थेट इंदिरा गांधींना सांगितलं, काँग्रेसमध्ये समाजवाद नाही आला तर मी पक्ष फोडणार…

माजी पंतप्रधान चंद्रशेखर. एकदम मोकळं ढाकळ व्यक्तिमत्व. अस्सल इरसाल शेतकरी गडी. औपचारिकता, राजशिष्टाचार असल्या गोष्टीत ते कधीच पडले नाहीत. आपल्याला पटेल तस वागणं आणि समोरचा चुकीचा वागत असेल तर त्याला तिथल्या तिथे समजावून सांगणं ही सवय म्हणा किंवा फटकळपणा म्हणा पण त्यांच्याकडे होता. जो त्यांनी पंतप्रधान झाल्यावर ही त्यांनी टिकवून धरला होता.

त्यांच्या अशाचं एका फटकळ पणाचा प्रत्यय थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आला होता.

त्याचं झालेलं असं की, चंद्रशेखर हे सुरुवातीपासूनचं आक्रमक स्वभावाचे आणि समाजवादाच्या विचारांनी प्रेरीत झालेले नेते होते. १९५०-५१ च्या दरम्यान अलाहाबाद विद्यापीठामधून राज्यशास्त्रची पदवी घेतल्यानंतरचं त्यांनी प्रत्यक्ष समाजवादी चळवळ आणि आंदोलनात उडी घेतली.

यानंतर चंद्रशेखर यांनी प्रजा समाजवादी पक्षाच्या माध्यमातून प्रत्यक्ष पक्षीय राजकारणाला देखील सुरुवात केली. अल्पावधीतच एक एक पायऱ्या चढतं पक्षात महत्वाचे नेते म्हणून प्रस्थापित होतं गेले. सुरुवातीला ते बलिया जिल्ह्याचे प्रजा समाजवादी पक्षाचे सचिव म्हणून निवडले गेले.

पुढच्या एकाच वर्षात प्रमोशन होऊन ते उत्तरप्रदेशचे प्रजा समाजवादी पक्षाचे संयुक्त सचिव बनले. पुढे १९५५ – ५६ मध्ये उत्तरप्रदेशमध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे महासचिव बनले. १९६२ मध्ये त्यांना प्रजा समाजवादी पक्षाकडूनच राज्यसभेवर पाठवण्यात आलं.

मात्र याच दरम्यान गुजरातच्या महुआ या भागात एका संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी नुकताच प्रजा समाजवादी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये आलेले छबीलदास मेहता आणि यशवंत मेहता यांनी या सगळ्या संमेलनाचं आयोजन केलं होतं.

याचं संमेलनात इंदिरा गांधी आणि चंदशेखर या दोघांनाही निमंत्रण पाठवलं होतं. इथचं दोघांची राजकीय दृष्ट्या पहिल्यांदा भेट झाली. आणि चंद्रशेखर यांच्या काँग्रेस प्रवेशाची बीज रोवली गेली. पुढे १९६५ मध्ये चंद्रशेखर यांनी प्रजा समाजवादी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पण त्यांच्यावर समाजवादी विचारांचा पगडा कायम होता.

काँग्रेसमध्ये आल्यानंतर अनेकदा इतर नेत्यांनी चंद्रशेखर यांना सांगितलं कि, एकदा इंदिरा गांधींना भेटून या. पण चंद्रशेखर म्हणायचे माझं काय काम त्यांच्याकडे, किंवा त्या तरी मला कशासाठी भेटतील? त्या का मला आपला वेळ देतील? पण तरीही नेते सांगायचे की, एकदा भेटून याचं.

इंदिरा गांधींच्या वेळी एक पद्धत अशी होती की, त्यावेळचे दिग्गज काँग्रेसी नेते गुरुपदस्वामी, इंद्र कुमार गुजराल, अशोक मेहता असे सगळे जण रोज राजकीय चर्चा करण्यासाठी त्यांच्या इथं एकत्र जमत असतं. या सगळ्यांनी एकदा जास्तचं आग्रह केल्यानंतर चंद्रशेखर इंदिरा गांधींना भेटण्यासाठी पोहोचले.

त्यावेळी बोलता बोलता नेमकी समाजवाद या विषयावर चर्चेला सुरुवात झाली. इंदिरा गांधींनी चंद्रशेखर यांना प्रश्न केला,

तुम्ही काँग्रेसला समाजवादी मानता का?

मोकळ्या ढाकळ्या चंद्रशेखर यांनी लागलीच उत्तर दिलं की, नाही. मी काँग्रेसला समाजवादी संस्था मानत नाही. पण लोक म्हणतात एवढं मात्र नक्की.

त्यावर इंदिरा गांधी यांनी प्रतिपश्न केला कि, मग तुम्ही काँग्रेसमध्ये का आला?

चंद्रशेखर यांनी त्याचं वेगानं प्रत्युत्तर दिलं. म्हणाले,

मी पूर्ण १३ वर्ष प्रजा समाजवादी पक्षात पूर्ण इमानदारी आणि क्षमतेने काम केलं. पक्षाला मी पूर्ण निष्ठेनं समाजवादाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. पण एका ठराविक वेळेनंतर मला वाटलं की, इथं काहीचं होऊ शकत नाही.

त्यामुळे मी विचार केला कि काँग्रेस एक मोठा पक्ष आहे इथं जावून बघू, काही तरी करु.

यावर इंदिरा गांधी यांनी विचारलं, मग तुम्ही इथं येऊन नक्की काय करणार आहे?, काय करु इच्छिता?

याचं प्रश्नावर दिलेल्या उत्तरानं इंदिरा गांधी यांना चंद्रशेखर यांचा फटकळ स्वभावाचा प्रत्यय आला. चंद्रशेखर म्हणाले,

मी काँग्रेसला समाजवादी बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. पण जर नाही झाला तर हे पण सांगतो कि, या पक्षाला मी फोडण्याचा प्रयत्न करणार. कारण जेव्हा पक्षाची ताकद कमी होईल तेव्हांच देशात नवीन राजकारण जन्म घेईल.

पण आधी तरी मी काँग्रेसलाचं समाजवादी मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जर नाही झालं तर पक्ष फोडण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही.

प्रश्नाचं उत्तर देण्यास सुरुवात झाल्यापासून इंदिरा गांधी अजूनही आश्चर्यकारक नजरेनं चंद्रशेखर यांच्याकडे बघतं होत्या. पुढे चंद्रशेखर यांनी समाजवादाच्या मुद्दावर नाही पण आणीबाणी इतर तत्कालीन कारणावरून काँग्रेसमधून बाहेर पडलेच आणि १९७७ साली स्थापन झालेल्या जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.