी क्रांतिकारक बसलेले होते. सदाशिवरावांच्या बहिणीच्या घरी वरच्या खोलीत ही बैठक जमली होती.

या क्रांतिकारकांशिवाय सदाशिवरावांचा अडीच एक वर्षांचा भाच्चा खोलीत होता. पण तो लहान आहे म्हणून सर्वांनी त्याच्याकडे कानाडोळा केला. आझादांनी आपल्यासोबत आणलेल पिस्तुल बाहेर काढलं आणि सर्वांना ते पिस्तूलाची माहिती देऊ लागले. काही वेळाने पायऱ्यांवर कुणीतरी चालत असल्याचा आवाज आला. आझादांनी पटकन आपले पिस्तुल उशीखाली लपवले. सदाशिवरावांचे दाजी सर्वांचा हालहवाल विचारण्यासाठी आले होते.

गप्पा रंगतच होत्या तेवढ्यात सदाशिवरावांचा भाच्चा मोठ्याने ओरडला,

“काका दंबुक..”

झालं. सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. आता आपण पकडले जाणार, आपले भांडे फुटणार असेच सर्वांना वाटले. एकीकडे सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते तर सदाशिवरावांचा तो लहानगा भाच्चा उशिकडे बोट करत ‘दंबुक’ म्हणत होता. तेवढ्यात आझाद झटकन त्याच्याकडे पाहून म्हणाले,

“हां.. चलाओ बंदूक.. चलाओ..” असे म्हणत त्यांनी आपल्या बोटांनी बंदुकीचा आकार तयार केला आणि तोंडानेच ‘धुडुम.. धुडुम” असा आवाज करू लागले. 

तो लहानगा भाच्चा आझादांच्या या कृतीला उत्तर देऊ लागला आणि त्यांच्याशी खेळू लागला.. आणि आझादांच्या प्रसंगावधानतेमुळे क्रांतिकारकांवर अकस्मात ओढवलेले संकट टळले.

आझादांच्या आयुष्यात अनेक रोमांचक प्रसंग घडून गेले आहेत. त्या सर्वांना एकत्रित लिहायचे झाल्यास एखादे छोटेखानी पुस्तकच तयार होईल.. शेवटी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व बलिदान देणाऱ्या या महान नेतृत्वाचे आयुष्य सरळसाधे थोडीच असेल?

कमांडर इन चीफ चंद्रशेखर आझाद यांना विनम्र अभिवादन.

  • केतन पुरी 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.